Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिककरांसाठी इराकहून आलेल्या पवित्र ‘गलेफ’ चे ८ डिसेंबर पासून मिळणार दर्शन

नाशिककरांसाठी इराकहून आलेल्या पवित्र ‘गलेफ’ चे ८ डिसेंबर पासून मिळणार दर्शन

जुने नाशिक । प्रतिनिधी

इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू पिराने पीर रौशन जमीर बडे पीर हजरत गौस-ए-आझम यांच्या पवित्र जयंतीनिमित्त येथील खडकाळी मशिदीत दोन दिवस बगदाद शरीफ (इराक) येथील पवित्र मजार शरीफवरुन आलेल्या पवित्र ‘गलेफ’ (इस्लामी चादर) चे भाविकांना दर्शन मिळणार आहे.

- Advertisement -

मागील पांच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. यंदाही खडकाळी मशिदच्या आवारात हजरत गौस-ए-आझम व इमामे आझम हजरत अबू हनिफा यांच्या पवित्र मजार शरीफवरुन आलेल्या गलेफचे भाविकांना दर्शन देण्याचा कार्यक्रम रविवारी (दि.८) सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होणार आहे. तर सोमवारी (दि.९) रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे. या दरम्यान फक्त पुरुषांना प्रवेश राहणार असून दर्शन घेऊन प्रार्थना करण्यासाठी व बसण्याची विशेष सोय करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ धर्मगुरू हजरत अब्दुल मजीद सालीमुल कादरी यांनी नाशिककरांसाठी खास बगदाद शरीफहून नाशिकचे मरहूम हनिफ पाटकरी यांच्याकडे गलेफ पाठवले होते. पाटकरी परिवार व परिसरातील तरुणांच्या वतीने दर्शनाचा कार्यक्रम अखंडित सुरू असल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मशिदीचे इमाम मौलाना अब्दुल रशीद मुक्तदी, असलम खान, जुबेर सय्यद, गुलाम गौस पाटकरी यांनी केले आहे.

ज्येष्ठ धर्मगुरू हजरत गौस-ए-आझम यांची जयंतीप्रीत्यर्थ सोमवारी चौक मंडई येथून जुलुसे गौसीयाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त शहरपरिसरातील मुस्लीम बहुल भागात सजावटीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मशिदी, दर्गा शरीफसह मुस्लीम बांधवांची घरे व दुकानांवर विद्युत रोषणाई केली आहे. दरवर्षी इस्लामी रब्बीउल सानी महिन्याच्या ११ तारखेला जयंती जगभर साजरी होते. नाशिकमध्ये जयंतीनिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या