Wednesday, May 7, 2025
Home Blog Page 19

संपादकीय : १ मे २०२५ – हा सामाजिक गुन्हाच!

0

भुकेले राहणाऱ्या लोकांची वाढती संख्या आणि दुसऱ्या बाजूला टनावारी अन्नाची नासाडी ही दोन टोके समाजात सातत्याने अनुभवास येतात. दिवस लग्नसराईचे आहेत. विवाहसोहळे, सार्वजनिक जेवणावळी, सामाजिक कार्यक्रम अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाताना दिसून येते.

एकीकडे  दिवसाकाठी किमान एकवेळ उपाशी झोपणारे हजारो लोक आणि दुसरीकडे न खाल्ल्यामुळे होणारी अन्नाची नासाडी या एकाच नाण्याच्या दोन बाजू अस्वस्थ करणाऱ्या आहेत. २०२४ च्या जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान शंभराच्या खाली होते. माणसांच्या बेफिकिरीमुळे   फक्त अन्नच  वाया जाते का? ते बनवण्यासाठी इंधन, गोडे पाणी तसेच विविध प्रकारचे मसाले वापरले जातात.

मातीशिवाय पिके उगवतील का? मानवी तास उपयोगात आणले जातात. अन्न वाया घालवणे म्हणजे त्यांचीही नासाडीच नव्हे का? या गोष्टींचे पैशांत मूल्य मोजले जायला हवे. अन्नाबरोबर काय-काय वाया घालवले जाते याची जाणीव तरी माणसांना असेल का? पोटाला लागेल तेवढेच अन्न वाढून घ्यावे हे साधे सामान्यज्ञान  माणसांना का नसावे?

भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रह्म मानले जाते. तोच संस्कार लहान मुलांवर जाणीवपूर्वक केला जातो. शाळांमध्ये त्याच आशयाचे सुविचार फलक लावले जातात. त्या अर्थाच्या प्रार्थना आणि श्लोकही शिकवले जातात. मोठ्या वयात ही समज कुठे हरवते? अन्न कचऱ्यात फेकून देताना काहीच वाटत नसावे का? उरलेले अन्न बऱ्याचदा कचऱ्यात किंवा जमिनीवर फेकले जाते. ते तिथेच कुजते. त्यातून घातक वायू बाहेर पडतात. ते मानवी आरोग्यासाठी त्रासदायक ठरतात. माती आणि हवेचे एक प्रकारचे  प्रदूषणच  आहे.

या पार्श्वभूमीवर अन्न वाया घालवणे हा सामाजिक गुन्हा मानला जायला हवा. सार्वजनिक समारंभात उरलेले अन्न वाया जाऊ नये यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेतात. भुकेले लोक आणि उरलेले अन्न यांच्यात दुवा सांधणारे उपक्रम राबवतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने ऍप तयार करतात. यात वेगळे  प्रयोगही अनुभवास येतात. जिथे जेवलेले ताट ठेवले जाते, तिथे स्वयंसेवक उभे करतात. ताटात अन्न उरले असेल तर त्या व्यक्तीला ते खायला सांगितले जाते.

स्वच्छ केल्याशिवाय ताट ठेवू दिले जात नाही. अन्न आणि बरोबरीने नैसर्गिक संसाधने वाया जाऊ नयेत यासाठीच ही सगळी यातायात किंवा प्रयोग राबवले जातात. लोकांनी त्यामागील उद्देश लक्षात घेण्याची गरज आहे. अन्न वाया न घालवण्याचे सामाजिक भान प्रत्येकाने राखायलाच हवे.

पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी – ना. विखे पाटील

0

लोणी |वार्ताहर| Loni

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर सदर प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होत नसल्याचा निष्कर्ष 2019 मध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिल्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही. आमची कोणतीही अडचण नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे. नव्याने पुन्हा काही चौकशी होणार असली तर, त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याची स्पष्ट भूमीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

