Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखजागलेल्यांचा जागर!

जागलेल्यांचा जागर!

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या दिमाखात आणि गाजावाजा करून साजरा केला जात आहे, पण भारताच्या एकता आणि अखंडतेला आव्हान देणार्‍या अनिष्ट घटनाही घडत आहेत, कदाचित घडवल्याही जात आहेत. होलिकोत्सव गेल्याच महिन्यात पार पडला, पण अमृतमहोत्सवी काळात देशभर विद्वेषाच्या होळ्या पेटवण्याचा इरादा ठेऊन समाजविघातक प्रवृत्ती अनेक राज्यांत हिंसा घडवून आणत आहेत. महाराष्ट्रातील वातावरण तर राजकीय संघर्षाने धगधगत आहे. किंबहुना महाराष्ट्र सतत धगधगतच राहावा यासाठी हरतर्‍हेचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत. जनतेच्या अथवा राज्याच्या हिताशी काडीचाही संबंध नसलेल्या गोष्टींना अकारण महत्त्व दिले जात आहे. प्रसंगी हनुमानाची मदतही घेतली जात आहे. अशा धगधगत्या वातावरणात 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरमध्ये करोनामुक्त आणि निर्बंधमुक्त वातावरणात सुरू झाले. याआधी दोन वर्षे रेंगाळलेले नाशिकचे करोनाबाधित साहित्य संमेलन चार महिन्यांपूर्वी निर्बंधांच्या चौकटीत उरकावे लागले होते. उदगीरच्या साहित्य संमेलनाची सुरूवात मात्र दणक्यात झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. नंतर पवार आणि संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांची भाषणे झाली. ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : काय गमावले? काय कमावले?’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनीही परखड भाषेत विचार मांडले. ठराविक विचारधारेला पोषक साहित्य निर्मिती करण्यावर काही घटकांचा भर आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे. देशात अशा विशिष्ट विचारधारेचा फसवा प्रचार फैलावत आहे. या धोक्यापासून साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी सावध राहावे, असा सल्ला पवार यांनी दिला. साहित्यिकांनी कोणत्याही विचारधारेला बांधील नसावे, असेही त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी प्रचलित व्यवस्थेवर थेट हल्ला चढवला. संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवला जात आहे की नाही याबद्दल मराठी साहित्य बोलत नाही, पण आता तर संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. बालबुद्धी विध्वंसकांच्या हाती समाजाच्या भवितव्याची सूत्रे नकळतपणे जात आहेत. अशा छद्मबुद्धी विध्वंसकांच्या ताब्यात आपण जात असल्याचे संकेत मिळत आहेत, असा घणाघातही सासणे यांनी केला. डॉ. जनार्दन वाघमारे माजी खासदार आहेत. त्यांनी तर राजकारण्यांवर थेट निशाणा साधला. स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणासाठी धर्म, मंदिरे यांचा वापर केला जात आहे. राजकारण्यांनी विश्‍वासार्हता गमावली आहे, असे डॉ. वाघमारे यांनी नमूद केले. स्वातंत्र्यानंतर देशात काहीच विकास झाला नाही, असा एकांगी प्रचार केला जात आहे. त्यातून मान्यवर नेत्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत प्रा. अजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. बहुतेक वक्त्यांच्या बोलण्यातून देशातील प्राप्त परिस्थितीबद्दलची चिंता व्यक्त झाली. भारतीय लोकशाहीला निर्माण झालेल्या धोक्याची जाणीवही व्यक्त केली गेली. सर्व वक्त्यांच्या भाषणांचा एकसूर जाणवला म्हणून ‘हे सगळे ठरवून केले गेले’ असाही बेसूर हा विचार न मानवलेल्या काही असंतुष्टांकडून निघणे साहजिक आहे. मात्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून वक्त्यांनी देशापुढील आव्हानांची जाणीव समग्र भारतीय समाजाला आणि प्रामुख्याने मराठीप्रेमींना करून देण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केला हेही लक्षात घेतले पाहिजे. ‘गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या. म्हणजे तो गुलामीविरुद्ध पेटून उठेल’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. बाबासाहेबांचा हा विचार अमलात आणण्याचे काम साहित्य संमेलनातील वक्त्यांनी निर्भीडपणे केले. ‘जागले’ असलेल्या साहित्यिकांनाही देशातील लोकशाहीच्या भवितव्याविषयी साशंकता वाटत असेल तर परिस्थिती खरोखरच काळजी करण्यासारखी आहे, असे समजायला हरकत नाही. महाराष्ट्र, दिल्ली, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांत हिंसक घटना घडत आहेत किंवा घडवल्या जात आहेत. अनावश्यक जुने मुद्दे उकरून वातावरण तापवले जात आहे. समाजा-समाजात तेढ निर्माण होईल, अशा गोष्टींना खतपाणी घातले जात आहे. हिंसक घटना घडवून त्यांचे भांडवल केले जात आहे. त्या-त्या राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करून राष्ट्रपती राजवटीची मागणी आणि प्रयत्न; दोन्हीही केले जात आहेत. राज्यपालांच्या हातून राज्य सरकारांच्या कारभारात हस्तक्षेप करून अडथळे आणवले जात आहेत. एका रात्रीतून राजाला रंक आणि रंकाला राजा करणारी जनता लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च असते. कोण काय करीत आहे? का करीत आहे? हे सगळे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ हे विधान त्रिकालाबाधित समर्पक आहे याची खात्री पटावी असेच एकूण सध्याचे देशातील वातावरण आहे का? याचा निर्णय योग्यवेळी नागरिकांच्या मतदानातूनच व्यक्त होईल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या