Friday, April 24, 2026
Home Blog Page 13330

प्रयोगशील शेतीकडे शेतकर्‍यांचा कल; शेतकरी झाले मार्गदर्शक; अवकाळीत लाखमोलाची साथ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । दिनेश सोनवणे

नाशिक जिल्ह्यात आदिवासी दुर्गम भाग वगळता सर्वच तालुक्यांत सधन शेती केली जाते. आर्थिक मंदी, घटलेले रोजगार यामूळे सुशिक्षितांनीदेखील वडीलोपार्जित शेतीत बदल करत चांगले उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली. प्रयोगशील शेती साकारत अनेक शेतकरी इतर शेतकर्‍यांना मोफत मार्गदर्शनदेखील करत आहेत. यामूळे स्वतःसोबतच इतर सहकारी शेतकर्‍यांच्या उत्पन्नतात वाढ झाली असून याद्वारे आर्थिक विकास साधला जात आहे.

वातावरणीय बदलांमूळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला आहे. मात्र, खचून न जाता दिंडोरी, निफाड, सिन्नर तसेच कसमादेमधील शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा उभारी घेत शेतीत नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली आहे. शेतकरी आता माती आणि पाणी परिक्षण करुन शेतीतील पिकांना आणि जमीनीला गरजेूनसार खत खाद्य देऊ लागले आहेत. परिणामी उत्पन्नात भर पडलेली दूसरीकडे खत खाद्यांवरील अमाप खर्चही काही अंशी कमी झाला असल्याचे शेतकरी सांगतात.

दुसरीकडे अनेक शेतकर्‍यांनी शेतीपुरक जोडधंद्यालाही पसंती दिली आहे. यामध्ये पोल्ट्री व्यवसाय, दुग्धोत्पादन, काही ठिकाणी अंड्यांचे पोल्ट्री आता वाढू लागलेले दिसून येतात. अनेक शेतकरी पोल्ट्रीसाठी लागणारे खत (फिड) तयार करण्यासासाठी पुढाकार घेऊन चांगले अर्थार्जन यातून मिळवत असल्याचे दिसून येते.

नियमित असलेल्या शेतीपिकांसोबत आता शेतकर्‍यांनी इतर शेतकर्‍यांच्या मदतीने पिकांमध्येही बदल करण्यास सुरवात केली. आपल्या परिसरातील पिकपद्धती बदलू शकते याची माहिती शेतकर्‍यांना झाली. नवनव्या प्रयोगातून आर्थिक गणित शेतकरी जूळविण्यासाठी प्रयत्न करताना नजरेस पडतात.

कसमादेमधील शेतकरी निर्यातक्षम डाळींबाचे उत्पादन गेल्या अनेक वर्षांपासून घेतले. यामध्ये सुरुवातील मोजक्याच शेतकर्‍यांना दर्जेदार उत्पन्न मिळत होते. मात्र, यानंतर हळूहळू बदल झाले, इतर शेतकर्‍यांनी या शेतकर्‍यांचे मार्गदर्शन घेऊन पिकपद्धतीत बदल केला. याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढे त्यांनीही इतरांना मार्गदर्शन करून हातभार लावला परिणामी हा सर्व परिसर डाळींबाचे दर्जेदार उत्पादन घेणारा परिसर म्हणून नावारूपाला आला.

सेंद्रीय शेतीला पसंती
एकरी शेतीच्या एकूण खर्चापैकी ३० ते ४० टक्के खर्च रासायनिक खतावर होतो. शेतात शेणखत, गोबर गॅसची स्लरी, लेंडीखत व गांडूळ खताचा वापर वाढवल्याने खर्चात घट होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर आता शेतकरी सेंद्रीय शेतीलाही पसंती देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, सेंद्रीय शेतीतून आरोग्याला धोका कमी असल्याने सेंद्रीय उत्पादनास अलिकडच्या काळात मागणीही वाढलेली दिसून येते.

जैविक खतांचा वापर लाभदायी
जैविक खताचा वापर करुन यंदाच्या अवकाळीवर मात केली. अजूनही माझी द्राक्षबाग सुस्थितीत आहे. माझा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मी एवढ्यावरच थांबलो नाही, तर सोशल मीडियाद्वारे, द्राक्ष विज्ञान मंडळाच्या माध्यमातून हजारो शेतकर्‍यांचा मार्गदर्शन केले. जिवाणूयुक्त बुरशीनाशके वापरून द्राक्षबागेतून डावणी हद्दपार केला आहे.डॉ. वसंत ढिकले, शेतकरी, सैय्यद पिंप्री

मार्गदर्शन महत्त्वाचे
बदलत्या वातावरणामूळे शेती आता तोट्याची झाली आहे. मात्र, वेळोवेळी शेतीत मार्गदर्शन जमेची बाजू असून अनेक शेतकर्‍यांनी यातून दर्जेदार उत्पन्न मिळवले आहे. मोसम खोरे डाळींबाचा यशस्वी बेल्ट म्हणून ओळखला जातो. बागलाण पासून हॉलंडपर्यंत येथील डाळींब पोहोचले आहेत, केवळ शेतकर्‍यांचेच शेतकर्‍यांना वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यासाठी कारणीभूत आहे असे मी म्हणेल.
लोटन जाधव, शेतकरी, बिजोटे (ता. बागलाण)

अवकाळी बाधित ४९ हजार शेतकर्‍यांना ३२ कोटींचे वाटप; मदत प्रक्रियेला वेग

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

अवकाळी पावसाने बाधित शेतकर्‍यांना मदत म्हणून जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात शासनाकडून १८१ कोटी ५० लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. यातून आठ तालुक्यातील ४९ हजार शेतकर्‍यांना ३२ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. बाधित शेतकर्‍यांच्या खात्यावर ही मदत वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित बाधित शेतकर्‍यांना देखील तत्काळ मदत देण्यासाठी महसूल यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.

ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या अवकाळी पावसाने ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टवरील पिके आडवी झाली. भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ६३६ कोटींची आराखडा शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १८१ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार आणि खरीप पिकांसाठी 8 हजार रुपये मदत जाहीर झाली आहे. पण त्यात २ हेक्टरपर्यंतची आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच मदतीची अट घातली.

त्यानुसार २ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले असले तरीही संबंधित शेतकर्‍यास २ हेक्टरच्या मर्यादेतच भरपाई दिली जाईल. याप्रमाणे महसूल आणि कृषी विभागाने लागलीच पात्र शेतकर्‍यांची निश्चित करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत १ लाख २३ हजार शेतकर्‍यांची वर्गीकरण पूर्ण झाले आहे. त्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार ५ लाख ५१ हजार ११६ हेक्टरवरील ७ लाखांवर शेतकर्‍यांना ही मदत मिळू शकेल. शनिवार (दि.३०) पर्यंत ४९ हजार २६३ बाधित शेतकर्‍यांंच्या खात्यावर ३२ कोटी ६५ लाख २८ हजार वर्ग करण्यात आले आहे. उवर्रित बाधित व मदतीसाठी प्राप्त शेतकर्‍यांना एक ते दोन आठवड्याच्या आत मिळण्याची चिन्हे आहेत.

तालुकानिहाय बाधितांना प्राप्त मदत  (लाखात)
तालुका               शेतकरी                           रक्कम
मालेगाव             14390                           140.02
बागलाण               8675                           715.91
दिंडोरी                   5595                          703.83
देवळा                    6563                          599.01
सुरगाणा                2620                          148.56
चांदवड                  1825                          187.53
येवला                   1333                           128.58
सिन्नर                  8262                           641.84

‘महारेरा’च्या नोंदणीतून घरांच्या विक्रीत पारदर्शकता; ‘क्रेडाई’, ‘नरेडको’, ‘बिएआय’ या सघटनाच्या गटांद्वारे होणार सदस्यत्व नोंदणी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी
‘महरेरा’ व ’नरेडको’ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागातील रेरा अंतर्गत प्रकल्पांसाठी एकदिवसीय कार्यशाळा महारेराचे मुख्य तांत्रिक अधिकारी डी. आर. हाडदरे, व वरिष्ठ तांत्रिक सल्लागार आकाश चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
नाशिक विभागातील २००० पेक्षा जास्त नोंदणीकृत प्रकल्पांच्या अद्यावत माहिती न भरलेल्या प्रकल्पातील त्रुटींच्या निवारणार्थ विशेष कार्यशाळा झाली.यावेळी नरेडको पदाधिकारी, सभासद तसेच चार्टर्ड अकॉउंटंट, इंजिनिअर्स, असे सुमारे २५० प्रतिनिधी उपस्थित होते.

