राहाता (प्रतिनिधी)
शिर्डीतील अनिकेत उर्फ झिंग्या सुनील शेजवळ (रा. भीमनगर, शिर्डी) या कुख्यात गुन्हेगाराला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. या कठोर आदेशानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीला बेड्या ठोकत थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहात डांबले आहे.
आरोपी अनिकेत शेजवळ याने शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचा विळखा घट्ट केला होता. बेकायदेशीर जमवाजमव करून खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आणि अश्लील कृत्ये करणे अशा गंभीर गुन्ह्यांच्या माध्यमातून त्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मोठी दहशत निर्माण केली होती. त्याच्या या बेछूट कारवायांमुळे शिर्डी शहर आणि आजूबाजुच्या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात आली होती.
सराईत गुन्हेगार अनिकेतच्या वाढत्या मुजोरीला वेसण घालण्यासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या साध्या प्रतिबंधक आणि हद्दपारीच्या कारवाया अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या. त्यामुळे त्याच्या समाजविघातक कृत्यांना कायमचा आळा घालण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी या गुन्हेगाराचा एमपीडीए कायद्यांतर्गत भक्कम प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.
व प्रस्तावातील कागदपत्रांची गंभीर गुन्ह्यांची बारकाईने पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या कुख्यात गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्याचे वॉरंट जारी केले. या धडक कारवाईमुळे शिर्डी परिसरातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलीस उपनिरीक्षक रवींद्र पांडे, पोलीस हवालदार सुयोग सुपेकर आणि महिला पोलीस कर्मचारी सुनीता पवार यांच्या पथकाने पार पाडली.