कारखान्याच्या संदर्भात प्रसारित झालेल्या वृत्ताबाबत बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, याबाबतची नेमकी वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. 2004 साली झालेले प्रकरण आमच्या विरोधकांनी 2014 मध्ये उकरुन काढले. याबाबत स्थानिक न्यायालया पासून ते उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये याबाबतच्या सुनावण्या झालेल्या आहेत. उच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी अधिकार्‍यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा होत नसल्याचे स्पष्ट करुन, याचिका निकाली काढलेली आहे. त्यामुळे आमच्यादृष्टीने हे प्रकरण केव्हाच संपलेले असल्याचे ना. विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने राहाता न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी यांचा कलम 156(3) प्रमाणे केलेला आदेश कायम ठेवल्याने सदरचा गुन्हा दाखल झाला आहे. कोणतीही चौकशी ही गुन्हा दाखल झाल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे पुन्हा याच प्रकरणात नव्याने होणार्‍या चौकशीला सामोरे जाण्याची कारखाना व्यवस्थापनाची तयारी आहे. मार्च 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या आदेशात कारखाना व्यवस्थापन व इतरांच्या विरोधात त्रास होईल अशी कोणतीही जबरदस्तीची कारवाई करु नये असा स्पष्ट आदेश दिलेला असल्याने या प्रकरणातील सर्वच स्पष्टता आता समोर आलेली असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

शिर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेने सलग आठ वेळा चांगल्या मताधिक्याने मला निवडून दिले आहे. जनतेचा विश्वास कामातून मी सार्थ ठरविला असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले. विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यशही मोठे आहे. अनेकांना ते देखवत नाही. त्यामुळेच व्यक्तिव्देशापोटी मला बदनाम करण्यासाठी विरोधक केवीलवाणा प्रयत्न करतात. असे प्रयत्न यापुर्वीही अनेकवेळा झाले परंतू जनतेने त्यांना थारा दिलेला नाही. आत्ता सुध्दा कारखान्याच्या माध्यमातून बदनामी करण्याचाच प्रयत्न आहे पण यात त्यांना यश मिळणार नाही. निवडणूक आली की, वातावरण निर्माण करायचे आणि वैफल्यापोटी आरोप करायचे, ही आमच्या विरोधकांची सवय आहे.

यामध्ये ते स्वतःची पत घालून बसले आहेत. या सर्व प्रकरणात त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सांगण्याची आता आवश्यकता नाही. कारखान्याच्या बाबतीत एवढीच कळकळ त्यांना होती तर, निवडणूकीत सभासदांना सामोरे का गेले नाहीत. सद्यस्थितीत त्यांनी उकरुन काढलेल्या प्रकरणातील योजनेचे ते लाभार्थीही नाहीत जनतेचा विश्वास त्यांनी केव्हाच गमविला आहे, अशी टिका ना. विखे पाटील यांनी केली.

Ahilyanagar : जिल्ह्यातील 44 गावांतील पिण्याचे पाणी दूषित

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

उन्हाच्या तीव्रतेने जिल्ह्यात अनेक गावे व वाड्यावस्त्यांतून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने टँकरसह मिळेल त्या जलस्रोतावर नागरिकांना अवलंबून राहावं लागत आहे. परिणामी नागरिकांना दूषित पाणीही प्यावे लागत आहे. गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणार्‍या योजनांच्या जलस्त्रोतांच्या पाणी नमुन्यांची तपासणी जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाने केली असता, गेल्या मार्च महिन्यात तब्बल 44 नमुने दूषित असल्याचे आढळले आहे.

राजूर (ता. अकोले) येथे दूषित पाण्यामुळे कावीळची साथ पसरून एका मुलीचा मृत्यू तर 126 रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 44 गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळल्याची घटना उल्लेखनीय असल्याचे मानले जाते. गेल्या 1 मार्च 2024 पासून 31 मार्च 2025 या वर्षभराच्या कालावधीत 488 पाणी नमुने दूषित आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली. जामखेड व कोपरगाव तालुक्यात एकाही गावचे पाणी नमुने दूषित आढळले नाही. इतर सर्व तालुक्यात पाणी नमुने दूषित आढळले. आरोग्य विभागाकडून दरमहा दोन वेळेला बायोमेट्रिक पध्दतीने व एकवेळेला रासायनिक पध्दतीने पाणी नमुने तपासले जातात. नमुने दूषित आढळल्यास संबंधित बीडीओ, ग्रामपंचायतीला कळवले जाते. त्यानुसार पाणी प्रक्रियेवर देखरेख ठेवून पुन्हा पाणी नमुने तपासले जातात.