‘महारेरा’ प्राधिकरणाने राज्यात ‘क्रेडाई’, ‘नरेडको’ व ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडीया’ यांचे संघटन तयार केले आहे. याच वेळी नरेडकोला १८ ऑक्टोबर २०१९. पासून सेल्फ-रेग्युलेटरी संस्था(‘एसआरओ’ ) म्हणून मान्यता दिलेली आहे. एसआरओ उद्योगात संघटनात्मक बदल घडवून आणण्यासाठी विकसकांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या अंमलबजावणीसाठी महत्वाचा दुवा ठरणार असल्याचे नरेडकोचे राज्याचे उपाध्यक्ष हितेश ठक्कर यांनी सांगितले.

‘महरेरा’ प्राधिकरणाकडून बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यामध्ये सलोखा निर्माण होण्याकरिता सलोखा समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीत नरेडको नाशिकच्या अविनाश शिरोडे, राजन दर्यानी, मोहन रानडे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रस्तुत कार्यशाळेकरिता महाराष्ट्र शासनातंर्गत असलेल्या बांधकाम व इतर बांधकाम बोर्ड यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या बांधकाम मजुरांकरिता उपलब्ध विमा योजनेची माहिती देण्यात आली.

यामध्ये संपूर्ण कुटुंब विमा व घर घेण्यास सवलत, तसेच बांधकाम प्रकल्प स्तरावर कार्यरत मजुरांकरिता विशेष स्किल ट्रेनिंग उपक्रमाची माहिती संबंधितांना देण्यात आली.प्रत्येक प्रकल्पावर प्रशिक्षित कामगारांनाच कामावर ठेवण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षण देण्याची सोयही करण्यात आलेली आहे. त्यांना सेफ्टी किटही दिले जाणार असल्याचे महारेराचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार आकाश चौहान यांनी सांगितले.

‘क्रेडाई’चे आवाहन
रेरा महारेरा महाराष्ट्र ही बांधकाम व्यावसायिकांची राज्यस्तरीय संघटना असून, ५५ शहरांमध्ये २६५० बांधकाम व्यावसायिक त्याचे सभासद आहेत. संस्था राज्यभर कायदेशीर बांधकामे करण्यावर भर देत असून सरकारबरोबर लोकाभिमुख धोरणे तयार करण्यात पुढाकार घेत असते. नुकतेच महारेराने क्रेडाई महाराष्ट्राला राज्यातील पहिली स्वयंनियामक शिखर संस्था म्हणून मान्यता दिली असल्याचेही नाशिक अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी सांगितले.

या संघटनेने स्वयंनियामक संस्थेसाठी असलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून महारेराच्या निकषांनुसार सभासदांच्या किमान ५०० प्रकल्पांची नोंदणी केली आहे. राज्यातील सर्व प्रकल्पांना महारेराकडे नोंद करतेवेळी स्वयंनियामक संस्थांची निवड करणे अनिवार्य केले आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये अधिक पारदर्शकता, शिस्त, एकसूत्रीपणा येऊन फसवणुकीला आळा बसेल, असेही उमेश वानखेडे यांनी सांगितले.

ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पो दिनांक १४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान 

केंद्र शासन अंकित गृहनिर्माण मंत्रालय व नरेडको वेस्ट आणि इतर ट्रेड असोसिएशन मिळून प्रथमच ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पो दिनांक १४ जानेवारी ते २६ जानेवारी यादरम्यान आयोजित करण्यात येणार आहे, याची विस्तृत माहिती देण्यात आली. प्रथमच आयोजित होणार्‍या ऑनलाइन एक्स्पो करीत ग्राहकांना तत्काळ बांधकाम प्रकल्पांचे सादरीकरण फोटो व व्हिडिओ माध्यमाद्वारे देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जगभरातील ग्राहकांना घरबसल्या घर नोंदणी करणे सूलभ राहणार असून, त्यासोबतच बँकिंग प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेत नरेडको नाशिकचे अभय तातेड, सुनील गवादे, जयेश ठक्कर, अविनाश शिरोडे, अभय साखरे, अमित रोहमारे, मंनू चंगराणी, शंतनू देशपांडे व पदाधिकारी, सभासद यांनी सहकार्य केले.

