Friday, May 3, 2024
Homeनगरसीसीटीव्ही कॅमेरे नसेल तर वाळू ठेकेदारावर कारवाई

सीसीटीव्ही कॅमेरे नसेल तर वाळू ठेकेदारावर कारवाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

वाळू उपशाचा ठेका असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसतील अशा ठिकाणच्या संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई केली जाईल,

- Advertisement -

असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केल्याने श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा व गोदावरी नदीपात्रातील वाळूचा ठेका घेतलेल्या ठेकेदावर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील मातुलठाण तसेच प्रवरा नदीपात्रातील उक्कलगाव, वांगी, चांदेगाव या ठिकाणी वाळूचे लिलाव झाले असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. लिलावाच्या ठिकाणी मोठमोठे पोकलेन, जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा होत असून दररोज शेकडो वाहने वाळू भरून जात आहेत. नदीपात्रात पाणी असताना मोठमोठ्या मशिनचा वापर वाळू उपशासाठी होत आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर महसूल व पोलीस प्रशासनाचे त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे.

मातुलठाण येथे वाळू ठेकेदारांकडून गुंडांचा वापर होत आहे. ग्रामस्थांना गुंडांकडून धमक्या दिल्या जात असून त्यांनी गावात चेकनाके उभारून ग्रामस्थांना नदीपात्राकडे जाण्यास प्रतिबंध केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत तक्रारी केल्यानंतर तालुका पोलिसांनी छापा घालून मातुलठाण येथून जेसीबी, पोकलेन, मोबाईल असा सुमारे पावणे दोन कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त करत अवैध वाळू उपसा करणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. अशीच कारवाई प्रवरा नदीपात्रातील वाळू उपशाप्रकरणी होण्याची आवश्यकता आहे.

मातुलठाणच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी वाळू उपशाचा ठेका असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसतील अशा ठिकाणच्या संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. वाळू ठेका असलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी नागरिक तसेच सामाजिक संघटनांचीही मागणी आहे. त्यामुळे आता गोदावरी तसेच प्रवरा नदीपात्रातील वाळू ठेकेदारांवर काय कारवाई होते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या