Friday, May 3, 2024
Homeनगरपारंपारिक वाद्य व संगीत देशाची जान - पद्मश्री विजय घाटे

पारंपारिक वाद्य व संगीत देशाची जान – पद्मश्री विजय घाटे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

संगीत क्षेत्रात काळानुरूप बदल हवाच मात्र हा बदल स्विकारताना पारंपारिक चांगल्या परंपरांना व संगीत कलेला विसरता कामा नये. संस्कार, संस्कृती, पारंपारिक वाद्य व संगीत देशाची जान आहे. त्यामुळे जगात भारताची मोठी शान आहे. ती आपण प्रत्येकाने जपलीच पाहिजे, असे प्रतिपादन जगविख्यात तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांनी केले.

- Advertisement -

पद्मश्री विजय घाटे शिर्डी येथे साई दर्शनाकरिता आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुरुवारी त्यांनी साई मंदिरात पहाटेची काकड आरतीचे वेळी तबलावादन सेवा साईचरणी अर्पण केली. तदनंतर साई समाधीचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांचे समवेत राकेश चौरसिया, साईनिर्माण उद्योग समुहाचे अध्यक्ष विजय कोते, डॉ. मंगेश गुजराथी, स्वप्नील खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पद्मश्री विजय घाटे म्हणाले, करोना महामारीनंतर प्रथमच साईदर्शनाला आलो आहे. साईबाबांचे दर्शनाने मनोभावना पूर्णत्वाची प्रचिती येते. बाबांच्या दर्शनाची नेहमीच आस असते. परंतू साईबाबा जेव्हा बोलवतील तेव्हाच शिर्डीला येणे होते. बाबांचे बोलणे केव्हा येते याची आतुरतेने वाट बघत असतो. साईबाबांचे बोलावणे आल्याशिवाय शिर्डीला येणे व दर्शन होणे नाही. साईबाबांचे आशीर्वाद व कृपा आहे. त्यामुळेच सर्व काही ठिक आहे. मला बालपणापासूनच संगीताची व वाद्य वाजविण्याची आवड आहे.

तीन वर्षाचा असल्यापासून कुठलाही क्लास न करता मी आपोआप तबला वाजवायचं शिकलो आहे. तालयोगी पंडित सुरेश तळवळकर माझे गुरु आहेत. अध्यात्मातून व धार्मिकस्थळी संगीताचा खर्‍या अर्थाने उगम झाला आहे. धार्मिक स्थळी असलेले संगीत काळानुरूप श्रोत्यांच्या पसंतीनुसार संगीत कला सुद्धा काहीशी बदलली. भारतीय संगीत जगात श्रेष्ठ असून संगीत व कला ही काहींकरिता साधना आहे तर काहींसाठी उपजीविकेचे साधन बनले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पंतप्रधान मोदींनी योगकलेकडे अर्थात योगाकडे अधिक लक्ष दिल्याने त्याचा देशाला व नागरिकांना फायदा झाला. तसेच पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घातल्यानंतर योगशिक्षण अभ्यासक्रमात आले. त्यासाठी पदवी कोर्स प्रशिक्षण सुरू झाले आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानंतर आता जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या शास्त्रीय संगीत व संगीत क्षेत्रातील कलेकडे शासनाने अधिक लक्ष घालावे व संगीत क्षेत्राला व त्यातील कलांना अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही यावेळी पद्मश्री विजय घाटे यांनी व्यक्त केली.

साई निर्माण उद्योग समुहाचे अध्यक्ष विजयराव कोते यांनी साईबाबांची शाल देऊन पद्मश्री विजय घाटे यांचा सत्कार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या