राजुरमध्ये 8 एप्रिलला पाणी नमुने तपासण्यात आले, ते योग्य आढळले. मात्र 23 एप्रिलला प्रथम काविळीची साथ पसरल्याचे निदर्शनास आले. त्याचा जिल्हा परिषदेचे यंत्रणांनी शोध घेतला असता, राजुरजवळ यात्रा भरली होती, त्याच दरम्यान भंडारदर्‍याचे आवर्तन सुटले होते. यात्रेसाठी मोठी गर्दी झाली होती. गावची पाणीयोजना ‘एमजीपी’ने तयार केली. ती अद्याप ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेली नाही. या योजनेची शुध्दीकरण यंत्रणा बंद होती. त्याचा परिणाम काविळीची साथ पसरण्यात झाला असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. शुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित करून दोन दिवस राजुरचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर परिसरातील गावांतील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

दूषित पाणी नमुने आढळलेली गावे
पिसेवाडी, वाडगी, ब्राम्हणवाडा, विठे, जामगाव, (अकोले), बारडगाव दगडी, बेलवंडी, येसवाडी (कर्जत), नारायणडोह, हिंगणगाव (अहिल्यानगर), देवसडे, जायगुडे आखाडा, दहिगाव (नेवासा), रेनवडी माजमपूर (पारनेर), उपजिल्हा रुग्णालय जोगेवाडी, मोहरी, कासार पिंपळगाव, एकनाथवाडी (पाथर्डी), अस्तगाव (राहता), ताहराबाद, धामोरी बुद्रुक, कोल्हार खुर्द, मल्हारवाडी, चिंचोली रामपूर, चांदेगाव (राहुरी), आश्वी खुर्द, खळी, सायखिंडी (संगमनेर), रांजणी (शेवगाव), चिखलठाणवाडी, पोराचीवाडी, अघोरीवाडी (श्रीगोंदे) तसेच खानापूर व मांडवे (श्रीरामपूर).

Ahilyanagar : अकोलेतील उडदावणे होणार ‘मधाचे गाव’

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, संनियंत्रण समिती यांनी शिफारस केलेल्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी निश्चित केलेल्या 10 गावांमध्ये ‘मधाचे गाव’ योजना राबविण्यासाठी करावयाच्या खर्चाचे अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेतील उडदावणे या गावाचा समावेश आहे.

मधमाशीपालन हा राज्यातील एक महत्त्वाचा जोडधंदा होऊ पाहत आहे. मधमाशा या केवळ मध आणि मेणच देत नाहीत तर त्या परपरागीकरणामुळे शेती पीक उत्पादनात 35 ते 40 टक्के वाढ करतात, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे. त्यामुळे गावाच्या सकल उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी मधाचे गाव ही संकल्पना पुढे आली. त्यातूनच आता दुसरा टप्पा होत आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार (1) घोलवड, ता.डहाणु जि. पालघर, (2) भंडारवाडी, ता.किनवट, जि. नांदेड (3) बोरझर, ता. नवापूर, जि. नंदुरबार (4) काकडदाभा, ता. औढ़ानागनाथ, जि. हिंगोली (5) चाकोरे, ता.त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक (6) उडदावणे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर (7) शेलमोहा, ता. गंगाखेड, जि. परभणी (8) सिंधीविहीर, ता. कारंजा, जि. वर्धा (9) सालोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा (10) आमझरी, ता. अमरावती, जि. अमरावती या 10 गांवात मधाचे गाव ही योजना राबविण्यासाठी एकूण रु.5,01,97,000/- अक्षरी रुपये पाच कोटी, एक लाख, सत्याण्णव हजार मात्र) इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास अटींच्या अधिन राहून प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.

योजना कार्यान्वित झाल्यानंतर पुढील वर्षांसाठी योजना कार्यान्वीत रहावी याची संपूर्ण जबाबदारी संबंधित गावावर राहील, याबाबतचे हमीपत्र संबंधित ग्रामपंचायतीकडून घेण्यात येणार आहे. ज्या गावांमध्ये शासनाने मंजूर केलेल्या निधीपेक्षा जास्त खर्चाची आवश्यकता भासेल, तो खर्च अन्य योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून उपलब्ध करुन देण्याची मुभा जिल्हाधिकार्‍यांना राहील. मधपेट्यांसाठी लागणारी 10 टक्के रक्कम लाभार्थ्यांना द्यावी लागणार आहे. 90 टक्के रक्कम सरकार देणार आहे.

