Friday, May 3, 2024
Homeनाशिकआता प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन

आता प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन

नाशिक । Nashik

महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच ठिकाणी आणून माहिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाचं छताखाली देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून महिला व बाल विकास भवन उभारण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात करोना सद्यस्थितीचा व महिला बाल विकास विभागाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, महिला व बाल विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.

जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर या योजनांची अंमलबजावणी होते.

ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास महिलांना योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच या भवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ‘स्मॉल मार्ट’ ही संकल्पना राबवून बचतगटाच्या महिलांना आर्थिक प्रगती साधण्यासाठी मदत होणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास भवन उभारण्याची कार्यवाही गतीने करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. महिला व बालकांविषयीच्या समित्याविषयी अधिक जागृकपणे काम करणे आवश्यक असून विशाखा समितीवर काम करणाऱ्या अध्यक्षांना समिती विषयक तांत्रिक बाबींची माहिती होण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. तसेच कोंटुबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, महिला आयोगाच्या कार्यालयाचे कामकाज, बालगृह वन स्टॉप सेंटर वर लक्ष ठेवून कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

करोना काळात बालकांना दत्तक घेणे व देणे याबाबत समाज माध्यमांवर विविध संदेश येत आहेत.

अशा परिस्थितीत कोणत्याही बालकाचे अनधिकृतपणे दत्तक देवाण – घेवाण होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन करावे. तसेच स्थलांतरीत महिला व बालकांना योग्य त्या सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या