Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : पक्षांतराची उलटी गंगा

पडसाद : पक्षांतराची उलटी गंगा

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड व त्यांचे पती भाजपचे माजी नाशिकरोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वाजत-गाजत प्रवेश केला. समाज माध्यमांनी हा विषय चांगलाच गाजवला. ‘सगळे रस्ते रोमला जातात’ या उक्तीप्रमाणे सध्या जो उठतो तो भाजप किंवा शिंदे सेनेत जात असल्याने ही ‘उलटी गंगा’ कशी सुरू झाली? या अचंब्यातच या घटनेचे प्रसिध्दीमूल्य दडले आहे. भाजपत जाणे हल्ली सर्वांनाच, अगदी गुंडा-पुंडांनाही किती सोपे झाले आहे, हे आपण पाहिले आहेच; पण भाजपमधून बाहेर पडणे वाटते तितके सोपे नाही, याची जाण व भान असतानाही गायकवाड दाम्पत्य बाहेर पडले याचे विशेष कौतुक काहींना वाटते आहे. त्यामुळेच या घटनेला अमाप प्रसिद्धी मिळाली.

YouTube video player

उभयतांनी आपल्या पक्षत्यागाची कारणे सांगितली असली तरी कोणत्याही पक्षातून बाहेर पडणारे नेहमी अन्यायाचे तुणतुणे वाजवत असतातच, असे समजून या घटनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्यावर अन्याय झालेलाही असतो कदाचित, पण पर्याय मिळाल्यापर्यंत ही अन्यायाची कुणकुणही कोणाला लागत नसते. गायकवाड यांचे हे तिसरे पक्षांतर! खरे तर ते मूळचे शिवसैनिक! हेमंत यांनी शिवसेनेकडूनच सर्वप्रथम महापालिका निवडणूक लढवली होती. त्यात यश आले नाही. पुढे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून पत्नी सौ. संगीता यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश करून घेतला. हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला. त्यांची महापालिकेत दमदार एन्ट्री झाली. तेथेही त्यांचे नंतर बिनसले आणि गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तेव्हा चलती असलेल्या भाजपत प्रवेश करून पुन्हा विजय मिळवला. सलग दोनदा दोन वेगवेगळ्या पक्षांकडून विजय मिळवल्यानंतर आता पुन्हा तिसर्‍या पक्षात त्यांचा प्रवेश झाला आहे. त्यांच्या दृष्टीने हे स्वगृही परतणे आहे.

आगामी पालिका निवडणुकीत गायकवाड यांना पक्ष उमेदवारी देणार नव्हता, म्हणून त्यांनी पक्षांतर केल्याचा दावा भाजपने नेहमीच्या पद्धतीने केला आहे. समजा, हे खरे आहे असे मानले तरी त्यांना शिंदे सेनेचेही दरवाजे उघडे होते. त्यांना तर त्यांचीही थेट ऑफर होती. तरीही तिकडे न जाता ते मूळ शिवसेनेत गेले याला निश्चितच काही अर्थ असेल. शिवसेनेची शकले झाल्यानंतर संघटनाही विसविशीत झाली. अनेकांनी तर प्रभागात आपले पॅनल व्यवस्थित होईल की नाही, या भीतीपोटीच मध्यंतरी पक्षत्याग करून भाजप वा शिंदे सेनेला जवळ केले. अशा अत्यंत प्रतिकूल पार्श्वभूमीवर गायकवाड दाम्पत्य हे उबाठाचा पर्याय निवडतात, याचे अनेकांना आश्चर्य वाटते आहे. गंमत म्हणजे ज्या प्रभागातून ते विजयी होत आले, त्याच प्रभागात संभाजी मोरुसकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते चौथ्यांदा विजयी झालेले आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा तर आहेच, पण प्रभागात सातत्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते सतत सक्रियदेखील राहत असतात. त्यांच्या पराभवासाठी यापूर्वी काहींनी बरेच प्रयत्न केले, पण तरीही सरशी मोरुसकरांचीच! याच मोरुसकरांशी व आमदार राहुल ढिकलेंशी झालेल्या मतभेदामुळे उबाठात गेलेले गायकवाड त्यांनाच आव्हान देऊ पाहत आहेत.

हेमंत गायकवाड यांनी मोरुसकरांच्या विरोधातच उमेदवारी करण्याचा व विजय खेचून आणण्याचा पण केलाय. ते बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांचे नातेवाईक व समर्थक म्हणून पूर्वी त्यांची ओळख होती. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत दत्ता गायकवाड शिवसेनेचे उमेदवार असताना त्यांच्या प्रचाराचे व्यवस्थापन हेमंत यांच्याकडे होते. त्याचदरम्यान काही मतभेद झाले आणि हेमंत यांनी दत्ता गायकवाड यांची साथसंगत सोडली. पुढे त्यांनी शिवसेनेचाही त्याग करून मनसेत प्रवेश केला. तेथे पाच वर्षे काढल्यानंतर मोरुसकरांच्याच जवळीकीने भाजपत प्रवेश केला. मधल्या काळात दोन्ही गायकवाडांमध्ये विस्तवही जात नव्हता. देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीत या मतभेदाचे परिणाम बघायला मिळाले. काळ हे फार जालीम औषध असते, असे म्हणतात. गायकवाड यांचे पुन्हा एक होणे ही त्याची जिती-जागती प्रचिती म्हणावी लागेल. कारण मध्यंतरी या उभयतांमध्ये एवढे वितुष्ट आले होते की, ते पुन्हा एकत्र येऊ शकतील याची कल्पना दोघांच्याही समर्थकांनी स्वप्नातही केली नव्हती.

असो, राजकारणात काहीही घडू शकते, यावर अशाच घटनांमुळे विश्वास ठेवावा लागतो. गायकवाड यांना भाजपमधून जो काही कथित त्रास झाला त्याचे कवित्व आणखी काही दिवस निश्चितच चालेल. परंतु शहरात गायकवाडांसारखे अनेक जण पोळलेले आहेत. तेदेखील तीच वाट धरतात का, ते पाहावे लागेल. मध्यंतरी पोलिसी कारवाईत ज्या पद्धतीने इतर पक्षांतून आलेले व पक्षातच असलेल्या नेते व कार्यकर्त्यांना भाजपने वार्‍यावर सोडून दिले. त्यामुळे अनेक जण धास्तावले आहेत. सुनील बागुल, जगदीश पाटील, उद्धव निमसे यांच्यासारख्यांची जर अशी परिस्थिती होत असेल तर आपले काय, या विचाराने काही जणांनी आतापासूनच पर्यायांची चाचपणी सुरू केल्याचे कळते. असे असले तरी केवळ गायकवाड यांच्या पक्षांतराने लागलीच भाजपमधील नाराजांची उबाठात रीघ लागेल, असे समजणे बाळबोधपणाचे ठरावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारीवरून घमासान होईल तेव्हाच खरी पक्षनिष्ठा कळेल. तोपर्यंत तरी गायकवाड यांचे पक्षांतर ही दिशा अनेकांना खुणावत राहील. दिवाळीनंतर कदाचित काही फटाके फुटतील अशी चर्चा आहे. फक्त हे फटाके लवंगी की सुतळी बॉम्ब असतील, एवढेच पाहायचे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...