Thursday, June 18, 2026
Home Blog Page 13462

2 लाख 46 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अवकाळी पाऊसग्रस्त : शेतकर्‍यांसह प्रशासन दुसर्‍या हप्त्याच्या प्रतीक्षेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 135 कोटीच्या रक्कमेचा पहिला हप्ता पाठविण्यात आला होता. या रक्कमेपैकी जवळपास 100 टक्के रक्कम 2 लाख 45 हजार 547 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

दरम्यान, मदतीचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाला असून आता शेतकर्‍यांसह जिल्हा प्रशासनाच्या नजरा सरकारकडून पाठविण्यात येणार्‍या दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्याकडे आहेत. मदतीचा दुसरा हप्ता सोमवारीच येणार असल्याचे संकेत प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, आता कशामुळे मदतीची प्रक्रिया लांबली हे कोणालाच सांगता येत नसल्याचे चित्र आहे.

नगरसह राज्यात सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नगर जिल्ह्यात 4 लाख 54 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांचे 449 कोटी रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठविला होता. त्यानुसार राज्य सरकारने या नुकसान भरपाईपोटी 135 कोटी रुपयांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. या भरपाईच्या रक्कमेची जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या सुचनेनूसार मराठी अद्य अक्षरांप्रमाणे महसूल मंडल, गावे आणि शेतकर्‍यांच्या नावानुसार वर्गीकरण करून पहिल्या टप्प्यातील भरपाईची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे.

सरकारने जिरायत आणि बागायत भागातील पिकांसाठी सरकट 8 हजार रुपये आणि फळबागांना 18 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मदतीची रक्कम जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात नगर, जामखेड, नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याचे तहसीलदार यांनी आधी सरकट जिरायत आणि बागायत भागातील शेतकरी यांची निवड करून त्यांना भरपाई दिलेली आहे. यामुळे या तालुक्यातील फळबागा असणार्‍या शेतकर्‍यांना अद्याप मदत मिळालेली नाही. पुढील टप्प्यात या शेतकर्‍यांना मदती देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मदत मिळालेले शेतकरी
नगर 17 हजार 654, अकोले 19 हजार 447, जामखेड 4 हजार 841, कर्जत 13 हजार 393, कोपरगाव 13 हजार 683, नेवासा 23 हजार 724, पारनेर 23 हजार 622, पाथर्डी 33 हजार 987, राहुरी 14 हजार 291, संगमनेर 24 हजार 498, शेवगाव 19 हजार 972, श्रीगोंदा 15 हजार 213, श्रीरामपूर 11 हजार 925 आणि राहाता 9 हजार 306 यांचा समावेश आहे.

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव/यावल – 

कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या किनगाव येथील विवाहितेचा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास निधन झाले.

या महिलेची शस्त्रक्रिया किनगाव ग्रामीण रुग्णालयात झाली होती. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेचे पती गिरीश पाटील यांच्यासह नातेवाईकांनी केला आहे.

गिरीश माधवराव पाटील (रा. किनगाव, ता. यावल) हे टेलरिंगचे काम करतात. त्यांची पत्नी सुनीता गिरीश पाटील (वय 32) व दोन अपत्य भूमिका आणि कुणाल असा त्यांचा परिवार आहे.

गिरीश पाटील यांनी सुनीता यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 23 नोव्हेंबर रोजी दाखल केले होते. शस्त्रक्रिया देखील त्याच दिवशी झाली.

सात दिवसांनंतर त्यांच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे या महिलेस जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात 30 नोव्हेंबर रोजी दाखल केले. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शस्त्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे जखम भरली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला.

यावल पोलिसात नोंद

किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती गिरीश पाटील यांच्यासह नातेवाईकांनी केला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

कोल्हार येथे एकाच रात्रीत सात घरफोड्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सुमारे तीन लाखांचा ऐवज व रोख रक्कम लंपास

कोल्हार (वार्ताहर)- कोल्हार येथील बेलापूर रोडवरील लोकवस्तीत एकाच रात्रीत तब्बल सात घरे चार अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे तीन लाखांचा ऐवज व रोख रक्कम घेऊन पलायन केले. सदर घटना रात्री दीड ते साडेतीनच्या दरम्यान घडली.

कोल्हार बुद्रुक येथे बेलापूर रोडवरील राऊत वस्तीवर चोरट्यांनी प्रथम लक्ष्य साधले. मात्र येथे रेखा राऊत व मोहिनी राऊत यांची चोरट्यांशी नजरानजर झाल्याने तेथून चोरट्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर चोरट्यांनी संजय बांगरे यांच्या घरातून रोख रक्कम व सोने असा ऐवज चोरून श्रीगणेशा केला. त्यानंतर चोरटे बेलापूर रोडवरील लोकवस्तीमध्ये घुसले. येथे प्रथम वैशाली रवींद्र गाडेकर यांच्या घराचे कुलूप बाहेरून तोडून सामानाची उचकापाचक केली. मात्र चोरट्यांचा हाती येथे काही लागले नाही. त्यानंतर राहुल बंग, राजस्थानी चौधरी, छाया वाघमारे, येथे चोरटे गेले मात्र येथे चोरीचा प्रयत्न फसला.

त्यानंतर चोरट्यांनी गोविंद नथुलाल शर्मा यांचे घर फोडले येथे मात्र चोरट्यांचे नशीब फळफळले. येथे तब्बल दीड लाखांची रोख रक्कम चोरट्यांना मिळाली. तसेच संजय बांगरे यांच्याकडेही रोख रक्कम व ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. सात घरांत मिळून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे प्रथमदर्शनी समजते.

घटनेनंतर लोणीचे सपोनि प्रकाश पाटील यांनी भेट दिली. त्या नंतर नगरहून श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. मात्र श्वान पथक पुढे काही अंतरावर घुटमळले. चोरी करणारे चार इसम असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अवघ्या चार दिवसांपूर्वी लकी ट्रेडर्स हे पोलीस स्टेशन लगतचे दुकान चोरट्यांनी फोडून सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबविला होता. त्यानंतर एकाच वेळेस चोरट्यांनी भर लोकवस्तीत सात घरे फोडली. मात्र वारंवार होणार्‍या या चोरीच्या पर्शवभूमीवर लोणी पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचे समोर येत आहे.

भेंडा-कुकाणा परिसरातील 13 खासगी पशुवैद्यकांना जनावरांच्या ‘ब्रुसेलॉसीस’ची बाधा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सर्वांवर पुण्यात उपचार सुरू; संसर्गामुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकांसह पशुपालकही धास्तावले

नेवासा- जनावरांच्या सतत संपर्कात असणारे शेतकरी, गोठ्यात काम करणारे महिला-कामगार आणि जनावरांवर उपचार करणारे पशुवैद्यक हे बाधित जनावरांमधील ब्रुसेलॉसिस आजाराच्या जिवाणूला बळी पडत असून नेवासा तालुक्यातील भेंडा-कुकाणा परिसरातील खासगी सेवा देणार्‍या 16 पैकी 13 पशुवैद्यांना ब्रुसेलॉसीस आजाराची बाधा झाल्याचे पुणे येथील तपासणीत निष्पन्न झाले असून हे सर्व पशुवैद्यकीय डॉक्टर पुणे येथे उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या रोगाच्या संसर्गाच्या भीतीने पशुवैद्य व पशु वैद्यकीय कर्मचार्‍यांसह पशुपालकही धास्तावले आहेत.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत नगर जिल्ह्यात 97 पशुधन विकास अधिकारी, 39 सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, 141 पशुधन पर्यवेक्षक, 37 व्रणोपाचारक/ड्रेसर व 255 परिचर असे एकूण 569 पशुवैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय जिल्ह्यात हजारो पशुधन पालक, खाजगी पशुवैद्य यांचाही सातत्याने जनावरांशी संपर्क येतो. या सर्वांनाच ब्रुसेलॉसिसचा कमी अधिक प्रमाणात संसर्ग होण्याची भीती आहे.

