Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedVideo : शपथ देशसेवेची; 293 जवान देशसेवेत दाखल

Video : शपथ देशसेवेची; 293 जवान देशसेवेत दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अकरा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण मोठ्या जिद्दीने पूर्ण करत 293 जवान गुरुवारी देशसेवेत दाखल झाले.

- Advertisement -

मी देशाचे रक्षण करेल, मागे हटणार नाही अशा आशयाची शपथ धर्मगुरूंनी जवानांना दिली. सैनिकी जीवनास सुरुवात करणार्‍या देशाच्या विविध भागांतील जवानांना गुरुवारी नगर येथील एमआयआरसीत (मेकेनाईज्ड रेजिमेंट सेंटर) देशसेवेची शपथ देण्यात आली. आज गुरूवारी भल्या सकाळी सुरू झालेल्या या शानदार कार्यक्रमात लष्करी सेवा सुरू केलेल्या जवानांची शिस्तबद्धता त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसत होती.

लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी तसेच रेजिमेंटमधील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत या जवानांनी देश रक्षणाची व त्यासाठी आपले सर्वस्व समर्पित करण्याची शपथ घेतली. भारतीय लष्करातील महत्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या येथील एमआयआरसी येथे गुरूवारी लष्करात दाखल होणार्‍या जवानांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. शानदार संचलन करीत जवानांनी देशसेवेची शपथ घेतली. या कार्यक्रमात जवानांनी शानदार संचलन करत उपस्थितांची मने जिंकली.

लष्कराच्या पाइप बँडपथकाने सादर केलेल्या विजय भारत धूनवर जवानांचे आगमन झाले. त्यानंतर एमआयआरसी मध्ये 36 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एम 293 जवानांच्या तब्बल 6 तुकड्या संचलनासाठी मैदानावर आल्या. त्यानंतर एमआयआरसी संस्थेने लष्करासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आलेले निशाण (ध्वज) आणण्यात आले.

निशाणाचे आगमन झाल्यावर धर्मगुरुंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा व समर्पणाची शपथ दिली. जवानांचा शपथ सोहळा पूर्ण झाल्यानंतर संचलन सुरू झाले. सर्वांत पुढे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या 6 तुकड्या, त्याच्यामागे एमआयआरसीचे निशाण व बँडपथक आणि सर्वात शेवटी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या उर्वरीत तुकड्या असा संचलनाचा क्रम होता.

सैनिक कसा घडतो

देशसेवेसाठी सैन्यात भरती झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील अकरा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन सामान्य नागरिक सैनिक कसा घडतो याचा प्रत्यय उपस्थितांना सैनिकांच्या प्रत्येक कृतीत दिसत होता. सैनिकांकडून एक सुरात होणार्‍या हालचाली..परेड कमांडरच्या सूचनांचे तंतोतंत पालन.. एकाच वेळी दिली जाणारी सलामी.. कोणत्याही संकटाशी झुंजण्याची तयारी दर्शवत असलेले चेहर्‍यावरील भाव.. यातून त्यांच्या अंगी भिनलेल्या शिस्तबद्धतेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थितांमध्ये बरेच जण हा शानदार सोहळा पाहण्यासाठी प्रथमच आले होते. त्यांच्यामध्ये सैनिकाच्या या शिस्तबद्धत जीवनाची चर्चा होत होती. अशा जिगरबाज सैनिकांच्या हाती आपला देश सुरक्षित आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

जवानांचा गौरव

प्रशिक्षणा दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या 3 जवानांचा पदके देऊन सन्मान करण्यात आला. जनरल के. सुंदरजी ओव्हरऑल गोल्ड मेडल मुकेश सिग रावत यांना तर जनरल के. एल. डिसुझा सिल्व्हर मेडल हे जवान जॉय बोरा शिवशंकर, जवान शिवशंकर यांना पंकज जोशी ब्रॉझ मेडल देऊन गौरविण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या