नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक
यंदा पावसाळा चांगला झाल्यामुळे शेतकरी खुशीत आहेत. पिकांना भावही बरे मिळत आहेत. कांद्याचा मात्र नेहमीप्रमाणे वांधा झालाय. देशी बाजारात भाव पडले. भरीस भर नाफेडची! ही संस्था खरोखरच शेतकर्यांच्या हितासाठी आहे की व्यापार्यांच्या, असा प्रश्न पडावा अशीच तिची तिरकी चाल असते. आतादेखील नाफेडने स्वत:चा कांदा बाजारात ओतला. कांद्याचे भाव दणयात आपटले. वास्तविक, कांदा भाव पडतात तेव्हा नाफेडने कांदा खरेदी करून बाजारात समतोल साधायचा असतो. अलीकडे मात्र नाफेडला या कर्तव्याची पुन्हा एकदा जाणीव करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. बाजार समित्यांनाही त्यांच्या स्थापनेमागील शेतकरी हिताचे तत्त्व नव्याने कानीकपाळी ओरडून सांगण्याची वेळ आली आहे. समस्त बाजार समित्या या जणू व्यापार्यांच्या बटीक झाल्यागत वागत असल्याचा बव्हंशी शेतकर्यांचा अनुभव सांगतो.
बाजार समित्यांवर शेतकर्यांचे प्रतिनिधी निवडून जातात तसेच व्यापारी, हमाल, मापारी आदींनाही प्रतिनिधित्व असते. अतिशय उत्तम व पारदर्शी अशी ही व्यवस्था. पण ती फक्त कागदावरच. प्रत्यक्षात शेतकर्याला किती व कसे छळायचे याचा जणू पणच उर्वरित मंडळींनी केलेला असतो. दररोज अशी शेकड्याने उदाहरणे मिळतील. पण शेतकर्याला आपल्यावरील अन्यायाला दाद मागण्याचीही सवड नसते. यासंदर्भात अत्यंत चीड यावी अशी एक घटना नुकतीच पिंपळगाव बसवंत बाजार समितीत घडली. या एका घटनेनेच शेतकर्याला ‘बळी’राजा का म्हणत असावेत याची प्रचिती येते. व्यापारी, समिती संचालक, कर्मचारी आणि राहाता राहिले पोलीस, असे सारेच कसे शेतकर्याच्या नशिबी राहू-केतू बनून एकाच वेळी येतात याचे हे संतापजनक उदाहरण. वडगाव पंगू ( ता. चांदवड ) येथील एका शेतकर्यावर टोमॅटो विक्रीसाठी आणल्यावर आलेल्या अभूतपूर्व प्रसंगाने अंगावर काटा उभा राहतो.
आपण खरोखरच स्वतंत्र भारतात राहतो की अजूनही पारतंत्र्यातच आहोत, असा प्रश्न पडावा अशी ही घटना आहे. शेतकर्याचा माल ठराविक भावाने खरेदी केल्यावर तो व्यापार्याच्या ठिकाणावर खाली करायला नेल्यानंतर भाव कमी करायला लावला. एकाने ऐकले नाही. पुन्हा मार्केटला माल आणला. पुन्हा तोच अनुभव. फक्त व्यापारी बदललेला. तिसर्यांदाही तोच अनुभव आल्यावर शेतकरी चिडला. व्यापार्याला तेच हवे होते. उभयतात प्रारंभी शाब्दिक व नंतर हाणामारी झाली. व्यापार्यांनी आपले बांधव बोलावून घेतले. शेतकर्याला उचलले. गाडीतून हाणामारी करत फिरवले. पोलीस ठाण्याला नेले तर तेथेही पोलिसी खायाचा प्रसाद शेतकर्यालाच. काही पत्रकार मध्ये पडल्याने संबंधित शेतकरी वाचला. ही बातमी समजल्यानंतर शेतकरीही गोळा झाल्याने पोलिसांनाही सबुरीने घ्यावे लागले. परंतु या सर्व प्रकारात बाजार समितीची जबाबदारी काहीच नव्हती का? संचालक अशावेळी काय करतात? ते शेतकर्यांचे प्रतिनिधी आहेत की व्यापार्यांचे दलाल? या प्रकरणात अद्याप तरी सभापती आमदार दिलीप बनकर यांनी लक्ष घातल्याचे दिसत नाही.
यानिमित्ताने बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांना सोसाव्या लागणार्या हालअपेष्टांना तोंड फुटायला हवे होते. शेतमालाचा लिलाव करतानाही व्यापारी मंडळी तो भाव पाडून घेण्यासाठी असंख्य लृप्त्या करतात. मुद्दाम वांदे काढतात. शंभर जुड्यांमागे पाच जुड्या मोफत घेण्याचा तर एव्हाना नियमच बनून गेलाय. बेदाणा मार्केटमध्ये तर दोन्ही हातांनी बेदाणे उधळले जातात. त्यात होणारी नासधूस शेवटी शेतकर्याच्याच नशिबात येते. कांद्याबाबत तर असंख्य भानगडी केल्या जातात. व्यापार्यांची रिंग हा तर आणखी एक वेगळाच फंडा! काही ठिकाणी शेतकर्यांचाही उतावीळपणा नडतो. परंतु असे अतिशहाणे शेतकरी अगदी मोजके असतात. एकतर ते नाडलेले, पिचलेले असतात. माल केव्हा एकदा खपतो आणि मिळालेला पैका घेऊन केव्हा घरी जाऊ अशी बव्हंशी शेतकर्यांची भावना असते. शासनाने शेतकर्यांना नाडले जाऊ नये म्हणून अनेक उपाययोजना जरूर केल्या आहेत. पण त्याची कितपत अंमलबजावणी होते हे कोण पाहणार? बाजार समितीने खरे तर शेतकर्यांचा विचार करून हे सारे गांभीर्याने पाहायला हवे. दुर्दैवाने तसे होत नाही.
व्यापार्यांनी माल खरेदी केल्यावर चोवीस तासांत शेतकर्याला पैसे अदा करावे लागतात. प्रत्यक्षात असे होते का हे पाहण्याची कोणतीही यंत्रणा नाही. शेतकरीदेखील गरजवंत असल्याने आज नाही तर उद्या मिळेल या भरवशावर थांबतो. काहीवेळा व्यापारीही गरजेपोटी शेतकर्यांना मदत करतात. पण अशांची संख्या कमी आहे. पूर्वी व्यापारी व शेतकरी यांचे संबंध चांगले असायचे. हल्ली व्यापार्यांमध्ये परप्रांतीयांचा भरणा झाल्यापासून याला गालबोट लागल्याचा आरोप केला जातो. तसे असेल तर बाजार समितीने त्यात लक्ष घालायला हवे. टोमॅटो व्यापारी माल खरेदी करतात आणि गाळ्यावर सर्रास वांदे काढून शेतकर्यांची लूटमार करतात. कुणी त्याला विरोध केला तर संघटितपणे त्याला हिसका दाखवतात, हा रोजचा अनुभव आहे. रोज मरे त्याला कोण रडे ही जगरहाटी असल्याने तो त्याचे बघून घेईल असे समजून शेतकरी भाऊबंदही दुर्लक्ष करतात. पण त्या दिवशी वडगाव पंगू येथील ऋषिकेश गोजरे या तरुणाने थोडी हिंमत दाखवून विरोध करण्याचा प्रयत्न केला तर एवढे रामायण घडले. एवढे सगळे घडूनही हाक ना बोंब! जणू काही घडलेच नाही. शेतकर्यांना वाली नसतो, असे म्हणतात त्याचे हे ज्वलंत उदाहरण.




