नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल मिळण्याचे स्वप्न यंदा अपूर्ण राहिले आहे. नोबेल समितीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना देण्यात आला आहे. ओस्लो येथे शुक्रवारी विजेत्याच्या घोषणा करण्यात आली. नॉर्वेजियन नोबेल समितीने सादर केलेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी यावर्षी ३३८ नामांकने मिळाली होती, ज्यामध्ये २४४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश होता. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांच्या संवर्धनासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे जाण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मारिया मचाडो यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आपण जगातील अनेक युद्धे शांततेच्या मार्गाने थांबवल्याचा दावा करत, आपल्यालाच या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, अशी इच्छा सातत्याने व्यक्त करत होते. याचबरोबर अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा म्हणून पाठिंबाही दिला होता. पण नॉर्वेजियन नोबेल समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना डावलत, मारिया कोरिना मचाडो यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले असंख्य दावे आणि त्यांच्या समर्थक देशांकडून त्यांना मिळालेला उघडपणे पाठिंबा एवढे सगळे असूनही जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्याऐवजी मारिया यांचे नाव निवडले गेले. मारिया यांचे नाव जाहीर करताना समितीने बक्षिसाचीही घोषणा केली. “हुकूमशाहीमुळे व्हेनेझुएलासारख्या देशात राजकीय काम करणे सोपे नव्हते. हुकूमशाही असूनही मारिया यांनी सातत्याने त्यांच्या देशात निष्पक्ष निवडणुकांची मागणी केली आहे. नोबेल शांतता पुरस्कारासोबत, मारिया यांना आता ११ दशलक्ष स्वीडिश क्रोना आणि प्रमाणपत्र मिळणार आहे. हा पुरस्कार १० डिसेंबर रोजी ओस्लो येथे प्रदान केले जातील,” असे समितीने म्हटले.
कोण आहे मारिया मचाडो?
लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामासाठी व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांचे नाव टाईम मासिकाच्या ‘२०२५ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तीं’च्या यादीतही आहे.
मचाडो यांनी सुमाते ही संघटना स्थापन केली, जी लोकशाही सुधारण्यासाठी काम करते. व्हेनेझुएलाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणात व्यत्यय आणून माचाडो पहिल्यांदा चर्चेत आल्या. ही घटना १४ जानेवारी २०१२ रोजी घडली. चावेझ यांनी संसदेत ९ तास ४५ मिनिटे भाषण दिले होते तेव्हा माचाडो त्यांच्यावर ओरडल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मचाडो यांना स्वातंत्र्यसैनिक म्हटले होते. मारिया मचाडो यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मचाडो गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ देशात लपून राहत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




