श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
आरणगाव दुमाले येथे शेतीच्या कारणावरून गणपत बजाबा शिंदे (वय 78) यांचा खून करणार्या आरोपी शिवराम मारूती शिंदे (वय 55 रा. अरणगाव दुमाला, ता. श्रीगोंदा) याला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील पुष्पा कापसे- गायके यांनी काम पाहिले. तसेच मूळ फिर्यादी तर्फे अॅड. एस. के. भोस यांनी सहकार्य केले. याबाबत सविस्तर माहिती अशी, मयत गणपत शिंदे व आरोपी यांची शेती शेजारी शेजारी होती व त्यांच्यात 7 ते 8 महिन्यापूर्वी रस्त्याच्या करणावरून वाद झाला होता. तसेच श्रीगोंदा तहसिलदार यांच्याकडे रस्त्याच्या प्रकरणावरून कारवाई चालू होती. 3 सप्टेंबर 2023 रोजी श्रीगोंदा तहसिलदार व महसूल कर्मचारी रस्ता पाहणीकरिता आले होते.
त्यावेळी तहसिलदार यांना आरोपी हा माझ्या हद्दीतून जायचे नाही असे म्हणाला होता. त्यानंतर तहसिलदार यानी वरील पाहणी करून निघून गेले. त्यावेळी आरोपी याने मयतास शिवीगाळ करून तुला पाहून घेतो असा दम देवून तेथून निघून गेला. त्यानंतर 25 सप्टेंबर 2023 रोजी मयत हे सकाळी 10 वाजता घरची जनावरे चारण्याकरिता त्यांच्या शेता शेजारील डोंगरावर गेले होते व त्यानंतर मयताचा मुलगा सकाळी 11 वाजता त्यांच्या पाठोपाठ राहिलेल्या गायी घेवून डोंगराकडे गेला. त्यावेळी मयताचा मुलगा वडिलांशी बोलला व तसाच डोंगराच्या वरील बाजुस गायी घेवून गेला. त्यानंतर दुपारी चारच्या दरम्यान डोंगरावरून खाली येत असताना त्यावेळी आरोपी शिवराम शिंदे हा वडिलापाशी आला त्यावेळी त्याच्या हातातील दगडाने गणपत शिंदे यांना मारत असताना मयत ओरडू लागले.
त्यावेळी मयताचा मुलगा खाली येवू लागला त्याला पाहून आरोपी तळाईचा डोंगराच्या बाजुने पळून गेला. त्यावेळी मुलाने वडिलांना पाहिले असता ते मयत झालेले होते. त्यानंतर झालेल्या घटनेबाबत मुलाने बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरचा खटला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश शेख यांच्या समोर चालला. सरकार पक्षाच्यावतीने एकूण 12 साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी तसेच डॉक्टर, नायब तहसिलदार मिलिंद जाधव, एस. पी. ऑफिस मधील आवक-जावक क्लार्क वैशाली सकट तसेच तपासी अधिकारी ए. पी. चाटे व पीए एफ. गजरे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.