Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात आयटी कंपन्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन

नाशकात आयटी कंपन्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उपमहापौर असताना 2012 पासून नाशिकमध्ये आयटी हब ( IT Hub in Nashik ) व्हावा यासाठी प्रयत्नशील होतो. ते आयटी हब अखेर दृष्टिपथात आले असून केंद्रीय लघुउद्योगमंत्री नारायण राणे ( Small Industries Minister Narayan Rane ) यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये येत्या 1 मार्च रोजी बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांचे चर्चासत्र ( Seminars of IT companies ) आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राअंती महापालिका आणि काही आयटी कंपन्यांसमवेत करारदेखील केला जाणार आहे. आयटी हब साकारणारी नाशिक महापालिका ही देशातील एकमेव महापालिका ठरणार आहे, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

- Advertisement -

महापौर कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, भाजप उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, स्थायी समितीच्या माजी सभापती तथा नगरसेविका हिमगौरी आहेर-आडके तसेच महापालिकेतील नगररचना सहाय्यक संचालक हर्षल बाविस्कर, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.14) मुंबईत नारायण राणे यांची भेट घेत आयटी हबसाठी आयोजित केल्या जाणार्‍या चर्चासत्राचे निमंत्रण दिले. तर महापौर निवासस्थान ‘रामायण’ येथे संयुक्त पत्रकार परिषदेत महापौर कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

महापौर म्हणाले, नाशकातील शेकडो युवकांना रोजगारासाठी मुंबई, पुणे आणि बंगळुरू येथील आयटी कंपन्यांमध्ये जावे लागते. या भूमिपुत्रांना नाशकातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येथे आयटी हब व्हावे यासाठी आपण 2012 मध्ये उपमहापौर असताना संकल्पना मांडली होती. आयटी शिक्षण घेणार्‍या हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वॉकथॉनही आयोजित केली होती. यानंतर महापौरपद लाभल्यानंतर आडगाव शिवारात आयटी हब उभारण्याचा निर्णय घेतला. आयटी कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर उद्योगमंत्री राणे यांच्या उपस्थितीत 1 मार्च रोजी नाशकात आयटी कंपन्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

सुमारे 100हून अधिक आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभाग घेणार आहेत. या चर्चासत्राअंती काही आयटी कंपन्यांसमवेत करारही केला जाणार आहे, अशी माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली. या पत्रकार परिषदेप्रसंगी उपमहापौर भिकूबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, भाजप गटनेते अरुण पवार, प्रदीप पेशकार आदी उपस्थित होते. आयटी हबकरता महापालिकेने स्वारस्य देकार मागवल्यानंतर 335 एकर क्षेत्राच्या जागामालकांनी भाडेतत्त्वावर जागा देण्यास लेखी संमती दर्शवली आहे. आयटी डेव्हलपरमार्फत आयटी हबची उभारणी केली जाणार असून जागा 33 वर्षांच्या भाडेकरारावर आयटी कंपन्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यासाठी महापालिका आणि आयटी डेव्हलपर कंपनीसमवेत करार केला जाणार आहे. या डेव्हलपर कंपनीमार्फत आयटी कंपन्यांना भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिली जाईल. जागा मालकांना जागेचे भाडे दिले जाईल. केंद्र शासनाकडून आयटी हबमध्ये सुविधा केंद्र उभारण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी देण्याचे राणे यांनी मान्यकेले आहे.

आयटी हब उभारणारी नाशिक महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. आयटी हबसाठी महापालिका भूसंपादन करणार नाही तर भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिल्या जातील. आयटी हब विकासातून महापालिकेला प्रीमिअम शुल्कापोटी 300 कोटींचा महसूल उपलब्ध होईल. सुमारे दोन लाख युवकांना या आयटी हबमध्ये रोजगाराची संधी मिळेल.

– सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक
– Satish Kulkarni, Mayor, Nashik

- Advertisment -

ताज्या बातम्या