Thursday, May 2, 2024
Homeनाशिकन्यायालयांचे कामकाज आता दोन सत्रांंमध्ये

न्यायालयांचे कामकाज आता दोन सत्रांंमध्ये

नाशिक । प्रतिनिधी

पुणे जिल्हा वगळता राज्यभरातील न्यायालयांमध्ये 1 डिसेंबरपासून पुन्हा दोन शिफ्टमध्ये कामकाज चालणार आहे.

- Advertisement -

उच्च न्यायालयाचे महाअधीक्षक ए.जी.दिघे यांनी याबाबत अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा न्यायालय तसेच तालुका न्यायालयांचे कामकाज होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

करोना कालावधीत अतिशय कडक अटी व शर्तींमध्ये न्यायालयीन कामकाज सुरू होते. यामुळे अनेक खटले व चालू खटल्यांचे कामकाज लांबले आहे. यामुळे वकीलवर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी होती. तसेच पक्षकारही वैतागले आहेत. याबाबत महाराष्ट्र व गोवा बार संघाने न्यायालयाचे कामकाज नियमित सुरू करण्याची मागणी केली होती.

याची दखल घेत आता न्यायालयात अधिकचे कामकाज होण्याच्या दृष्टीने ते दोन शिफ्टमध्ये करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील न्यायालयांचे सकाळी 11 ते दुपारी 1.30 आणि दुपारी 2 ते 4 .30 अश्या दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू होणार आहे. न्यायालयातील सर्व कर्मचारी दोन्ही काळात हजर राहणार आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये पुराव्याची कामे तर दुसर्‍या शिफ्टमध्ये न्यायदानाशी संबधीत कामकाज चालणार आहे.

करोनाशी निगडीत सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असून न्यायालयात प्रवेश देतांना मास्क सक्ती, सोशल डिस्टन्सिंग पालन, सॅनिटायझरची व्यवस्था असल्याबाबत खात्री करण्यात येणार आहे. यावेळी करोनाची लक्षणे आढळून आल्यास प्रवेश नाकारला जाणार आहे. दोन शिफ्टच्या कामकाजामुळे लॉकडाऊन काळातील अनेक प्रलंबित खटल्यांच्या कामकाजाला चालना मिळणार असून, परिणामी ववकील आणि पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या