Friday, November 22, 2024
Homeनगरनिर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याच्या दरात काहीशी वाढ

निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याच्या दरात काहीशी वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कांदा निर्यातबंदी हटवल्याने नगर जिल्ह्यातील तसेच नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांदा बाजारात परिणाम दिसू लागले आहेत. कांद्याच्या भावात काहीशी वाढ झाली आहे. कांद्याच्या बाजार भावात वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापार्‍यांची नाराजी अजूनही कायम आहे. कांदा निर्यातबंदी दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीत काल रविवारी कांद्याला 100 ते 2300 रुपयांचा क्विंटलमागे दर मिळाला. राहात्यात 400 ते 2600, पारनेरात 500 ते 2600 रूपये असा दर मिळाला. जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या दौंड-केडगाव येथे 700 ते 2600 रुपयांचा भाव मिळाला. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती कांद्याला मिळाला जास्तीत जास्त 2551 रुपये, तर सरासरी 2100 रुपये तर कमीतकमी 800 रुपये बाजार भाव मिळाला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यापूर्वी शेतकर्‍यांना गिफ्ट दिले आहे. कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. आता शेतकर्‍यांना कांदा निर्यात करता येणार आहे. 40 टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्याबंदीमुळे शेतकरी नाराज होते. नाशिक जिल्ह्यात हा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. तसेच 31 मार्च 2025 पर्यंत देशी चण्याच्या आयात शुल्कात सूट दिली आहे. हे बदल 4 मे पासून लागू होणार असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे. परंतु केंद्र सरकारने भारताच्या काही मित्र राष्ट्रांना कांदा पाठवण्याची परवानगी दिली होती. आता निर्यातबंदी उठवली आहे. यामुळे कुठे कांदा निर्यात करता येणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताने 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले होते. कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आता चार महिने 27 दिवसांनंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे. आता 40 टक्के ड्युटी व 550 डॉलर प्रति मेट्रिक टन शुल्क देय करता येईल. त्यामुळे विदेशात व्यापार्‍यांना कांदा निर्यात करता येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या