कर्जमाफी मिळाल्यास जिल्हा बँकेला चांगले दिवस

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देत विधानसभेच्या रणांगणात उतरलेल्या शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत माहिती मागविली असून, संकटातील शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यानुसार राज्य शासनाकडून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकीत कर्ज,पीक कर्जाची माहिती मागविण्यात आल्याचे वृत्त आहे. या निर्णयाची अमलबजावणी झाल्यास आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेला ‘अच्छे दिन’येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा बँकेकडे शेतकर्‍यांच्या कर्जाबाबत शुक्रवारी सविस्तर माहिती मागविण्यात आली. शासनाने ३१ ऑक्टोबर २०१९ अखेरची थकबाकीबाबतची माहिती मागविली असल्याचे पत्र आले आहे. या पत्रानुसार, बँकेकडून माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत,शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्यातही सत्तेत आल्यास शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर, लागलीच कर्जमाफी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात सर्व अधिकार्‍यांकडून माहिती मागविली आहे, विचारपूर्वकपणे कर्जमाफी दिली जाणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर, राज्य शासनाकडून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे.

तर जिल्हा बँकेला दिलासा
नोटाबंदीनंतर जिल्हा बँक आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. भाजप सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा अल्पसा दिलासा या बँकेला मिळाला. मात्र, ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी बँकेला किमान अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची नितांत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने सातबारा कोरा करण्याचा निर्णय घेतल्यास बँकेचा भार काही प्रमाणात हलका होऊ शकतो. तसेच शेतकर्‍यांनाही दिलासा मिळणार असल्याने बँकेचे थांबलेले आर्थिक चक्र पुन्हा गतिमान होईल. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यास शेतकर्‍यांबरोबरच जिल्हा बँकेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अशी आहे थकबाकी
जिल्हा बँकेच्या एक लाख ८२ हजार ९९० सभासदांकडे ३१ ऑक्टोबर अखेर २५१४.१७टी कर्ज येणे बाकी आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात १४ हजार ११६ सभासदांकडे ३८६ कोटी कर्ज बाकी आहे. बँकेकडून एकूण १ लाख ६८ हजार सभासदांकडे २१२८.८० कोटींची थकबाकी आहे. यात अल्पमुदतीचे १ लाख ६५ हजार सभासदाकडे १८२१.७६ कोटी, मध्यम मुदतीचे २ हजार ५९२ सभासदांकडे २७८ कोटी तर, दीर्घमुदतीचे(थकित कर्ज) ३४८ सभासदाकांकडे २७ कोटींची येणे बाकी आहे.

नव्या ३१ महाविद्यालयांना मान्यता; पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत महाविद्यालये सुरू होणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नाशिक, पुणे व नगर या तीन जिल्ह्यात ३१ महाविद्यालये सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. या ३१ महाविद्यालयांत नाशिकमधील पाच ते सहा महाविद्यालयांचा समावेश असल्याचे समजते. विद्यापीठाअंतर्गत तीन जिल्ह्यांमध्ये सध्या सुमारे ६५० महाविद्यालये, २५० इन्स्टिट्यूट, संशोधन संस्था अशा सुमारे १ हजार संस्था असून, त्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या काही काळात व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असला तरी अद्यापही कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे कमी झालेले नाही.

राज्य शासनाने १५ सप्टेंबर २०१७ ला काढलेल्या शासन निर्णयानुसार नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाविद्यालयाची इमारत, पायाभूत सुविधा, फिक्स डिपॉजिट यासह ११ मुद्यांचा समावेश केला आहे. त्यानुसार महाविद्यालयांकडून विद्यापीठांकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यास व्यवस्थापन परिषद सर्व निकषांची व कागदपत्रांची तपासणी करून हे प्रस्ताव मान्य केले जातात. त्यानंतर राज्य शासनाकडून यास अंतिम मंजुरी दिली जाते.

