Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखगोदावरी नाही, पण विशेष गाडी हा काय प्रकार?

गोदावरी नाही, पण विशेष गाडी हा काय प्रकार?

रोना महासाथ ओसरल्याने दोन वर्षे लावलेले त्याबाबतचे सर्व निर्बंध केंद्र सरकारने उठवले आहेत. महाराष्ट्रातसुद्धा पाडव्यापासून करोनाविषयक निर्बंध हटवले गेले आहेत. राज्यातील जनता मोकळा श्‍वास घ्यायला आता मोकळी झाली आहे. संसर्ग प्रसार टाळण्यासाठी महामारी काळात बहुतेक नियमित रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. लोकांची गैरसोय टाळण्याच्या नावावर मध्यंतरी रेल्वेने जादा भाडे आकारून विशेष गाड्या चालवल्या. दोन पैसे जास्त गेले तरी चालतील, पण लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी करता येतो म्हणून प्रवाशांनीदेखील विशेष गाड्यांना प्रतिसाद दिला. पूर्वीच्या बंद केलेल्या बहुतेक गाड्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. उन्हाळी आणि दिवाळी सुट्यांच्या काळात रेल्वे विशेष गाड्या चालवते. प्रवासीसेवा आणि सोयीसाठी विशेष गाड्या चालवल्या जातात, असे भासवले जाते. भारतीय रेल्वेचा पसारा खूप अवाढव्य आहे. रेल्वे कायम तोट्यात असल्याचे रेल्वे अर्थसंकल्पात दाखवले जात असे. मात्र तोट्यातील रेल्वे फायद्यातही आणता येते हे एका रेल्वेमंत्र्याने रेल्वेचा कारभार कार्यक्षमपणे हाताळून दाखवून दिले होते. रेल्वे अर्थसंकल्प इतिहासजमा करून तो केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे रेल्वेचा फायदा-तोटा सहज दृष्टिपथात येऊ न देण्याचा उद्देशही त्यामागे असू शकतो. करोनाने सर्वच क्षेत्रांना डबघाईला आणले. भारतीय रेल्वे वाहतुकीला बराच ब्रेक लागला. परिणामी रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट अटळ होती. सर्व निर्बंध हटवून रेल्वे वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाल्यावर करोनाकाळातील तोटा भरून काढण्यासाठी आणि रेल्वे फायद्यात येण्यासाठी रेल्वे व्यवस्थापनाने काही धोरण ठरवल्याचे बोलले जाते. त्यानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी मिळत नाहीत तोपर्यंत नियमित प्रवासी गाड्या चालवायच्या नाहीत, असे तुघलकी धोरण रेल्वेने अवलंबल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना बसला आहे. जिल्ह्यासाठी हक्काच्या असलेल्या मोजक्या गाड्यांपैकी मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस अलीकडेच धावू लागली आहे. प्रवाशांचा प्रतिसादही पूर्वीप्रमाणे मिळत आहे. नांदगाव, मनमाड, निफाड, लासलगाव, नाशिकरोड, देवळाली, इगतपुरी आदी प्रमुख रेल्वे स्थानकांवरून मुंबईला नोकरी, व्यापार आणि तत्सम कामांसाठी दररोज जा-ये करणार्‍या प्रवाशांना पंचवटीसोबत गोदावरी एक्स्प्रेसदेखील पूर्ववत सुरू होईल, असे वाटत होते, पण तसे घडले नाही. पंचवटीनंतर तासाभराने मुंबईसाठी सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस सध्या विश्रांती घेत आहे. ही गाडी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांकडून होत आहे. लोकप्रतिनिधीदेखील त्याबाबत पाठपुरावा करीत आहेत. प्रवासी संघटनेने याप्रश्‍नी मुंबई उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनीसुद्धा जिल्ह्यातील जनतेचा प्रश्‍न म्हणून रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी साकडे घातले. आज सोमवारपासून गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू होणार असल्याची माहितीही दिली गेली आहे. तथापि ही गाडी गोदावरी नसून तिच्याच वेळेत मनमाड-मुंबई मार्गावर विशेष गाडी धावणार आहे, असा दावा प्रवाशांकडून केला जात आहे. गोदावरीला असलेल्या सर्व थांब्यांवर ही गाडी थांबेल. 11 एप्रिल ते 15 मे 2022 या काळात सुमारे महिनाभर ही गाडी धावणार आहे. मंत्री पवार यांच्या शब्दाचा मान राखला आणि प्रवाशांची सोयही करीत आहोत, असे भासवण्याची दुहेरी खेळी रेल्वेकडून खेळली जात आहे का? गोदावरीच्या जागी विशेष गाडी धावणार असेल तर प्रवाशांना त्या गाडीच्या प्रवासासाठी जादा दाम मोजावा लागेल. आजपासून प्रायोगिक तत्वावर सुरू होणारी विशेष गाडी ‘गोदावरी एक्स्प्रेस’च आहे, प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला तरच ही गाडी पुढेही चालू राहू शकेल, असे रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष म्हणतात. याचा अर्थ प्रवाशांचा प्रतिसाद पाहून गोदावरी एक्स्प्रेस कायमस्वरूपी सुरू करण्याबाबत निर्णय रेल्वेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. हा संभ्रम रेल्वेकडून मुद्दाम निर्माण केला जात आहे का? प्रवाशांची दिशाभूल करून ‘विशेष गाडी’ म्हणून जास्त भाडे मिळवण्याचा यामागील उद्देश कसा लपून राहणार? हा संभ्रम रेल्वेकडून दूर केला जाईल का? सध्या असलेल्या स्थानिक गाड्यांसोबत आणखी गाड्या सुरू व्हाव्यात, असे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना वाटते. तशी त्यांची मागणी आहे, पण रेल्वे मात्र तोट्याचे टाळ वाजवत सेवा नाकारत आहे. प्रवाशांचा असा मानसिक छळ करून रेल्वेला कोणते समाधान मिळत असेल? एकूण काय, लोकांना जे हवे ते देता येत नाही, पण आम्ही देऊ त्यातच लोकांनी समाधान मानावे, भलेही त्यांची गैरसोय झाली आणि खिशाला थोडा खार लागला तर काय बिघडले? असाही कदाचित रेल्वेचा उद्दात हेतू या दिशाभूलीमागे असेल का? रेल्वे व्यवस्थापनाची अशी आडमुठी भूमिका असेल तर भविष्यात चांगली रेल्वेसेवा मिळू शकेल, अशी अपेक्षा नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनी करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या