Thursday, May 8, 2025
Home Blog Page 15

Sanjay Shirsat : “गरज नसेल तर खाते…”; लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याने मंत्री शिरसाट संतापले

0

मुंबई | Mumbai 

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Government) आणण्यात गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सरकारसाठी आता अडचणीची ठरताना पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी लागणारा निधी सामाजिक न्याय विभागाच्या (Social Justice Department) खात्यातून वळवला जात असल्याचे समोर आले आहे. यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला असून, सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर खाते बंद करा, असे म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat) माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, “लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वाचारशे कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला असून याची मला काहीच कल्पना नाही. मी वारंवार सांगत आहे की असे करता येणार नाही पण निधी वर्ग केला जात आहे. सामाजिक न्याय खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर सरळ हे खातेच बंद करून टाका. हा अन्याय आहे की कट हे मला माहीत नाही. मात्र, या विषयावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी बोलणार आहे”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “सामाजिक न्याय खाते हे दलित वर्गासाठी आहे, पहिलाच निधी अपूर्ण पडत आहे. अर्थ विभागाकडून मनमानी सुरु असून, ते बरोबर नाही. आदिवासी खाते, सामजिक न्याय खाते कशासाठी आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाही का? माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. याबद्दल काही नियम आहेत का नाही?
माझ्या खात्याचे दायित्व जवळपास १५०० कोटी रुपयांचे (Money) आहे. असा निधी गेला तर मग उरलं काय? असं झालं तर विद्यार्थांच्या शिष्यवृ्त्तीला उशीर होईल, जेवणाचे पैसे उशीरा पोहोचतील. अशाने हा विभाग विस्कळीत होईल. मला वाटतं असं होऊ नये यासाठी माझे प्रयत्न असतील”, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी वळवला?

लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) आदिवासी विकास विभागाच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात ३२४० कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ३३५.७० कोटी इतका निधी महिला व बाल विकास विभागास वळवण्यात आला आहे. तर सामाजिक न्याय विभागाच्या ३९६० कोटी निधीपैकी ४१०.३० कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत.

 

 

 

Shirdi News : ईमेलचा पत्ता चुकला अन् बॉम्बस्फोट धमकीचा धक्का शिर्डीला बसला

0

शिर्डी । प्रतिनिधी| Shirdi

तामिळनाडूतील एका साई मंदिराला पाठवण्यात आलेल्या धमकीवजा ई-मेलचा धक्का शिर्डी साई संस्थानलाही बसला. परदेशातून पाठवलेला हा ई-मेल चुकून शिर्डी साई संस्थानच्या अधिकृत ई-मेलवरही पोहोचला. मेलमध्ये साई मंदिरावर विनाशकारी पाइप बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे शिर्डीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वीही साई संस्थानला असे फेक मेल आलेले आहेत.

शुक्रवारी 2 मे दुपारी तीन वाजेपर्यंत साईमंदिर बॉम्बने उडविण्याचा इशारा मेलद्वारे देण्यात आला होता. या प्रकरणी साई संस्थानच्या वतीने सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ई मेलमध्ये सावुक्कू शंकर आणि जमिश मुबीन यांच्या फाशीच्या निषेधार्थ हल्ल्याची योजना असून यासाठी स्फोटके वापरण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा ई मेल मूळत: तामिळनाडूतील साई मंदिरासाठी पाठवण्यात आला होता. तो चुकून शिर्डी संस्थानकडेही आला. त्यामुळे हा मेल फेक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ढिलाई न ठेवता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत तमिळनाडू प्रशासनालाही माहिती दिली आहे.

मंदिर परिसराची कसून तपासणी
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे आणि पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करत आहेत. गेले दोन दिवस अहिल्यानगर व शिर्डीच्या बॉम्ब शोध पथकाने अनेकदा मंदिर व परिसरची कसून तपासणी केली. मात्र संशयास्पद काहीही आढळले नाही.

साईदर्शन सुरळीत
मंदिर परिसरात जलद कृती दल व पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. भाविकांच्या मोबाईल, बॅगा काळजीपूर्वक तपासण्यात येत आहेत. शहरात नाकाबंदी लावण्यात आली असून हॉटेलचीही तपासणी करण्यात येत असल्याचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे संगितले. पोलीस आणि संस्थान प्रशासनाने साईभक्त आणि ग्रामस्थांना घाबरून न जाता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या धमकीमुळे भाविकांवर कोणताही परिणाम झाला नसून नेहमीप्रमाणे दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू आहे.