पुणे विद्यापीठाने नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यामध्ये विद्यापीठाकडे एकूण ३९ महाविद्यालयांचे प्रस्ताव आले होते. त्यातील २९ प्रस्ताव पुणे, नगर ४, तर नाशिकमधून ६ महाविद्यालयांसाठीचे प्रस्ताव होते. ३९ पैकी ३६ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे, तर ३ प्रस्ताव विधी महाविद्यालयांचे होते. हे प्रस्ताव नोव्हेंबर संपण्यापूर्वी राज्य शासनाकडे दाखल करणे आवश्यक होते. त्यामुळे (शुक्रवारी) पुणे विद्यापीठात तातडीने व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली. त्यामध्ये अपूर्ण कागदपत्र व त्रुटींमुळे आठ प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. मंजूर झालेले ३१ प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

२१ पोलीस निरीक्षकांची खांदेपालट

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयुक्तालयातील २१ पोलीस निरीक्षक आणि १५ सहायक पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय कारणास्तव खांदेपालट केली आहे. दरम्यान, पंचवटी, म्हसरुळ, उपनगर व अंबड या पोलीस ठाण्यांसह शहर वाहतूक विभागातील एक अशा पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचीही अंतर्गत बदली करण्यात आली आहे.

पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क आधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांची शहर वाहतूक शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांची वाहतूक शाखेच्या प्रशासन विभागात बदली झाली आहे. तसेच वाहतूक शाखेतील वरीष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांची अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांची पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रशासन विभागात बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांची तक्रार निवारण कक्षात तर सुभाष देशमुख यांची दहशतवाद विरोधी पथकात बदली झाली आहे.

वाहतूक शाखेत कार्यरत असलेले वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांची म्हसरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली असून म्हसरूळचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांची वाहतूक शाखेच्या जागरुकता अभियान-प्रशिक्षण शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांची तांत्रिक विश्लेषण शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेतील सुरेंद्र सोनवणे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

तक्रार निवारण कक्षातील किशोर मोरे यांची विशेष शाखेत, दहशतवाद विरोधी पथकाचे राजेश आखाडे यांची नियंत्रण कक्षात, विशेष शाखेचे निलेश माईनकर यांची शहर वाहतूक शाखेत, पोलीस मुख्यालयातील विजय पन्हाळे यांची सरकारवाडा पोलीस ठाण्यात तर वाचक शाखेच्या पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांची निर्भया पथक, महिला सुरक्षा विभागाच्या प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासह दंगल नियंत्रण पथकाचे अनिल पवार यांची शहर वाहतूक शाखेत, तांत्रिक विश्लेषण शाखेतील इरफान शेख यांची पोलीस आयुक्त यांचे वाचक म्हणून बदली झाली आहे.

या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या(एपीआय) बदल्या
पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील १५ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यातील १२ आधिकार्‍यांच्या बदल्या पदोन्नतीवर पदस्थापना आवश्यक असल्याने करण्यात आल्या असून इतर ४ बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षा विभागाच्या भावना महाजन यांची पोलीस आयुक्त कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी(पीआरओ) म्हणून बदली झाली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे अशोक काकवीपुरे आणि शांताराम डंबाळे यांची अनुक्रमे सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांची अंबड पोलीस ठाणे, महेश येसेकर यांची आर्थिक गुन्हे शाखा, दिनेश खैरणार यांची गुन्हे शाखा, सत्यवान पवार यांची पंचवटी पोलीस ठाणे, प्रविण सूर्यवंशी गंगापूर पोलीस ठाणे, यतिन पाटील यांची सरकारवाडा, साजिद मन्सुरी यांची मुंबई नाका, हेमंत नागरे यांची सातपूर, प्रकाश गीते यांची देवळाली कॅम्प, सुधीर पाटील यांची म्हसरूळ, चंद्रकांत सपकाळे यांची अर्थिक गुन्हे शाखा, सुरेश कोरबू यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

नाशिककरांसाठी इराकहून आलेल्या पवित्र ‘गलेफ’ चे ८ डिसेंबर पासून मिळणार दर्शन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जुने नाशिक । प्रतिनिधी

इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू पिराने पीर रौशन जमीर बडे पीर हजरत गौस-ए-आझम यांच्या पवित्र जयंतीनिमित्त येथील खडकाळी मशिदीत दोन दिवस बगदाद शरीफ (इराक) येथील पवित्र मजार शरीफवरुन आलेल्या पवित्र ‘गलेफ’ (इस्लामी चादर) चे भाविकांना दर्शन मिळणार आहे.