Karjat : कर्जत नगरपंचायतीतील सत्ताकारणाला वेगळं वळण; जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय उच्च न्यायालयाने फेटाळला

0

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत नगरपंचायतीतील सत्तासंघर्षाने आता न्यायालयीन वळण घेतले असून उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांचा गटनेता बदलण्यास नकार देणारा निर्णय फेटाळून लावला आहे. न्यायालयाने हा आदेश पुन्हा नव्याने विचाराधीन घेण्याचे निर्देश दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अंतर्गत गटनेता बदलण्याबाबतचा अर्ज आमदार रोहित पवार यांच्या गटाकडून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला होता. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी कोणतेही ठोस कारण न देता तो अर्ज फेटाळला.

यामुळे रोहित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला होता. याविरोधात त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निर्णयात जिल्हाधिकार्‍यांचा आदेश रद्द ठरवत नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात आ. पवार यांनी प्रतिक्रिया देताना न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, काहींच्या हातात दिल्ली असली तरी सगळा जीव मात्र गल्लीत अडकून पडल्याचे कर्जत नगरपंचायतीत दिसत आहे. पदाचा आणि सत्तेचा कसा गैरवापर केला जातो हे जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आजचा न्यायालयाचा निर्णय योग्य आणि लोकशाहीला बळकट करणारा आहे. हा निर्णय दोन दिवस आधी आला असता, तर आमच्या उमेदवार प्रतिभा भैलुमे या नगराध्यक्ष झाल्या असत्या.

भैलुमे यांचा अर्ज मागे घेण्यामागेही गटनेता बदलण्यास नकार देणार्‍या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाचेच परिणाम दिसून आले. याबाबत आ. पवार यांनी न्यायालयीन निर्णय उशिरा मिळाल्याचा खेद व्यक्त केला. दरम्यान, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक लवकरच होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गटनेता बदलण्याचा निर्णय घेण्याअगोदर ही निवडणूक घेणे म्हणजे प्रशासनाने पुन्हा एकदा सत्ताधार्‍यांच्या बाजूने भूमिका घेतल्याचा आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घडामोडींमुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्तासंघर्ष आणखी गडद झाला असून राजकीय वातावरण तापले आहे. आता गटनेतेपदावर जिल्हाधिकार्‍यांचा अंतिम निर्णय आणि त्यानंतर होणार्‍या निवडणुका कर्जतच्या राजकारणाची दिशा ठरवतील.

IPL Betting : आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारा पोलिसांच्या जाळ्यात

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कायनेटीक चौकातील स्वप्निल साईसुर्या परमीट रूम अ‍ॅण्ड फॅमिली रेस्टॉरन्ट येथे शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकून आयपीएल सामन्यावर सट्टा (बेटिंग) लावत असलेल्या एकाला पकडले. शुभम दत्तात्रय भगत (वय 32 रा. जे. जे. गल्ली, मंगलगेट) असे त्याचे नाव आहे.

मंगळवारी (29 एप्रिल) रात्री दिल्ली कॅपिटल्स विरूध्द कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अंमलदार सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून शुभम भगत विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून मोबाईल, सिमकार्ड, बनावट आधारकार्ड असा 16 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्य प्राथमिक तपासात शुभम भगत याने स्वतःच्या मोबाईलवर 23 आयडी तयार करून, त्याचप्रमाणे 16 मोबाईल नंबरच्या माध्यमातून सट्टा लावत असल्याचे उघड झाले.

त्याने आयपीएल क्रिकेट बेटिंगसाठी चार मोबाईल हॅण्डसेट, स्वत:चे व बनावट दुसर्‍यांच्या नावाचे दोन आधार कार्ड, बुकी संपर्क यादी आणि कॉलिंग आयडी यादी वापरल्याचे निष्पन्न झाले. यापैकी दोन सिमकार्ड खोटी ओळख दर्शवून घेतल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सुचनेनुसार आणि उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, अंमलदार सुयोग सुपेकर, सचिन जाधव, किरण बनसोडे, हेमंत खंडागळे, सागर व्दारके यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड हे करत आहेत.

एलसीबीची भूमिका संशयास्पद
आयपीएल सामने सुरू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सर्रास सट्टा सुरू आहे. मात्र यावर एलसीबीकडून अद्याप एकही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, एलसीबीत नियुक्त असलेल्या कर्मचार्‍यांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. कारण अहिल्यानगर शहरातील ऐवढ्या मोठ्या प्रमाणात आयपीएल सट्टा सुरू असताना त्यांना एकही बुकी सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गंभीर कलमान्वये गुन्ह्याची नोंद
दरवर्षी आयपीएल सट्टा लावणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र त्यांच्यावर जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात येत होता. यंदा उपअधीक्षक भारती यांनी कारवाई करून शुभम भगत विरोधात फसवणूक, बनावटीकरण, बनावट दस्तावेज तयार करणे आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदाचे कलम 4, 5 तसेच इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपीला सात वर्षापर्यंत शिक्षा होवू शकते. यामुळे आयपीएल सट्टा लावणार्‍यांसह बुकींचे धाबे दणाणले आहेत.

ते बुकी रडारवर
भगत याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स, बुकींसोबत केलेल्या चर्चांचे स्क्रीनशॉट आणि बेटिंगसाठी वापरण्यात आलेली माहिती सापडली आहे. दरम्यान, शहरातील दाळमंडई, मंगलगेट, विनायकनगर, सारसनगर, पाईपलाईन रस्ता, गुलमोहर रस्ता, श्रीराम चौक, नेता सुभाष चौक, नेप्ती, केडगाव या भागातील मोठमोठे बुकींकडून आयपीएल सामन्यांवर सर्रास सट्टा खेळला जात आहे. ते बुकी देखील पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी होत आहे. तसेच मुंबई येथील बुकींचे कनेक्शन समोर आले आहे.

आयपीएल सट्ट्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 39 संशयित निष्पन्न झाले आहेत. यामध्ये नगरसह इतर ठिकाणच्या संशयित बुकींचा समावेश आहे. अधिक तपास सुरू असून यापुढे देखील कारवाई केली जाणार आहे.
– अमोल भारती, पोलीस उपअधीक्षक, अहिल्यानगर शहर.

Crime News : बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून युवतीची बदनामी

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील बागडपट्टी परिसरात राहणार्‍या एका 22 वर्षीय युवतीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिच्या नातेवाईक व मित्रमैत्रिणींना अज्ञात व्यक्तीने मेसेज केल्याने तिची व तिच्या कुटुंबाची समाजात बदनामी झाल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पीडित युवतीने मंगळवारी (29 एप्रिल) येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 356 (2) (अब्रुनुकसानी) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका व्यक्तीने तिच्या नावाचा वापर करून बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले होते. या खात्यावरील फोटो व मजकूर वापरून युवतीच्या नावाने नातेवाईक, मित्र मैत्रिणींना मेसेज करण्यात आले, ज्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे.

सदरचा प्रकार 11 जानेवारी 2025 पूर्वी घडला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडिताने 29 एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करीत आहेत.
दरम्यान, समाजमाध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगावी, तसेच अशा प्रकारची माहिती आढळल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Crime News : 31.60 लाखांच्या लुटीत एकाला अटक

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

रिल्स बनविण्याच्या बहाण्याने मित्राकडून 31 लाख 60 हजाराची रोकड व लॅपटॉप लुटणार्‍याच्या भावाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय ऊर्फ सागर राजेंद्र चौधर (वय 24 रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 16 लाख 50 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

25 एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात श्रेयश पांडुरंग लटपटे (वय 23, रा. भायगाव, ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली की, त्यांचा मित्र सुजित राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगाव) याने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना रिल्स बनविण्याचा बहाणा करून त्यांच्या कारमध्ये ठेवलेली 31 लाख 60 हजारांची रोकड व 10 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून पसार झाला आहे. यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाच्या दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की, सुजित चौधर याचा भाऊ अक्षय राजेंद्र चौधर याचा गुन्ह्यात सहभाग असल्याची शक्यता आहे.

