Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Doval : "स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनात येईल ते..."; तरुण पिढीला उद्देशून...

Ajit Doval : “स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनात येईल ते…”; तरुण पिढीला उद्देशून अजित डोवाल पुण्यात काय बोलले?

पुणे । Pune

“स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध ठामपणे उभे राहत लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ अशी सिंहगर्जना केली होती. आज जर लोकमान्य टिळक आपल्यामध्ये असते, तर त्यांनी नक्कीच म्हटले असते की, आपण स्वराज्य मिळवले आहे; आता भारताला सशक्त, सुरक्षित आणि विकसित बनवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!” असे उद्गार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी आज पुण्यात काढले.

- Advertisement -

लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने प्रदान करण्यात येणारा मानाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अत्यंत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना डोवाल काहीसे भावूक झाले. आपल्या शालेय जीवनाची सुरुवात पुण्यातूनच झाल्याची आठवण सांगताना ते म्हणाले, “मी लहान असताना पुण्यात सुमारे दीड वर्ष राहिलो होतो. दर मंगळवारी चतुःशृंगी मंदिरात दर्शनाला जायचो. शाळेत एका ज्येष्ठ शिक्षकांनी लोकमान्य टिळकांबद्दल दिलेले व्याख्यान मी ऐकले होते. परंतु, इतक्या वर्षांनंतर याच ऐतिहासिक नगरीत टिळकांच्या नावाने मला सन्मानित केले जाईल, असा विचार मी कधीही केला नव्हता. हा पुरस्कार स्वीकारताना मी अत्यंत नम्रतेने नतमस्तक होत आहे.”

आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याचा खरा अर्थ पटवून देताना डोवाल म्हणाले की, स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनात येईल ते करणे नव्हे. आजच्या तरुणांनी राष्ट्रउभारणीच्या संकल्पनेत आपले योगदान दिले पाहिजे. “आपल्या कोणत्याही कृत्याने जर देशाचे नुकसान होत असेल, तर आपण त्या वाटेने अजिबात जाता कामा नये. जे राष्ट्रहित नाही, ते आपलेही हित असू शकत नाही. आज देशासमोर अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हाने आहेत. अशा वेळी सर्वांनी भेद विसरून एकजूट राहणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

पुण्याच्या शौर्य आणि विचारांच्या परंपरेचा गौरव करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे बाजीराव यांच्यापासून ते महर्षी कर्वे, गोपाळ गणेश आगरकर आणि सेनापती बापट यांच्या योगदानाचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देश आज सुरक्षित आणि सशक्त बनत असल्याचे सांगत, उपस्थितांना राष्ट्रसेवेचा संकल्प घेण्याचे आवाहन करून त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...