मागील पांच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. यंदाही खडकाळी मशिदच्या आवारात हजरत गौस-ए-आझम व इमामे आझम हजरत अबू हनिफा यांच्या पवित्र मजार शरीफवरुन आलेल्या गलेफचे भाविकांना दर्शन देण्याचा कार्यक्रम रविवारी (दि.८) सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होणार आहे. तर सोमवारी (दि.९) रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे. या दरम्यान फक्त पुरुषांना प्रवेश राहणार असून दर्शन घेऊन प्रार्थना करण्यासाठी व बसण्याची विशेष सोय करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ धर्मगुरू हजरत अब्दुल मजीद सालीमुल कादरी यांनी नाशिककरांसाठी खास बगदाद शरीफहून नाशिकचे मरहूम हनिफ पाटकरी यांच्याकडे गलेफ पाठवले होते. पाटकरी परिवार व परिसरातील तरुणांच्या वतीने दर्शनाचा कार्यक्रम अखंडित सुरू असल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मशिदीचे इमाम मौलाना अब्दुल रशीद मुक्तदी, असलम खान, जुबेर सय्यद, गुलाम गौस पाटकरी यांनी केले आहे.

ज्येष्ठ धर्मगुरू हजरत गौस-ए-आझम यांची जयंतीप्रीत्यर्थ सोमवारी चौक मंडई येथून जुलुसे गौसीयाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त शहरपरिसरातील मुस्लीम बहुल भागात सजावटीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मशिदी, दर्गा शरीफसह मुस्लीम बांधवांची घरे व दुकानांवर विद्युत रोषणाई केली आहे. दरवर्षी इस्लामी रब्बीउल सानी महिन्याच्या ११ तारखेला जयंती जगभर साजरी होते. नाशिकमध्ये जयंतीनिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१ डिसेंबर २०१९, रविवार, शब्दगंध

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

‘नियोजन’च्या पाच जागांसाठी 24 डिसेंबरला पोटनिवडणूक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कार्यक्रम जाहीर : उद्यापासून उमेदवारी अर्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन मंडळाच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी 24 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवारपासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजनच्या जिल्हा परिषद (ग्रामीण निर्वाचन क्षेत्र) यामधून राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटातील सदस्य शिवाजी गाडे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून महापालिका (मोठ्या नागरी निर्वाचन) क्षेत्रातून तीन जागा मुदत संपल्याने रिक्त झाल्या आहेत. नगरपालिका-नगरपरिषद (लहान नागरी निर्वाचन) क्षेत्रातून एक जागा रिक्त झाली आहे. या पाच जागांसाठी 24 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात सोमवार (दि.2) ते गुरूवार (दि.5) या काळात उमेवादी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. याच दिवशी दाखल उमेदवारांची नावे प्रसिध्द करण्यात येणार आहे.

त्यानंतर शुक्रवारी 6 तारखेला छानणी होणार असून शनिवार (दि.7) वैध उमदेवारी अर्जाची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. याच काळात उमदेवारी अर्जासंदर्भात अपिल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 13 तारखेला वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार असून 16 तारखेला माघार घेता येणार असून 24 तारखेला प्रत्यक्षात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या काळात मतदान प्रक्रिया होणार असून 26 तारखेला मतमोजणी होणार आहे.

मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ही महासैनिक लॉन या ठिकाणी होणार आहे. या निवडणुकीत ग्रामीण निर्वाचन क्षेत्रासाठी उर्मिला पाटील महसूल उपजिल्हाधिकारी, मनपा निर्वाचन क्षेत्रासाठी अजय मोरे उपजिल्हाधिकारी भूसंपादन आणि लहान निर्वाचन क्षेत्रसाठी शाहुराज मोरे उपजिल्हाधिकारी भूसंपादन हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

‘देशदूत’च्या आरोग्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांनी आरोग्याला अग्रक्रम द्यावा : अश्विनी आहेर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नांदगाव । प्रतिनिधी

संसाराचा रहाटगाडा हाकताना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कुटुंबाला पुढे नेतांना स्वत:चे आरोग्य चांगले राहील, याची काळजी महिलांनी घेतली पाहिजे. यासाठी पहिले प्राधान्य आरोग्याला दिले पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेच्या सदस्या अश्विनी अनिल आहेर यांनी व्यक्त केले. ‘देशदूत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त नांदगाव येथे आयोजित महिला आरोग्य महोत्सव आणि बचत गट जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

‘देशदूत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने नांदगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले होते. प्राचार्म डॉ.एस.आम.पटेल, तालुका अभिमान कक्षाचे विलास झाल्टे, नामको हॉस्पिटलच्या डॉ.प्राची डुबेरकर, देशदूतचे महाव्यवस्थापक आर.के. सोनवणे, जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोने व्यासपीठावर होते.