पोलिसांनी अक्षय उर्फ सागर चौधर यास शिताफीने पकडले. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेल्या रकमेपैकी 16 लाख 50 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सुजित चौधर पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास जाधव, अंमलदार किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, अक्षय रोहोकले, राजेश राठोड, भगवान वंजारी, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Karjat : रोहिणी घुले यांचा उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

0

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांनी बुधवारी (दि.30) उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे दिला. यावेळी गटनेते संतोष मेहत्रे, नगरसेवक भास्कर भैलुमे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल उपस्थित होते. रोहिणी घुले यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता या रिक्त झालेल्या पदावर ठरल्याप्रमाणे कर्जत नगरपंचायतचे गटनेते संतोष मेहत्रे यांची वर्णी लागणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे.

2 मे ला नगराध्यक्षपदी रोहिणी सचिन घुले यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे. यानंतर या रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामध्ये विद्यमान गटनेते श्री.मेहेत्रे यांची निवड निश्चित आहे.
दरम्यान कर्जत नगरपंचायतच्या गटनेतेपदाच्या नोंदणीसाठी अमृत काळदाते यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हाधिकार्‍यांनी फेटाळला. त्यानंतर अमृत काळदाते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. याचिकेवर बुधवारी सुनवाणी होऊन न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांंचा आदेश रद्द केला आहे. पुढील तीन आठवड्यामध्ये अमृत काळदाते यांच्या अर्जावर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती अमृत काळदाते यांचे वकील महेश देशमुख यांनी दिली.

दरम्यान, कर्जत नगरपंचायत चे रिक्त झालेले उपनगराध्यक्षपद हे एक महिन्याच्या आत भरावे लागणार आहे. तर गटनेते पदाबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांना तीन आठवडे पूर्ण होण्यापूर्वी घ्यावा लागणार आहे. यामुळे जिल्हाधिकारी आता कोणता निर्णय अगोदर घेणार हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे. अपेक्षेप्रमाणे उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ जाहीर केल्यास उपनगराध्यक्ष पद निवडीसाठी गटनेते संतोष मेहत्रे यांचाच व्हीप सर्व 15 नगरसेवकांना बंधनकारक असणार आहे.

पिक विम्याचा हप्ता वाढवा पण वरदान ठरणारे ट्रीगर सुरू ठेवावेत

0

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्य सरकारने एक रुपयातील पिक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेवुन या पीक विमा योजनेतील शेतकर्‍यांना संकट काळात सर्वाधिक नुकसान भरपाई मिळवून देणारे ट्रीगर रद्द करून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देणारी सुधारित पीक विमा योजनेला मंजुरी दिली. यामुळे शेतकर्‍यांना अत्यल्प भरपाई मिळणार आहे. सरकारने पिक विम्याच्या शेतकरी हिस्याची रक्कम वाढवावी पण आपत्ती काळात वरदान ठरणारे ट्रीगर सुरू ठेवावेत अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

राज्य सरकारने शेतकर्‍यांना वरदान ठरणारी एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली होती. जवळपास मोफतच असणार्‍या या पिक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हवामानातील प्रतिकूल स्थिती आणि सोगंणी पश्चात होणारे नुकसान यासाठी भरपाईची तरतूद करण्यात आली होती.गेल्या तीन वर्षात शेतकर्‍यांना यामुळे मोठ्या प्रमाणात परतावे मिळाले आहेत. मध्यतंरी या योजनेत घोटाळा होऊन शेतकरी नसलेल्या व्यक्तींच्या नावे पीक विमा उतरविण्यात आल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.व सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करुन पीक कापणी प्रयोगांवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास शेतकर्‍यांकडून शेतकरी हिस्सा, खरीप पिकासाठी 2 टक्के, रब्बी पिकासाठी 1.5 टक्के आणि नगदी पिकांना 5 टक्के याप्रमाणे ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

जुन्या योजनेत 21 दिवसाचा पावसाचा खंड अतिवृष्टी अशा आपत्ती काळात विमा कंपनीला सूचना दिल्यानंतर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत होती. व शेवट कापणी प्रयोगानंतर शेतकरी नुकसान भरपाईला दुसर्‍यांदा पात्र होत होते. त्यामुळे शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळत असल्याने हे ट्रिगर शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत होते. नव्या योजनेत हे तीनही ट्रीगर रद्द करण्यात आले असून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यावर अन्याय होणार असून शासनाने विम्याचा हप्ता वाढवला तरी चालेल परंतु शेतकर्‍यांना वरदान ठरणारे ट्रिगर बदलून नयेत अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.