कोल्हापूर | Kolhapur
विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) महायुतीने (Mahayuti) दिलेल्या आश्वसनांची पूर्तता करावी अशी मागणी आता सामान्यांकडून होत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmer Loan) देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण महायुतीची सत्ता येऊन १०० दिवस होऊन गेले असले तरी अद्यापही सरकारकडून कर्जमाफीबाबत काहीही बोलले जात नाही. तर, दुसरीकडे महायुतीच्या मंत्र्यांकडून काही आश्वसनांबाबत सपशेल घुमजाव करत असल्याचे दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले, असा थेट उलटसवाल केला. अजितदादांच्या या वक्तव्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
महायुती सरकार कर्जमाफीचे आश्वासन पाळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील मंत्री पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यापेक्षाही क्रूर झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासने दिल्याने दररोज राज्यातील सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी पोस्ट X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या या खळबळजनक विधानाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले आहे का? नाही ना…, असे म्हणत पवारांनी या मुद्द्याबाबत हात वर केले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली होती. त्याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले असता त्यावर अजित पवार यांनी उलट सवाल करत “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिलं आहे का? मी दिले आहे का? मी तरी दिले नाही!” अशा स्पष्ट आणि थेट शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. त्यामुळे आता अजित पवारांच्या या विधानामुळे एका नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याने आता लवकरच त्यांच्याकडून कर्जमाफी करण्यात येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच याबाबत आश्वासन मी दिलेले नाही, असे म्हटल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा तर येणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची सत्ता आल्यास कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. त्याशिवाय लाडकी बहीण योजनेचे मानधन हे १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यानंतर महायुतीच्या मंत्र्यांकडून या घोषणेवर प्रश्न निर्माण केले. आता, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्याने आता विरोधक आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा