पुणे | Pune
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी घेणार? असा प्रश्न राजकीय नेत्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पडला होता. पण आता सर्व भारतीयांना आनंद देणारी बातमी समोर आली असून भारतीय सैन्याने बुधवारी (ता. 7 मे) मध्यरात्री १.३० वाजता पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक केले आहे. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेसाठी ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. भारतीय वायुदलाकडून जैश ए मोहम्मद, हिजबुल मुज्जाहिद्दीन, लश्कर ए तोयबाचे तळ उद्धवस्त करत मध्यरात्री दीड वाजता कारवाई करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यामध्ये एकूण २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामधील ६ जण महाराष्ट्रातील होते, दरम्यान भारताने केलेल्या या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर हल्ल्यात पुण्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
भारतीय सैन्याने केलेल्या या एअर स्ट्राइकनंतर पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या पुण्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे. जगदाळे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली असून मोदींनी आमच्या भावना जाणून घेतल्या. आमच्या समोरच आमचे कुंकू त्या दहशतवाद्यांनी पुसले. गोळ्या घालून त्यांनी माझ्या नवऱ्याला मारले. त्यामुळे आज पंतप्रधान मोदींनी या स्ट्राइकला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले, त्यासाठी त्यांचे धन्यवाद, असे जगदाळे यांच्या पत्नीने म्हटले आहे. तर, आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सरकारकडून श्रध्दांजली मिळाली असे वाटते आहे, अशी भावना मृत जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिने व्यक्त केली आहे. १५ दिवसात मिशन पूर्ण केले त्यासाठी मी सरकारचे आभार मानते, ज्या २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना आज श्रध्दांजली मिळाली आहे, अशी भावना यावेळी आसावरी जगदाळे हिने व्यक्त केली.
मृत जगदाळे यांच्या पत्नींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, हे जे ऑपरेशन सिंदूर झाले आहे, त्यातून त्यांनी त्या हल्ल्यातील सर्वांना श्रध्दांजली वाहिली आहे. आज पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन त्या दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला केला आहे, तो अतिशय योग्य आहे. हा धडा त्यांना देणे गरजेचे होते. मला खात्री होती, आम्ही मोदींच्या मुली आहोत, ते त्यांच्या मुलींना समजून घेतील अशी खात्री होती. याआधी झालेले उरी हल्ला झाला होता, त्यातून त्यांनी असे दाखवून दिले होते आम्ही करू शकतो. आताही मला खात्री होती, थोडा वेळ घेतील पण ते हल्ला करतील, असे जगदाळे यांच्या पत्नींनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा