Wednesday, June 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : त्र्यंबकराजाचा असाही प्रसाद

पडसाद : त्र्यंबकराजाचा असाही प्रसाद

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा |
न पवे तो वैकुंठा कर्मजाड्य ॥ १ ॥
अहिंसेचें स्वरूप हेंचि हरिरूप |
न म्हणे हरि आप सर्व आहे ॥ २ ॥
नाहीं त्यांसि जय नुद्धरे सर्वथा |
हरिवीण व्यथा कोण वारी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे धरी गुरुचरणसोये |
तेणें मार्गें पाहे हरि सोपा ॥ ४ ॥

संत निवृत्तिनाथ महाराज यांचा हा अभंग त्यांची समाधी असलेल्या त्र्यंबकेश्वर गावातच भाविकाला झालेल्या अमानुष मारहाणीसंदर्भात अतिशय मार्मिक असून, यात भक्ती, अहिंसा आणि गुरुकृपेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. अर्थात, ज्या सुरक्षारक्षकांनी मारहाण केली व ज्यांनी या मारहाणीचे समर्थन केले अशी सगळीच मंडळी संतांच्याच भाषेत सांगायचे तर पाखंडी असल्यागत वर्तन करीत आहेत. ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वरला जेवढी प्रसिद्धी आहे, तेवढीच वारकरी समुदायात संत निवृत्तिनाथ महाराजांच्या येथील समाधीलाही आहे. जो काही प्रकार घडला, किंवा असले प्रकार घडणे हे जणू त्र्यंबकवासियांच्या व भाविकांच्याही अंगवळणी पडत चालले आहे. त्याबाबत व्यक्तीगणिक दुमत होऊ शकते. परंतु त्र्यंबकराजाच्या दर्शनाची आस धरून शेकडो किलोमीटरवरून आलेल्या आणि तरीही तासन्तास रांगेत असलेल्या अशा एखाद्या भाविकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे हे कोणत्याही सभ्यतेत बसत नाही, हे मंदिराच्या विश्वस्तांसह त्यांनी पाळलेल्या त्यांच्या बगलबच्च्यांनाही सांगण्याची वेळ आली आहे.

हे पवित्र कार्य आताच केले नाही तर सिंहस्थ काळात तर दंगलींनाच निमंत्रण ठरू शकेल. त्र्यंबकेश्वर येथे असल्या मारहाणीच्या प्रकारांची ही पहिलीच वेळ नाही. तरीही आजपावेतो त्यावर काही उपाय काढले गेले नाहीत. जे काही उपाय मध्यंतरी केले गेले ते त्याचीच ही परिणती असल्याने रोगापेक्षा इलाज जालीम ठरला आहे. मुळात काही विश्वस्तांनी संस्थान, पालिका तसेच पोलीस या खात्यांच्या काही कर्मचार्‍यांना हाताशी धरून येथे राजरोस धंदा मांडला आहे. काही पुरोहितांचीही त्याला साथ असल्यामुळेच शिपाई असलेलेही आलिशान गाड्या घेऊन कामावर येतात. सरकारी पाहुण्यांच्या तसेच प्रोटोकॉल म्हणजेच राजशिष्टाचाराच्या नावाखालीदेखील काही खात्यातील भामटे हात धुवून घेत आहेत. संतापाची बाब म्हणजे, पालिकेतील एका वरिष्ठ अधिकार्‍यानेही या वाहत्या गंगेत हात धुतल्याची आठवण लोक सांगतात.