अश्विनी आहेर  म्हणाल्या की, २१ व्या शतकात स्त्री पुरुष भेदाभेद नाही. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी ठसा उमटवला आहे. कुटूंबाची काळजी घेतांना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कुटूंबाला पुढे न्यायचे असेल तर महिलांनी स्वत:च्या आरोग्याला अग्रक्रम दिला पाहिजे. त्यासाठी वेळ काढला पाहिजे. महिलांसाठी देशदूत राबवित असलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. प्राचार्य पटेल म्हणाले की, महिला घराला घरपण देते मात्र तिच्या आरोग्याची उपेक्षा होते.

सुदृढ कुटूंबासाठी महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. डॉ.प्राची डुबेरकर म्हणाल्या की, शिक्षणाइतकेच महत्व विद्यार्थिनींनी आरोग्याला दिले पाहिजे. उपचारापेक्षा आरोग्याची दक्षता अधिक महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तालुका अभियान कक्षाचे विलास झाल्टे यांनी महिला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

हेमंत अलोने यांनी प्रास्ताविकात आरोग्य महोत्सवाची भूमिका मांडली. देशदूतचे मनमाड तालुका प्रतिनिधी बब्बु शेख यांनी सूत्रसंचालन केले तर नांदगाव तालुका प्रतिनिधी संजय मोरे यांनी आभार मानले. आरोग्य महोत्सवासाठी सकाळपासूनच विद्यार्थिनी व महिलांनी गर्दी केली होती. दिवसभर अनेक महिलांनी या महोत्सवाचा लाभ घेऊन विविध तपासण्या करुन घेतल्या. विद्यार्थिनी वजन, उंची, बीएमआय, रक्तदाब, रक्तातील साखर अशा प्राथमिक तपासण्या करुन घेण्यासाठी उत्साहाने पुढे आल्या.

डॉ.लाड यांचे नवजीवन हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडे तपासणी व समुपदेशनासाठी दाम्पत्यांनी हजेरी लावली. नामको हॉस्पिटलच्या कान नाक घसा तज्ज्ञ डॉ.प्राची डुबेरकर, वैद्यकीय समन्वयक डॉ.पंकज दाभाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती नवले यांनी विद्यार्थिनी व महिलांची तपासणी केली. त्यांना वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महेश बेंडकुळे, आरोग्य मित्र पुंडलिक चोरटे, परिचारिका सपना विसपुते, पुष्पा गाडगीळ यांनी सहाय्य केले. डॉ.लाड यांचे नवजीवन हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मोनाली लोंढे यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले. त्यांना रश्मी वाहब यांनी सहाय्य केले.

बचत गटांची जत्रा
यावेळी बचतगट जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बारा बचतगटांंनी सहभाग नोंदवला. यात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी स्वराज्य संंयम् (न्यायडोगरी), गणेश व साईश्रध्दा (मल्हारवाडी), एकता (साकोरा), जय बाबाजी (न्यायडोगरी), शिवगौरी (न्यायडोगरी), बिजासनी (न्यायडोगरी), एकता (न्यायडोगरी), लक्ष्मी माता (पिपरखेड) हे बचतगट जत्रेत सहभागी झाले होते. बचत गट जत्रेच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नती अभिमान (उमेद) अंतर्गत नांदगाव तालुका पंचायत समितीच्या अभिमान कक्षाचे सहकार्य लाभले.

सॅनिटरी नॅपकिन मशिन भेट
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून देशदूततर्फे जिल्हाभरात १०० सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. आजच्या आरोग्य महोत्सवात नांदगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन भेट देण्यात आले. देशदूतचे महाव्यवस्थापक आर.के. सोनवणे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थिनींकडे हे मशिन सुपूर्द केले. जिल्ह्यातील १०० शाळा, महाविद्यालये व काही सार्वजनिक स्थळी हे मशिन्स बसविण्यात येणार आहेत. आवश्यक त्या महाविद्यालयांना डिस्पोजल मशिनही देण्यात येणार आहेत.