Friday, May 3, 2024
Homeनगरकांद्याचे भाव कोसळल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पश्चिमेकडील पाचेगावमध्ये सध्या उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. या भागात कांदा लागवडी देखील मोठ्या प्रमाणात झाल्या. अगोदर नोव्हेंबरमध्ये कांदा लागवडी झालेल्या कांदा पिकांवर करपा रोगामुळे कांदा नांगरण्याची वेळ आली होती. त्यानंतर शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने परत कांदा लागवडी करून मजूर टंचाई, विजेच्या समस्या, महागडी रासायनिक खते व औषधे अशा सर्वांवर मात करून शेतकर्‍यांनी आपला कांदा आणला. मात्र, मातीमोल भाव मिळू लागल्याने कांद्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी उभे राहिले आहे.

- Advertisement -

सध्या उन्हाळी कांदा काढणीला वेग आला असला तरी शेतकर्‍यांच्या अपेक्षित उत्पन्नात निम्याने घट झाली आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकर्‍यांचा खर्च देखील निघणार नाही, असे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच कांद्याचा भाव अचानक घसरल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकीकडे भरमसाठ खर्च करून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आणि त्यात काढणी केलेल्या पिकाला भाव नाही.

सुरुवातीच्या कांद्याला बाराशे ते चौदाशे रुपये भाव जागेवर मिळाला. आता तर जागेवरील कांद्याला सातशे ते आठशे रुपये भाव मिळत आहे. अजून परिसरात बराच कांदा काढणी बाकी आहे. जवळपास एप्रिल महिन्यात सर्व शेतकर्‍यांचा कांदा काढून होईल, त्यावेळेस कांद्याच्या भावामध्ये अजून मोठी घसरण दिसून येण्याचे चिन्ह आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी धास्तावले आहेत. जिल्ह्यातील बरेच कांदा मार्केट अजून बंद आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट होत आहे. त्यामुळे सरकारने कांदा मार्केट लवकर चालू करावेत, जेणेकरून शेतकर्‍यांची आर्थिक लूट थांबली जाईल, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत.

माझे दरवर्षी साधारण एकरी उत्पन्न अठरा ते एकोणीस टनापर्यंत आहे. पण या लहरी वातावरणामुळे कांदा पिकाच्या उत्पन्नात निम्याने घट आली आहे. त्यात भरमसाठ किंमती वाढल्याने शेतकर्‍यांनी केलेला खर्च देखील निघणार नाही. यावर्षी शेतकर्‍यांना चांगले पाण्याचे स्रोत उपलब्ध असल्याने कांदा पीक या भागात जास्त झाले. तसेच शेतकर्‍यांना यावर्षी चांगला भाव मिळेल, ही अपेक्षा होती. पण उत्पन्न कमी व भाव नाही. त्यामुळे माझ्या बरोबर या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. जागेवर फक्त सात ते आठ रुपये दर त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत गेल्याशिवाय राहणार नाही.

– किशोर शिंदे, (पाचेगाव) शेतकरी

मी सुरुवातीला नोव्हेंबरमध्ये दहा एकर कांदा लागवड केली. त्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव येऊन माझे दहा एकर कांदा पीक नांगरावे लागले. दरवर्षी एकरी 16 टनापर्यंत उत्पन्न काढतो. पण आता लहरी वातावरणात शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे देखील उत्पन्न घटले आहे. यावर्षी मला आठ टनापर्यंत उत्पन्न मिळत आहे. यात खर्च देखील मिळणार नाही.

– मोहनराव घोलप, (पुनतगाव) शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या