हिमाचल | Himachal
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्लू स्टारबाबत एक मोठे विधान केले आहे. ऑपरेशन ब्लू स्टार ही मोठी चूक होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या जीवाची किंमत चुकवावी लागली, असे खळबळजनक वक्तव्य माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका होण्याची शक्यता आहे.
१९८४मध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्करी कारवाई करणे चुकीचे होते, असे चिदंबरम यानी म्हटलेय. हिमाचल प्रदेशातील कसौली येथे खुशवंत सिंग साहित्य महोत्सवात माजी गृह आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हे विधान केले. पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या “दे विल शूट यू, मॅडम” या पुस्तकावरील चर्चेचे सूत्रसंचालन करत होते. इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार करण्याच्या निर्णयाची किंमत आपल्या जीवाने चुकवली, या बावेजा यांच्या विधानावर चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली.
नेमके काय म्हणाले पी चिदंबरम?
ऑपरेशन ब्लू स्टार ही एक गंभीर चूक होती. त्याची किंमत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या जीवाने चुकवली. १९८४ मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी केलेले ऑपरेशन ही एक चूक होती आणि त्या चुकीची किंमत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या जीवाने चुकवावी लागली, असे चिदंबरम म्हणाले. मला कोणत्याही आर्मी अधिकाऱ्याचा अथवा कारवाईचा अनादर करायचा नाही. पण सुवर्ण मंदिर पुन्हा ताब्यात घेण्याचा चुकीचा मार्ग होता. काही वर्षांनंतर आम्ही सैन्याला बाहेर ठेवून योग्य मार्गाने सुवर्ण मंदिर पुन्हा ताब्यात घेतले.
इंदिरा गांधींना दोष देता येणार नाही
ब्लू स्टार हा चुकीचा मार्ग होता. इंदिरा गांधींनी त्या चुकीची किंमत त्यांच्या जीवाने चुकवावी लागली. पण ही कारवाई सेना, पोलिस, गुप्तचर आणि नागरी सेवेचा संयुक्त निर्णय होता. त्यामुळे या निर्णयासाठी फक्त इंदिरा गांधींना दोष देता येणार नाही. दरम्यान मी पंजाबला अनेकदा येऊन गेलो आहे. मला हे वाटते की फुटिरतावादी आणि खलिस्तानी लोकांची घोषणा आता विरुन गेली आहे. या ठिकाणी मुख्य समस्या आर्थिक स्थिती आहे.
नेमके काय होतं ऑपरेशन ब्लू स्टार?
अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला ४० वर्षे झाली आहेत. खलिस्तान या वेगळ्या राष्ट्राची मागणी करणारे शीख अतिरेकी सुवर्ण मंदिरामध्ये तळ ठोकून बसले होते. या शीख अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई जून १९८४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या ऑपरेशनदरम्यान शेकडो सामान्य नागरिकांचा तसेच ८७ भारतीय जवानांचाही मृत्यू झाला होता. सुवर्ण मंदिर हे शिखांचे पवित्र धर्मस्थळ मानले जाते. या कारवाईमुळे या सुवर्ण मंदिराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, हे ऑपरेशन का करावे लागले आणि पुढे त्याचे भारतीय राजकारणावर गंभीर परिणाम झाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