Pahalgam Terror Attack : भारताचा पाकिस्तानला दणका; आयात आणि निर्यातीवर घातली बंदी

0

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या हल्ल्याचे चोख प्रत्यूत्तर दिले जाईल असा इशारा गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) दिला आहे. दुसरीकडे या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.

पाकिस्तानी नागरिकांना (Pakistani Citizen) भारत सोडण्यासह सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला होता. याशिवाय पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठं पाऊल उचलले असून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने (Central Government) परराष्ट्र व्यापार धोरण २०२३ अंतर्गत नवीन पॅरा 2.20A जाहीर करत ही बंदी लागू केली आहे. पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे येणाऱ्या किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि सार्वजनिक धोरणाच्या हिताच्या दृष्टीने लागू करण्यात आली असून, याला अपवाद हवा असल्यास केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता यापुढे कोणतीही वस्तू पाकिस्तानातून भारतात (India) येणार नाही आणि भारतातून कोणतीही वस्तू पाकिस्तानला पाठवली जाणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने यापूर्वी थेट व्यापार बंद केला होता. पण आता सरकारने सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष व्यापार देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना देखील जारी केली असून, या अधिसूचनेनुसार भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयात-निर्यातीवर (Imports and Exports) तात्काळ बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने अधिसूचनेत नेमकं काय म्हटलंय?

वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मग ती मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो किंवा नसो, पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित असेल. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल”, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

 

 

 

Ajit Pawar: “मलाही वाटते मुख्यमंत्री व्हावे, पण…”; अजित दादांनी पुन्हा व्यक्त केली खदखद

0
मलाही

मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रिपादाची इच्छा सर्वश्रृत आहे. त्यांनी आतापर्यंत उमुख्यमंत्री होण्याची हॅटट्रिक केलेली आहे. मात्र त्यांना अद्याप मुख्यमंत्री होता आलेले नाही. त्यांनी तसेच त्यांच्या पक्षातील नेतेमंडळींनी मुख्यमंत्रिपद मिळण्याबाबतची इच्छा अनेकवेळा बोलून दाखवलेली आहे.

ज्येष्ठ महिला पत्रकार राही भिडे यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावी, अशी आशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केली. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “महिला मुख्यमंत्री व्हावी असे प्रत्येकाला वाटते. पण तो योगही जुळून यावा लागतो. मलाही वाटते मुख्यमंत्री व्हावे, पण कुठे जतमंय? त्यामुळे कधी ना कधी योग येईल”, असे मिश्किलपणे म्हणत त्यांनी त्यांच्या मनातील खदखदही व्यक्त केली.

तसेच, “पण राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याचा योग कधीतरी जुळून येईल. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्या. हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे तो योगही राज्यात येईल,” सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, ताराराणी या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. त्यांचे कर्तृत्व महाराष्ट्राने पाहिले आहे, त्यामुळे तो (महाराष्ट्रातही महिला मुख्यमंत्री होईल) दिवसही लांब असेल असे वाटत नाही.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार सहा वेळा उपमुख्यमंत्री
अजित पवार आतापर्यंत एकूण पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्याची त्यांची सहावी वेळ आहे. ते सर्व प्रथम २०१० साली काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. २०१२ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली. नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी ते फक्त ८० तासांसाठी उपमुख्यमंत्रिपदी होते.

पुढे २०२२ साली महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. ते पुढे अडीच वर्षे या पदावर होते. पुढे २०२२ साली अजित पवार यांनी बंड केले आणि भाजपासोबत हातमिळवणी केली. यावेळी ते पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. आता महायुती सरकारमध्ये ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Ambadas Danve : लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास खात्यातील पैसा वळवला, अंबादास दानवेंचा खळबळ आरोप

0

मुंबई । Mumbai

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. मात्र, सरकारी तिजोरीवर ताण असतानाही हप्ता दिला जात असल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला आहे.

दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता भरण्यासाठी सरकारने आदिवासी विकास खात्यातील आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील निधी वळवला आहे. त्यांनी सरकारवर आर्थिक संकट लपवून महिलांच्या भावना वापरण्याचा आरोप केला आहे.

अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “लाडक्या बहिणीचा हफ्ता भरायला सरकारने आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले! सरकारी तिजोरी कोरडी होत चालली आहे! सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहिण योजनेसाठी खेचले! अशा प्रकारे आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी रुपये पैसे सरकारने खेचून नेले!” असा आरोपच दानवेंकडून करण्यात आला.

https://x.com/iambadasdanve/status/1918529223800615252

तर, दानवेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नियम : नियोजन आयोगाच्या नियमानुसार, आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन खात्यांना दिला जाणारा निधी त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरतो. हा निधी त्या संवर्गावरच खर्च करणे बंधनकारक असते तो इतर खात्यांमध्ये वळवता येत नाही.” त्यामुळे आता दानवेंनी केलेल्या या आरोपांवर सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याशिवाय, सरकारने खरंच आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले का? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

Nashik News : किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर’ सुरु

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात नव्याने रुग्ण सेवेत दाखल होत असलेल्या किम्स मानवता हॉस्पिटल (KIMS Manavata Hospital) येथे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे (Robotic Joint Replacement Center) उदघाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते येथे करण्यात आले. नाशिक जिल्ह्यासाठी ही एक अभिमानाची बाब तर आहेच परंतु संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ही अत्याधुनिक सुविधा आरोग्यदायी ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी या सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना केले.

सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता नव्या युगाकडे वाटचाल करत आहे. शस्त्रक्रियेतील साहित्य, उपकरणे आणि तंत्रांमध्ये बर्‍याच सुधारणांमुळे या प्रक्रियेची परिणामकारकता खूप वाढली आहे. अचूक इम्प्लांट पोझिशनिंग आणि अलाइनमेंटच्या आव्हानांवर मात करण्यासाठी, नाविन्यपूर्णतेची सतत गरज भासत असते. संगणकाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया नवोपक्रमाचा एक नवीन टप्पा सुरू केला आहे आणि जर आपण अलीकडील ट्रेंड आणि प्रगती तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाल्यास , रोबोटिक्सने वर्तमान आणि भविष्यासाठी नवा मार्ग दाखवला आहे.

गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियांसाठी जगातील पहिला ( CUVIS) हा स्वायत्त रोबोट आहे .किम्स मानवता हॉस्पिटल हे रुग्णांसाठी (Patient) सर्वोत्तम शस्त्रक्रिया परिणाम देण्यासाठी या रूपाने सज्ज झाले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या साह्याने परिणामकारक उपचार आता रुग्णांवर होणार आहे. अशी माहिती किम्स मानवता हॉस्पिटलचे चेअरमन डॉ राज नगरकर यांनी दिली.

रोबोटिक गुडघा बदलण्यात सामान्यत: खालील गोष्टींचा समावेश होतो इन-क्लिनिक निदान,सीटी-स्कॅन शस्त्रक्रियापूर्व नियोजन (व्हर्च्युअल सिम्युलेशन),स्वायत्त रोबोटिक सर्जिकल प्रक्रिया,हॉस्पिटलमधून लवकर डिस्चार्ज,पारंपारिक मॅन्युअल सर्जिकल प्रक्रियेच्या तुलनेत, रोबोटिक गुडघा बदलण्याचे बरेच फायदे आहेत रोबोटिक गुडघा बदलण्याचे चांगले इम्प्लांट पोझिशनिंग, अचूक शस्त्रक्रिया हाड कापणे, कमीत कमी मानवी हस्तक्षेप, जलद पुनर्प्राप्ती आणि कमीत कमी हॉस्पिटलमध्ये राहणे असे बरेच फायदे असल्याचे आणि अत्याधुनिक रोबोटच्या साह्याने शस्त्रक्रिया विषयी सविस्तर माहिती सांधे विकार व सांधे बदल शस्त्रक्रिया तज्ञ् डॉ स्पंदन कोशिरे यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरचे, उदघाटन प्रसंगी ऑर्थोपेडिक विभागाचे सांधे विकार व सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. मयूर पेखळे , डॉ. प्रणित सोनवणे,डॉ स्पंदन कोशिरे उपस्थित होते. आभार प्रदर्शन सीओओ डॉ निलेश सिंग यांनी केले या प्रसंगी रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sonu Nigam: गायक सोनु निगमला पहलगाम हल्ल्याविषयी वक्तव्य करणं भोवलं; FIR दाखल

0
सोनु

मुंबई | Mumbai
बॉलिवूडसह देशातील अनेक भाषांमध्ये गाणारा आणि गोड गळ्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या गायक सोनु निगमने अनेक भाषांमध्ये गाणी गात गायकाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आतापर्यंत अनेक गाण्यांनी सोनू निगमने जगभरात चाहते कमावले आहे त्याची अनेक गाणी खुप प्रसिध्द झाली आहे. मात्र यंदा सोनु निगम एका कॉन्सर्ट शो दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोनू निगमने कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने कन्नड गाण्याची फर्माइश केली असता त्याच्या वागण्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने, सोनू निगमवर FIR दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय प्रकरण आहे?
सोनु निगम हा बेंगळुरु येथे कॉन्सर्ट शोसाठी गेला होता. त्या शोमध्ये सोनु गाणे गात होता. तेव्हा एक चाहत सतत गायकावर कन्नडमध्ये गाणे गाण्यासाठी दबाव टाकत होता. अशात सोनूने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली नाही कारण चाहते त्याला धमकी देत होता. यानंतर सोनू निगम याने जे वक्तव्य केले. ज्यामुळे आता वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/reel/DI4F-F8hxal/?utm_source=ig_web_copy_link

