Saturday, July 6, 2024
Homeनाशिकनाशिकमधील प्रस्तावित वाहतूक सिग्नल यंत्रणा रद्द करण्याचे आदेश

नाशिकमधील प्रस्तावित वाहतूक सिग्नल यंत्रणा रद्द करण्याचे आदेश

भाजप आ. फरांदे यांनी केली होती मागणी





नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

शहरातील विविध 22 ठिकाणी प्रस्तावित सिग्नल बसवण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी रद्द केले आहेत. मध्य नाशिकच्या भाजप आ. देवयानी फरांदे यांनी याबाबत मागणी केली होती.

शहरातील विविध 22 ठिकाणी सिग्नल बसवण्याचे आदेश सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा यांनी दिलेले होते. स्मार्ट सिटी योजना अंतर्गत याबाबत कार्यवाही करण्यात येत होती. शहरात बसवणार्‍या या सिग्नल पैकी तब्बल दहा सिग्नल हे गंगापूर रोड येथे बसवण्यात येणार होते. सप्तरंग चौक, विद्या विकास सर्कल, एबीटी सर्कल, हुतात्मा सर्कल, भोसला टी पॉइंट, मॅरेथॉन सर्कल , प्रसाद सर्कल दत्त चौक सर्कल, डी के नगर निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार होती.

गंगापूर रोड येथे बसवण्यात येणार्‍या दहा सिग्नलमुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहतूक थांबा निर्माण होणार होता, गंगापूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांच्या वेळेचे नुकसान होणार होते. अशा प्रकाराने नवीन दहा सिग्नल बसवण्याचे काम करण्यापूर्वी स्मार्ट सिटी योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीशी किंवा नागरिकांची चर्चा केलेली नाही.

यामुळे सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त करताना सदरची कामे तत्काळ रद्द करण्याची मागणी मनपा आयुक्त अशोक करंजकर व पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली. तसेच मंजूर काम एका ठिकाणी व काम सुरू दुसर्‍या ठिकाणी याबाबत आश्चर्य व्यक्त करताना अशा प्रकाराने परस्पर काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली.

यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त यांनी स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन करून अशा प्रकाराने काम केल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच नागरिकांची मागणी असणार्‍या केबीटी सर्कल खेरीज गंगापूर रोड परिसरातील इतर सर्व प्रस्तावित सिग्नल यंत्रणा रद्द करण्याचे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या