काय आहे ब्रुसेलॉसिस?
ब्रुसेलॉसिस आजार हा जनावरांच्या सांसर्गिक गर्भपातातून ब्रुसेला अबॉर्टस जिवाणूमुळे होतो.प्रत्यक्ष जनावरांच्या सानिध्यात काम करणारे,उपचार करणारे पशुवैद्य व वैद्यकीय कर्मचारी,गोठ्यात काम करणारे शेतकरी-कर्मचारी,महिला या व्यक्तींना आजाराचे संक्रमण होण्याचा जास्त धोका असतो. वासरू पूर्ण वाढ झाल्यानंतर, गाभणपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये जर सारखा सारखा गर्भपात होत असेल तर ते जनावर ब्रुसेलॉसिसने बाधित असू शकते.

संक्रमण- आजाराचा प्रसार हा संक्रमित प्राण्याच्या सानिध्यात आल्यास काही वेळा श्वसनाव्दारे हवेमध्ये असणारे जिवाणू शरिरामध्ये गेल्याने, त्वचेला संक्रमण झाल्याने, संक्रमित प्राण्यांचा संपर्क त्वचेला झालेल्या जखमेला झाल्यास या आजाराचा प्रसार होतो. तसेच गर्भपात झालेल्या जारातील पाणी किंवा रक्तमिश्रित पाणी यामुळे रोगाचा फैलाव होण्याची शक्यता जास्त असते.

ब्रुसेलॉसिसची लक्षणे – पाठदुखी, भूक मंदावणे, थंडी येणे, सुस्ती येणे, प्रचंड डोकेदुखी, पोटात आणि पोटाचे आजुबाजूने दुखणे, सांध्यात प्रचंड वेदना होणे, तीव्र आणि चढ-उताराचा ताप येणे, अचानक वजन घटणे, अशक्तपणा, घाम येतो, नैराश्य येते. स्नायू व शारीरिक वेदना, एन्सेफलाइटिस,एंडोकार्डिटिस मेनिनजाइटिसचाही धोका निर्माण होऊ शकतो.

उपाययोजना- गायी-म्हैस यांची गर्भपात झालेली जागा व संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. गर्भपात झालेली जागा जाळावी. जनावरे आणि गोठ्याची नियमित स्वच्छता करावी. गोठ्यात जनावरे बदलतांना किंवा नवीन मागवताना विशेष काळजी घ्यावी. संक्रमण झालेले प्लासेंटा (नाळ) व गर्भाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.शेतकरी-गोठ्यात काम करणारे कर्मचारी व प्राण्यांवर उपचार करणारे पशुवैद्यकीय कर्मचारी (डॉक्टर) तसेच सतत प्राण्यांच्या संपर्कात असणार्‍या लोकांनी विशेष काळजी.

ब्रुसेलॉसिस हा एक असा संसर्गजन्य आजार आहे की जो बॅक्टेरियाच्या समूहामुळे होतो.
घ्यावयाची काळजी – ब्रुसेलॉसिस या बैक्टीरिया विशेषतः जनावरे आणि माणसं दोघांनाही संक्रमित करते. ब्रुसेलॉसिसला प्रतीबंध करण्यासाठी पशु-जनावरे यांचे सोबत काम करताना हँडग्लोज, मास्क, चष्मा व सुरक्षात्मक कपड्यांचा वापर करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय पातळीवर 27.5 टक्के लोक प्रभावित…

नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल, हरियाणा यांनी अलिकडेच केलेल्या एका सर्व्हेनुसार राष्ट्रीय पातळीवर पशुपालन आणि डेअरी व्यवसाय करणारे माणसं, पशुवैद्यकीय कर्मचारी यातील सुमारे 27.5 टक्के पशुवैद्य आणि 5.1 टक्के पशुधन पालक या ब्रुसेलोसिसने प्रभावीत आहेत.

शासनाने तरतूद करावी-डॉ.तुंबारे
जनावरांना ब्रुसेलॉसिस होऊ नये यासाठी लस उपलब्ध आहे परंतु माणसांसाठी लस नाही. फक्त काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी नाशिक येथे कॅम्प घेऊन पशुवैद्यकीय कर्मचार्‍यांची ब्रुसेलॉसिस चाचणी (टेस्ट) केली होती. यासाठी शासनाकडून कुठल्याच निधीची तरतूद नाही. त्यामुळे हा सर्व खर्च कर्मचार्‍यांच्या वर्गणी तून करण्यात आला होता.किमान वर्षांतून एकदा सर्व पशु वैद्यकीय कर्मचार्‍यांची ब्रुसेलॉसिस चाचणी करण्यासाठी निधीची तरतूद करावी.निधीची तरतूद करण्यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येणार आहेत.

दरम्यान नेवासा तालुक्यातील भेंडा-कुकाणा परिसरात खाजगी सेवा देणार्‍या 16 पशुवैद्यांनी स्वतःची ब्रुसेलॉसिसची पुणे येथे तपासणी (टेस्ट) केली असता 16 पैकी 13 जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून ते पुणे येथे खाजगी डॉक्टरकडून उपचार घेत आहेत.

30 ते 40 टक्के पशुवैद्य-पशुपालक बाधित…
सातत्याने जनावरांच्या संपर्कात येणारे 30 ते 40 टक्के पशु वैद्यकीय डॉक्टर आणि शेतकरी, महिला या ब्रुसेलोसिस आजाराने बाधीत असतातच.परंतु जोपर्यंत शरिरात प्रतिकारशक्ती आहे तोपर्यंत या रोगाचा संसर्ग झाल्याचे लक्षात येत नाही. लक्षणे दिसू लागल्यावरच ते समजते. ताप येतच असतो असे समजून सहज घेतलं जातं. परंतु सांध्यात प्रचंड वेदना होणे, तीव्र आणि चढ उताराचा ताप येणे, अचानक वजन घटणे, अशक्तपणा, घाम येतो, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसू लागल्यावर समजते की ब्रुसेलॉसिसचा प्रकार आहे. दवाखान्यात सर्व तपासण्या करण्यासाठी एक दीड महिन्याचा कालावधीही लागतो. निदान झाल्यावर पूर्ण बरे व्हायला मला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागला.
– डॉ. मनोज शिंदे, पशुधन विकास अधिकारी, जोहारापूर

लसीकरण करून घ्यावे..
पशुधन पालकांनी 4 ते 12 महिने वयाच्या सर्व वासरांना (विशेषतः मादी वासरे) लसीकरण करून घ्यावे.अशा वासरांना एकदा लसीकरण केल्यास त्याचा त्याला आयुष्यभर लाभ होतो. गायींपेक्षा म्हैस वर्ग पशुधन पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
-डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अहमदनगर

जिल्हा परिषद सभेत आवाज उठविणार
नगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे.त्यामुळे जनावरे आणि जनावरांच्या संपर्कात येणारे पशुधन पालक, पशुवैद्यकीय कर्मचारी यांच्या आरोग्याचा हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. ब्रुसेलॉसिस या आजाराची तपासणी करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद जनरल बॉडी मिटिंगमध्ये मी आवाज उठविणार आहे.
– दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद सदस्य

साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे राजीनामे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात नंबर वन असलेल्या साईबाबा संस्थानच्या कर्मचार्‍यांची साईबाबा संस्थान एम्प्लॉइज को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आपल्या पदाचे राजीनामे सचिव नबाजी डांगे याच्याकडे सुपूर्द केले आहे. नूतन अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्व कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान साईबाबा संस्थान एम्लॉईज सोसायटीच्या अध्यक्षपदी तुषार शेळके तसेच उपाध्यक्षपदी दीपक धुमसे यांची मागील वर्षी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांचा एक वर्षाचा कालावधी 22 ऑक्टोबर 2019 रोजी संपला आहे. विद्यमान संचालक मंडळाची बैठक येत्या 10 डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विषय क्रमांक 7 व 8 मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे राजीनामे स्वीकारण्याबाबत सभेपुढील विषय असल्याने नूतन अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते तसेच पुढील घडामोडी काय घडतात याकडे सर्व कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान 75 कोटींच्या आसपास ठेवी असलेल्या व वर्षाला साधारणपणे चार कोटी रुपये नफा मिळवणारी जिल्ह्यातील अग्रगण्य ठरणारी एकमेव सोसायटी म्हणून नावारूपास आली आहे. नवीन अध्यक्षपदासाठी विद्यमान संचालक यादवराव कोते यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत शेळके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की माझ्या एक वर्षाच्या कार्यकाळात संस्थानचे अधिकारी व सहकारी संस्थेचे सहा. निबंधक जितेंद्र शेळके यांनी सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

माझा कार्यकाळ संपला असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असून वर्षभरातील कामकाजाबाबत मी अत्यंत समाधानी आहे. मला आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेली जबाबदारी निर्विवादपणे पार पाडली आहे. त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो.
– तुषार शेळके, अध्यक्ष, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी.

राहाता तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना सर्वसामान्य कर्मचार्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या सूचना व निर्णय मला मान्य राहतील.
-यादवराव कोते संचालक, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी.

गुलाबवाडी होणार ‘गुलाबी गाव’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

चंद्रकांत विचवे,रावेर ।

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर गावाला गुलाबी गाव अशी ओळख जितेंद्र गवळी या शिक्षकाने करून दिली. आता रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गुलाबवाडी गावाला ‘पिंक व्हिलेज’ करण्याचा विडा उचलला आहे.

500 लोकसंख्या आणि 170 घरे असलेल्या या गावात 25 डिसेंबरपर्यंत संपूर्ण घरांना गुलाबी रंग लावून महिला सक्षमीकरण गजर केला जाणार आहे.

रावेर तालुक्यातील पाल येथील जितेंद्र गवळी नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात कार्यरत असताना भिंतघर गावाला ‘पिंक व्हिलेज’ करण्यासाठी पुढाकार घेतला. आता त्यांनी रावेर तालुक्यातील गुलाबवाडी गावाला ‘पिंक व्हिलेज’ गाव करण्यासाठी संकल्प केला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून या गावात हे शिक्षक शाळा सुटल्यावर जाऊन गावकर्‍यांच्या गाठी भेटी घेतात. सर्वच गावकर्‍यांकडून त्यांच्या या संकल्पनेला होकर मिळत आहे.

प्रत्येक कुटुंबांकडून प्रत्येकी 500 रुपये वर्गणी जमा करून गावाला रंगरंगोटी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ओला सुका कचरा संकलित करणे, रस्त्यावर सडा-रांगोळी घालून रस्ते सुशोभित करणे, गुरांच्या गोठ्यात स्वच्छता राखणे, मुलांचे गणवेश, त्यांना नीट नेटके ठेवण्यासाठी पालकांना मार्गदर्शन, भिंतीवर प्रबोधन करतील अशा सुरेख म्हणी, नागरिकांना वृक्ष तोडीपासून परावृत्त करणे, प्लास्टिक बंदी, गलुल बंदी, हुंडाबंदी यासारख्या सामाजिक प्रथांना रोखण्यासाठी गावकर्‍यांना संघटीत केले जात आहे. यासाठी गावकर्‍यांची आदर्श ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे गावात राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमावर ऊहापोह केला जातो.

चार महिन्यांपूर्वी जितेंद्र गवळी आले तेव्हा नागरिकांना अनुत्साह होता. यापूर्वी गावातील जवळपास 10 जण किडनीच्या आजाराने दगावले असल्याने नागरिक हताश झाले होते.

त्यांना या संकल्पना आणि उपक्रमात काही रस नव्हता. मात्र गवळी यांनी हार न मानता गावकर्‍यांच्या भावनांना साद घालून सर्वांची मते परिवर्तीत केले. नागरिकांना गावात पडणार्‍या पावसांची नोंद करण्यासाठी पर्जन्यमापक लावण्यास उद्युक्त केले.

आता गावाला रंग-रंगोटी सुरू आहे. 25 डिसेंबर रोजी ब्रह्मलीन प.पू.संत श्री लक्ष्मण चैतन्यजी महाराज यांच्या पुण्यतिथीपासून गावाला ‘पिंक व्हिलेज’ म्हणून ओळखले जाणार असल्याचा विश्वास जितेंद्र गवळी यांना आहे.

दिव्यांग कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाबाबत लवकरच निर्णय घेणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिवराज पाटील : जिल्हा परिषदेत शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचार्‍यांचा दिव्यांगभूषण पुरस्काराने सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) – दिव्यांग व्यक्ती ही समाजाचाच एक भाग असून त्यांच्याप्रती संवेदनशील असणे हे समाजाचे कर्तव्य आहे. शासकीय सेवेत कार्यरत असलेले दिव्यांग कर्मचारीही आपल्या उत्कृष्ट कामाने ठसा उमटवत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करताना विशेष आनंद मिळतो. हे दिव्यांग कर्मचारी सर्वांसाठीच रोल मॉडेल आहेत. त्यांनी हे काम अशाच पध्दतीने कायम ठेवून दिशादर्शक बनावे. अपंगांच्या पदोन्नतीबाबतची प्रकरणे तातडीने निकाली काढून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी दिली.

राज्य शासन मान्यता प्राप्त अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जगातिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त संघटनेच्यावतीने दिव्यांग अधिकारी, कर्मचारी यांना दिव्यांभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, मुख्य लेखा अधिकारी श्रीकांत अनारसे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, बापूसाहेब तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, संघटनेचे अध्यक्ष साहेबराव अनाप, संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय जपे, कार्याध्यक्ष राजू आव्हाड, सचिव पोपट धामणे, संतोष सरवदे, रमेश शिंदे, उद्धव थोरात, राजेंद्र दुबे, किरण माने, राजेंद्र औटी, गजानन मुंडलिक, अमोल चन्ने आदी उपस्थित होते.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर म्हणाले, आजचे सन्मानार्थी शरीराने दिव्यांग असले तरी कर्तृत्त्वाने शारीरिक सृदृढ व्यक्तींपेक्षा कांकणभर सरसच आहेत. त्यांच्या कर्तृत्त्वाची उंची खूपच मोठी आहे. प्रत्येक दिव्यांगामध्ये एक संवेदनशील मन असते. त्यामुळे शासकीय सेवेत ते मनापासून कर्तव्य बजावताना पाहायला मिळतात. प्रास्ताविकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप म्हणाले, पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष आहे. दिव्यांग बांधव शासकीय सेवेत अतिशय निष्ठेने काम करतात. ग्रामीण भागात वाड्यावस्त्यावर जाताना होणारा त्रास विसरुन आपले विहित कर्तव्य बजावत असतात. आपल्या कामातून सर्वसामान्यांना मिळणारा आनंद शारीरीक वेदना विसरण्याची ताकद देतो. यावर्षी शासकीय सेवेतील 24 दिव्यांग कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केशव भांगरे आणि राजेंद्र साबळे (अकोले), रुक्मिणी बोरुडे (कर्जत), मदिना शेख (कोपरगाव), सुमित पेटकर (जामखेड), निलेश कांबळे (जामखेड), साहेबराव मले (नेवासा), मनीषा ताजवे (पारनेर), मिठू शिंदे (पाथर्डी), उषा सिनारे (राहाता), बाबासाहेब बोरसे (राहुरी), तुकाराम भगत (शेवगाव), नारायण झेंडे (श्रीगोंदा), सुनिता सोनवणे (श्रीगोंदा), नासिर सय्यद (श्रीरामपूर), सचिन रणाते (संगमनेर), बन्सी ठोंबरे (नगर), सुनंदा भडांगे (मुख्यालय) व वनमाला दिनकर (नगर), मारुती साळवे (श्रीगोंदा) या गुणवंत कर्मचार्‍यांना दिव्यांग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

विकासकामे होत नसल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव  – 

सोशल मीडियाच्या चर्चेवरुन भाजपा नगरसेवकात, तसेच सेना सोडून गेलेल्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. विकासकामे होत नसल्याने आणि राज्यस्तरावर भाजपाचे सरकार बदलल्याने अनेक भाजपा नगरसेवक अस्वस्थ आहेत.

त्यामुळे सेनेतून भाजपात गेलेले अनेक पुन्हा सेनेत परतीच्या मार्गावर आहेत. सेना मात्र फोडाफोडीचे राजकारण करीत नाही, विकासकामासाठी जर कुणी आम्हाला येवून मिळत असेल, अन सत्तेचे गणित जुळत असेल तर वरिष्ठ पातळीवरुन जो निर्णय होईल तो आम्ही घेवू, शेवटी विकासकामे ही थांबून राहू नये अशी माहिती पत्रकार परिषदेत मनपा शिवसेना विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली. यावेळी त्यांचे सोबत शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक बंटी जोशी, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

स्थानिक नेतृत्व सपशेल अपयशी

केंद्र, राज्य तसेच जळगाव मनपात सत्ता असतांनाही स्थानिक नेतृत्व निधी सपशेल फेल झालेले आहे.  1100 कोटीचा निधी आणल्याचा आव आणणार्‍या स्थानिक नेतृत्वाने एक दमडीही आणली नाही, आमची सत्ता असतांनाचे 100 कोटींपैकी 7 कोटी अद्यापही पडून आहेत. या 7 कोटीच्या निधीची वारंवार मुदतवाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

नगरसेवकांचा नेतृत्वावर विश्वास नाही

अनेक वार्डात विकासकामे नाहीत, अनेक कामांचे कार्यादेश निघालेले असतांनाही कामे सुरू नाहीत, याचे कारण मुख्य कारण म्हणजे मक्तेदारांसह नगरसेवकांचाही विश्वास स्थानिक नेतृत्वावर राहिला नाही, सरकार बदलल्याने निधीची चिंता आतापासूनच नेतृत्वाला सतावू लागली आहे. त्यामुळे आता यापुढे निधी मिळणार की नाही, आपल्या वार्डात विकासकामे होतील की नाही यावरुन भाजपा नगरसेवकही अस्वस्थ आहेत.

आश्वासनाची केवळ खैरात

14 महिने सत्तेत असल्यानंतरही अनेक विकासकामे झाली नाहीत. मोठे उद्योग शहरात आणण्याच्या वावड्या उठविल्या जात होत्या. मात्र एक तरी उद्योग आणला आहे का ? असा प्रती सवालही त्यांनी यावेळी केला.  राज्यातील सत्ता बदलाने त्याचे परिणाम स्थानिक पातळीवरही होवू पाहत आहेत. सत्ता बदलाने आता यापुढे विकासकामांना निधी मिळणार की नाही म्हणूनही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे.

श्रीरामपूरकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांत संताप

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहराला गेल्या दीड महिन्यापासून बोरींगची चव असणारा पाणीपुरवठा होत असताना आता ज्या कालव्यामार्फत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये पाणी सोडले जाते त्या कालव्यामध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ खेळला जात आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कालव्यात साचलेली घाण व त्यातून निर्माण झालेले जीवाणू आणि विषाणू आणि त्यांना सोबत घेऊन होणारा पाण्याचा प्रवास यामुळे शहरातील जनतेचे आरोग्य बिघडले आहे. या दूषित पाण्यामुळे शहरांमध्ये विविध प्रकारचे रोग वाढले आहेत. नगरपालिकेने याबाबत गंभीरपणे दखल घेऊन कालव्यात जमा होणार्‍या या कचरा आणि घाणीचा बंदोबस्त करून याला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रवरा कालव्याच्या नॉर्दन ब्रँच येथून डावीकडे जाणार्‍या कालव्यामार्फत शहरातील साठवण तलावामध्ये पाणी घेतले जाते.

दहाव्याच्या ओट्यापासून गोंधवणी रोडवरील पुलापर्यंतच्या कालव्यामध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूकडील राहणारे नागरिक घरातील कचरा व इतर प्रकारची सर्व घाण थेट कालव्यातच टाकतात. सध्या कालव्याला पाणी नसले तरी पूर्वीच्या जमा असलेल्या पाण्यामध्ये शेवाळ साचले आहे. कचर्‍यामुळे तेथे जंतू व जिवाणू निर्माण झाले आहेत. मृत जनावरे, कुत्रे, कपडे, प्लॅस्टिक व इतर सर्व प्रकारचा कचरा कालव्याशेजारचे राहणारे लोक थेट कालव्यात टाकतात. तो कचरा साचून त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाटाला पाणी येण्यापूर्वी या कालव्याची साफसफाई जरी केली जात असली तरी पाणी गेल्यानंतर जो कचरा जमा होतो तो साचल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होऊन ती पाण्यामध्ये मिसळली जाते. यामुळे पाणी दूषित होते. सध्या शहराला केला जाणारा पाणीपुरवठा हा सुद्धा चर्चेचा विषय झालेला आहे. साठवण तलावामध्ये होणारा पाणीपुरवठा जास्तीत जास्त शुद्ध व्हावा यासाठी नॉर्दन ब्रँचपासून गोंधवणीच्या पुलापर्यंत कालव्याच्याकडेने भिंत उभारावी किंवा नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावापर्यंत वेगळी मोठी पाईपलाईन टाकून बंद नलिकेद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जाणारा हा जीवघेणा खेळ थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पिण्याच्या पाण्याची चव पूर्ववत होण्यासाठी कार्यवाही व्हावी !
दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून नळाला येणार्‍या पाण्याची चव बदलली आहे. प्रत्येक भागातून याबाबत तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेत याबाबत खुलासा करताना पाणी दूषित नसल्याचे जाहीर केलेले असले तरी पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या क्लोरिन पावडरमुळे ही चव बदलल्याची चर्चा शहरात आहे. त्यासाठी सध्या वापरात असलेली क्लोरिन पावडर बदलण्याची व पाण्याची चव पूर्ववत होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करण्याची मागणी जनतेने केली आहे.

शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना चूक झाली म्हणून कोपरगावात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोपरगाव (प्रतिनिधी) – शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे शहरातील वाणी सोसायटीत राहणार्‍या पूजा संजय अरगडे या 17 वर्षीय तरुणीने आपली शिष्यवृत्ती बुडल्याच्या कारणावरून घरातील छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पीडित मुलीचे वडील नोकरीस असून ते कामावर गेले असताना घरी ही मुलगी व आई या दोघीच होत्या. आईने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलीच्या वडिलांना भ्रमणध्वनीवरून आपण बाजारात चाललो असून तुमचे कार्यालय बंद झाल्यावर तुम्ही मला बाजारात घेण्यासाठी या, असे सांगितले होते. त्याप्रमाणे ते दोघे आपली कामे आटोपून घरी आले. घराचा दरवाजा त्यांना बंद आढळला. त्यांनी मुलीला हाक मारून प्रतिसादाची वाट पहिली मात्र आतून काहीही प्रतिसाद आला नाही.

त्यामुळे त्यांनी तिच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पहिला. त्यालाही आतून प्रतिसाद आला नाही. दरम्यान या वसाहतीतील नागरिक जमा झाले. त्यांनी घराचे निरीक्षण केले असता एक दरवाजा उघडता येईल असा असल्याने त्यांनी तो उघडून आत डोकावून पहिले असता पूजा हिने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे लक्षात आले. आतील घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांच्या समक्ष लोखंडी दरवाजाचे गज कापून पूजाला खाली उतरून उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पो. हे. कॉ आर.पी. पुंड हे करीत आहेत.