Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजइथे बसून चर्चा संपणार नाही, बैठकीनंतर मार्ग निघेल…; संध्याकाळी राज्य सरकार, ओबीसी...

इथे बसून चर्चा संपणार नाही, बैठकीनंतर मार्ग निघेल…; संध्याकाळी राज्य सरकार, ओबीसी शिष्टमंडळासोबत चर्चा

जालना | jalana
राज्य सरकारचे शिष्टमंडळ ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या भेटीला आज सकाळी वडीगोद्रीत दाखल झाले. शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु हाके उपोषणावर ठाम आहेत. यावेळी हाके यांनी, ओबीसी आरक्षण सुरक्षित कसे? हे आधी सांगा, असा सवाल केला. सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत चर्चेचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार हाके यांचे ओबीसी शिष्टमंडळ आज सायंकाळी मुंबईत राज्य सरकारसोबत चर्चा करणार आहे.

आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, एवढे दिवस उपोषण करणे घातक आहे. सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी भूमिका आहे.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ. लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावे आणि सरकारशी चर्चा करावी. इथे बसून चर्चा संपणार नाही, बैठकीनंतर मार्ग निघेल. मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करून अन् मार्ग निघेल कुणावरही अन्याय करायचा नाही,असे आश्वासन मंत्री महाजन यांनी हाके यांना दिले.

त्यानंतर हाके यांनी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळास देत चर्चेची तयारी दर्शवली. आज सायंकाळी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात राज्य सरकार आणि हाके यांचे ओबीसी शिष्टमंडळ यांच्यासोबत मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.

लक्ष्मण हाके काय म्हणाले?
लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसी आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबत याबाबत नक्की भूमिका घ्या. आमच्या भवितव्याबाबत सामाजिक मागास घटकांत संभ्रम निर्माण झालाय. हा बांधवांचा रोष आहे, भावना आहे, मी मोठा माणूस नाही, आम्ही दोघे उपोषण करणारे मोठ्या बॅकग्राऊंडचे नसून सामान्य आहोत.

ओबीसी नेते आणि स्थानिक ओबीसी बांधवांनी एकत्र बसावे. आम्हाला उत्तर नाही मिळाले तर आंदोलन असेच सुरू राहिल असे म्हणत हाके यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. नेत्यांनी शपथ घेतलेली असते मग आमच्याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न हाकेंनी विचारला.

दरम्यान, कुणबी नोंदणी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम थांबवा, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी यावेळी शिष्टमंडळाकडे केली. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना लक्ष्मण हाके यांनी मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या