सोनू निगम सर्वांसमोर म्हणाला की, “या चाहत्याच्या जन्माआधीपासून मी कन्नड गाणी गातोय. याच कारणाने पहलगाममध्ये हल्ला झाला. अशाच वागणुकीमुळे तिथे हल्ला झाला”, अशाप्रकारे सोनू निगमने चाहत्याने जी मागणी केली होती त्याची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने काही संघटनांनी सोनू निगमच्या असंवेदनशील वागण्यावर बोट ठेवले आहे.

https://www.instagram.com/p/DJHcv2JteUZ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

चाहत्याच्या मागणीची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केल्याने बंगळुरु येथील अनेक कन्नड संघटनांनी अवलाहल्ली पोलीस स्टेशनमध्ये सोनू निगमविरोधात FIR दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२ (१), ३५२ (२) आणि ३५३ अंतर्गत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सार्वजनिक स्थळी अपमान आणि शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केल्याने, सोनू निगमविरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Sanjay Raut : “पंतप्रधान मोदी नऊ तास नट-नट्यांसोबत…”; राऊतांचा निशाणा, नेमकं काय म्हणाले?

0

मुंबई | Mumbai

जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, या हल्ल्याचे चोख प्रत्यूत्तर दिले जाईल असा इशारा गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) दिला आहे. दुसरीकडे या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी वेव्हज परिषदेसाठी काल (शुक्रवारी) मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

यावेळी बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तात्काळ बिहारला गेले. त्याठिकाणच्या प्रचारात सहभागी झाले. त्यानंतर पंतप्रधान देशभरात टंगळमंगळ फिरत आहेत. मुंबईत नऊ तास नट-नट्यांसोबत हास्यविनोद करत आहेत. आंध्रप्रदेशचे नेते पवन कल्याणसोबत हास्यविनोद करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दुखाची एकही लकेर दिसली नाही. पंतप्रधान खुश मिजास आहेत. पुलवामा हत्याकांडानंतरही भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दुख दिसले नाही, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की,”देशात (Country) युद्धाची चर्चा सुरू असताना ९ तास पंतप्रधान नट-नट्यांबरोबर राहतात. काल फोटो आले, गौतम अदाणी यांच्या एका बंदराच्या उ‌द्घाटनाला गेले. त्यांना मिठ्या मारल्या. पाकिस्तानला पंतप्रधान मोदी धडा शिकवणार आहेत. पण कधी शिकवणार हेच समजत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर युद्धाबाबत कसलीही चिंता दिसत नाही. मात्र, आम्ही चिंतेत आहोत, ते पाकिस्तानला कसा धडा शिकवतील याची काळजी आम्हालाच आहे, असा चिमटाही यावेळी संजय राऊत यांनी
काढला.

तसेच “देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची भाषा केली. देशाचे गृहमंत्री अमित शाह चुनचुन के मारेंगे म्हणाले, मग मारा ना. कोणी अडवले? या सर्वाला जबाबदार अमित शाह आहेत. काश्मीरमध्ये जे हत्याकांड घडलं, तसंच, गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक हत्याकांडाला अमित शाह जबाबदार आहेत. तरीही मोदींनी त्यांना पदावर का ठेवलं? २७ जणांचं हत्याकांड झालं त्यात राज्यातील ६ माणसं आहेत. आमच्याच लोकांना चुन चुन के मारलं. त्यामुळे अमित शाहांनी राजीनामा (Resign) दिला पाहिजे”, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. तसेच विरोधकांनी अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी न केल्याने आपल्याला त्यांची कीव वाटते”, असेही राऊत म्हणाले.

Akole Suicide Case : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

0

अकोले (प्रतिनिधी)

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आपली जीवनयात्रा संपल्याची घटना अकोले शहराजवळील माळीझाप शिवारात घडली आहे. संदीप दिलीप मंडलिक असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी अकोले पोलिसांत मयत संदीपचे वडील दिलीप उमाजी मंडलिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून मयत संदीपची पत्नी रूपाली मंडलिक हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संदीप यांची बहीण उज्ज्वला हिने गोठ्यात दोरीने गळफास घेऊन केल्याचे तिने आत्महत्या बघितल्यावर आरडाओरडा केला.

त्यानंतर अकोले पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संदीपचा मृतदेह खाली काढला तेव्हा त्याच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये एवढे सर्व होऊनही बायको सुधारली नाही. त्यामुळे जीवन संपवत आहे. बैठक घेऊन काही उपयोग नाही. कारण मला तिला सोडायचं नव्हतं, ती सुधारावी ही अपेक्षा असा मजकूर लिहिलेला होता.

यानंतर संदीप याचे वडील दिलीप उमाजी मंडलिक यांनी त्याची पत्नी रुपाली हिच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यास संदीपच्या मृत्यूस पत्नी रूपाली ही कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. मयत संदीप हा बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या राजूर शाखेत लिपीक म्हणून सेवेत होता. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्याच्या मागे एक मुलगा, आईवडील असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करत आहे.

स्थानिक रहिवाशांना घर बांधकामासाठी वाळू ६०० रुपये प्रती ब्रास मिळणार

0

अहिल्यानगर (प्रतिनिधी) 

विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच इतर स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या घरांच्या बांधकामाकरिता वाळूची मागणी केल्यास कमाल ५ ब्रास मयदित वाळू स्वामित्वधन रक्कम (रुपये ६००/- प्रती ब्रास) उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक काल जारी करण्यात आले आहे.

तरतुदीनुसार निश्चित वाळू गट तसेच, पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू गटांपैकी जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा वाळूगटामधून शासनाच्या विविध घरकूल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकरिता स्वामित्वधन न आकारता कमाल ५ ब्रासपर्यंत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच, अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी तसेच इतर कोणत्याही कारणामुळे शासनाने जप्त केलेली वाळूदेखील विविध घरकूल लाभार्थ्यांना स्वामित्वधन न आकारता उपलब्ध करून द्यावी. शासनाच्या विविध घरकूल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना स्वामित्वधन न आकारता कमाल ५ ब्रासपर्यंतच्या वाळूसाठी तहसिलदार यांनी जवळचा वाळू गट नमूद करुन ऑनलाईन पासेस उपलब्ध करून द्याव्यात. याकरिता संबंधित लाभार्थ्यांनी तहसिलदार यांच्याकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तहसिलदार यांनी उपलब्ध करून दिलेले ऑनलाईन पासेस डाऊनलोड करुन संबंधित ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांच्यामार्फत १५ दिवसांच्या आत घरकूल लाभार्थ्यांना घरपोच उपलब्ध करुन द्यावेत व त्याची पोच घेऊन योग्य ती नोंद ठेवण्यात यावी.

तहसिलदार यांनी घरकूल लाभार्थ्यांस पास उपलब्ध करुन दिल्याच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत वाळू उचल करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील. या कालावधीत वाळू न उचलल्यास हा पास आपोआप रद्द होईल. ऑनलाईन पास उपलब्ध करुन देण्यास काही तांत्रिक अडथळा आल्यास तहसिलदार यांनी लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने पास उपलब्ध करुन द्यावेत. तथापि, याची नोंद महाखनिज प्रणालीवर घेण्यात यावी. या कार्यवाहीची संपूर्ण जबाबदारी संयुक्तरित्या तहसिलदार तसेच गट विकास अधिकारी यांच्यावर राहील. त्याचप्रमाणे अशा वाळू गटामधून इतर स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या घरांच्या बांधकामाकरीता वाळूची मागणी केल्यास कमाल ५ ब्रास मर्यादेत वाळू स्वामित्वधन रक्कम (रुपये ६००/- प्रती ब्रास), जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी व इतर अनुज्ञेय रकमांचा भरणा करुन घेऊन दिनांक ८ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकामांसाठी वाळूच्या मागणीबाबत बांधकाम आराखडा विचारात घेऊन अशा वाळू गटामधून सदर बांधकामाच्या अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या दराने तथापि, स्वामित्वधनाच्या रक्कमेपेक्षा (रुपये ६००/- प्रती ब्रास) कमी नसणारे शुल्क आकारुन वाळूचा पुरवठा करण्यात यावा. प्राप्त रक्कमेमध्ये स्वामित्वधन रक्कम, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व इतर अनुज्ञेय रकमांचा समावेश असेल. यासाठी शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी जप्त केलेली वाळू विविध घरकूल लाभार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्यानंतर शिल्लक वाळूची दिनांक शासन निर्णयामधील तरतुदीनुसार विल्हेवाट लावावी.