दर्शनाची बारी जसजशी वाढत जाते तसतशी या मधल्या लोकांची आसक्ती वाढत जाते. पैसा फेको दर्शन करो, असा सारा मामला असतो. परिणामी, दूरदेशीवरून आलेले आणि दिवसभर उन्हातान्हात वा पावसात दर्शनासाठी रांगेत असलेले जेव्हा ही सारी दलाली उघड्या डोळ्यांनी पाहतात, तेव्हा त्यांचाही संयम सुटतो आणि मग अनवस्था प्रसंग घडतो. सुरक्षारक्षकांनाही खरे तर योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. त्र्यंबकेश्वर गावाच्या सुरुवातीलाच शेगावच्या संत गजानन महाराज ट्रस्टचे विश्रामगृह आहे. तेथील व्यवस्था पाहणार्‍यांना भेटून जरी शेगावीची दर्शन व्यवस्था माहिती करून घेतली तरी त्र्यंबकेश्वराला आलेल्या भाविकांच्या सहजसोप्या दर्शनाची आस पूर्ण करता येऊ शकेल. शेगावला कितीही गर्दी असली तरी अत्यंत शांतपणे रांगेत भाविक असतात. तसेच तेथे सेवा देण्यासाठी आलेले भक्तही भाविकांच्या सेवेत दंग असतात. कोणत्याही दिवशी व कितीही गर्दी असली तरी शेगावच्या संत गजानन महाराजांच्या दर्शनाला एक तासाहून अधिक वेळ लागत नाही. पुन्हा छदाम पैसाही कोणाला न देता.

येथे मात्र वाहनतळापासूनच भाविकांना हेरण्याची एक साखळीच कामाला लागते. वाहनतळ चेकनाका, लॉजिंग, चहा-नाश्ता हॉटेल हा सारा दर्शनासाठीचा चक्रव्यूह बनला आहे. एजंट लोक नेमकेपणाने भाविकांना हेरून दर्शनबारीजवळ नेतात आणि दर्शनाला सहा-सात तास लागतील अशी भीती दाखवून लागलीच मागच्या दाराने दर्शनाची व्यवस्था करवून देतात. तेथेही रजिस्टरवर काय दाखवायचे, कोणाचे पाहुणे म्हणून दाखवायचे, कोणाला फोन करण्याचे नाटक करायचे असे सगळे ठरलेले असते. भाविकांना खूश करण्यासाठी व्हीआयपी दर्शन बंद असल्याचे जाहीर केले जाते. प्रत्यक्षात ही सारी दिशाभूल असते. सीसीटीव्ही कक्षात यूट्यूबरला प्रवेश देऊन घडलेल्या घटनेचे राजकारण केले गेले. हे सारे कसे चालते? हे बेकायदेशीर असले तरी सगळेच एकमेकांना मिळालेले असल्याने भाविक येणार आणि मार खाऊन जाणार हे जणू ठरून गेले आहे. गेल्या वर्षी पत्रकारांनाच चेकनाक्यावरील गुंडांनी बेदम चोप दिला होता.

दूरचित्रवाणीचे पत्रकार असल्याने त्याची राज्यभर चर्चा झाली आणि साक्षात मुख्यमंत्री व इतर मंत्रिगणांनी त्याची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले. परंतु येथे सामान्य तर दररोजच असल्या अनेक प्रकारांना तोंड देत असतो. हे कधी थांबणार आहे की नाही? भाविक येतात, मार खातात, वाहनधारक पार्किंगला तोंड देतात. अशा कटू आठवणी घेऊन ते निघून जातात. अशाने त्र्यंबकचे नाव बदनाम होते, याची कोणालाच फिकीर नाही. प्रत्येकाला केवळ दामाजीपंताची पडलेली आहे. पैशाचा असा पाऊस पडत असतो म्हणूनच साध्या पालिकेच्या निवडणुकीतही कोट्यवधीच्या राशी उधळल्या जातात. सनातन धर्माच्या पवित्र ठिकाणी जर ही स्थिती आपण बदलू शकत नसू तर हिंदूंना जागे करण्यासाठी दिले जाणारे हाकारे काय कामाचे?

ताज्या बातम्या

Crime News : राहुरी कृषी विद्यापीठातील कंत्राटी मजुराची निर्घृण हत्या

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri महात्मा फुले कृषी विद्यापीठात (Mahatma Phule Agricultural University) कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण...