Monday, May 5, 2025
Home Blog Page 43

जुना वाडा कोसळला

0

नाशिक। प्रतिनिधी Nashik

पंचवटी परिसरातील जुना वाडा शुक्रवारी (दि.१८) मध्यरात्री कोसळला. वाड्याच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली वृद्धेसह एक व्यक्ती अडकला होता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य राबवून दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पंचवटीतील पेरीना आईस्क्रीम समोरील वाडा कोसळला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षास कळवली. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या वाड्याची पाहणी करत असताना वाड्यात दोन नागरिक अडकून पडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जवानांनी बचाव कार्य राबवून वाड्यात शिरून मातीच्या ढिगाऱ्याखालून मंगला प्रकाश देवकर (६०) व त्यांचा भाचा सागर उत्तमराव सोनवणे (३७) या दोघांना सुखरूप बाहेर काढले.

नागरिकांच्या माहितीनुसार, वाडा जीर्ण झाल्याने तेथील रहिवाशांनी वाडा सोडला होता, तर काही जण वाड्यातच राहत होते. तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या बचावकार्यामुळे दोघांचा जीव वाचवण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरु असून धाेकेदायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समाेर आला आहे.

आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ

0

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून पूर्वी एका आधार नोंदणीसाठी २० रुपये देण्यात येत होते. आता एका आधार नोंदणीसाठी ५० रुपये मिळणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी दिली.

डिजिटल सेवांचा विस्तार करण्यात राज्याने पुढाकार घेतला असून अद्ययावत आधार संच मिळावे, अशी मागणी राज्यातील आधार केंद्रांची होती. त्यानुसार नवीन आधार संच माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रवींद्र नाट्य मंदिर येथे मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातील सुमारे १०० आधार केंद्र चालकांना आज आधार संच सुपूर्त करण्यात आले.यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, जिल्हाधिकारी मुंबई शहर आंतल गोयल, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर राजेंद्र क्षीरसागर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यात १२ कोटी ८० लाख आधार कार्ड नोंदणी पूर्ण झाली असून ० ते ५ या वयोगटातील बालकांची नोंदणी ही ३९ टक्के इतकी झाली आहे. तर ५ ते १७ या वयोगटातील मुला-मुलींचे बायोमेट्रिक करण्यात फारशी प्रगती नाही. त्यामुळे यात वाढ होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी येत्या तीन महिन्यांत या नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आधार केंद्र चालकांना बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार विभागवार प्रथम एक लाख, द्वितीय ५० हजार तर तृतीय उद्दिष्ट साध्य करणाऱ्याला ३० हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले

Nashik Crime : नियाेजित वधूचा जाच असह्य झाल्याने आयकर खात्यातील सेवकाची आत्महत्या

0
Nashik Crime : नियाेजित वधूचा जाच असह्य झाल्याने आयकर खात्यातील सेवकाची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नियाेजित पत्नीचे (Wife) परपुरुषाशी संबंध असल्याचे लक्षात येताच आयकर खात्यात (income tax department) कार्यरत नियाेजित वराने तिला विचारणा केली. मात्र, तिने उलट या वरास धमकावत लग्नास नकार दिल्यास हुंडाबळीची फिर्याद दाखल करून ‘तुला व तुझ्या कुटुंबाला रोडवर आणीन’, अशा धमक्या देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. ही घटना नवीन सिडकाेतील उत्तमनगर येथे घडली असून नियाेजित वधुसह तिच्या प्रियकरासह इतरांवर अंबड पाेलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहिनी पांडे असे संशयित वधूचे नाव आहे. तर हरेराम सत्यप्रकाश पाण्डेय (वय ३६, रा. देवरिया, भठवा तिवारी, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव असून तो सध्या नवीन नाशिकच्या उत्तमनगरातील इन्कम टॅक्स कॉलनी येथे राहत होता. २ एप्रिल २०२५ रोजी रात्री त्याने घरात आत्महत्या (Suicide) केली हाेती.

या प्रकरणी मृताचा भाऊ हरेकृष्ण पाण्डेय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहिनी पांडे, सुरेश पांडे, आणि मयंक मुनेंद्र पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरेराम याचा विवाह मोहिनीशी ठरला हाेता. मात्र मोहिनी आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर मानसिक दबाव टाकून, धमकावून त्याचा छळ केला. या त्रासाला कंटाळून त्याने आपली जीवनयात्रा संपवली, असा दावा मृताच्या भावाने केला आहे. या प्रकरणाचा (Case) तपास महिला उपनिरीक्षक सविता उंडे करत आहेत.

Nashik News : प्रत्येक जिल्हा न्यायाधिशाकडे दोन हजार खटले; महिला न्यायाधिशांच्या संख्येत आठ टक्के वाढ

0
Nashik News : प्रत्येक जिल्हा न्यायाधिशाकडे दोन हजार खटले; महिला न्यायाधिशांच्या संख्येत आठ टक्के वाढ

नाशिक | भारत पगारे | Nashik

सर्वच जिल्हा न्यायालयांमध्ये (Nashik District) प्रत्येक न्यायाधिशांसमोर दोन-दोन हजारांहून अधिक खटले प्रलंबित असून सन २०१७मध्ये जिल्हा न्यायाधिशांमधील (District Judge) महिला न्यायाधिशांचे प्रमाण ३० टक्के असताना ते बाढून ३८.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

भारतातील १४० कोटी लोकसंख्येसाठी (Population) २१,२८५ न्यायाधीश आहेत, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भारतीय न्याय अहवाल, २०२५ मध्ये नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सल्लागार नसणे कागदपत्रे पक्षकारांचा प्रतिसाद नसणे, वारंवार अपील, साक्षीदार तपासणे, उच्च न्यायालयाची स्थगिती, जिल्हा, सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, रेकॉर्ड उपलब्ध नसणे यांसह इतर कारणांमुळे कोट्यवधी खटले प्रलंबित असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे.

उच्च न्यायालयांतील (High Court) एकूण मंजूर न्यायाधीशांच्या संख्येपैकी ३३ टक्के जागा रिक्त आहेत, त्यामुळे विद्यमान न्यायाधीशांवरील कामाचा ताण जास्त आहे असे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, देशभरातील ७१९ जिल्हा न्यायालयांमध्ये तब्बल ४ कोटी ५७ लाख ८६ हजार दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ५५ लाख ६२ हजार २२५ खटले, देशातील जिल्हा न्यायालयांत सुमारे ६९ टक्के फौजदारी, तर ३१ टक्के दिवाणी प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा न्यायालयांमध्ये १८ हजार न्यायाधीश असून, त्यांच्यासह वकील व पक्षकारांवर प्रलंबित खरान्यांचा निपटारा करण्याची जबाबदारी आहे.

प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामार्फत (Supreme Court) कृती आराखडा राबवला जात असल्याचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात सांगितले होते. त्यानुसार उच्च व सर्वोच्च न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत जिल्हा न्यायाधीशांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. सध्या देशभरातील २५ उच्च न्यायालयांमध्ये केवळ एकच महिला मुख्य न्यायाधीश आहे, असे समजते.

खटले झाले जुने

देशातील ७१९ जिल्हा न्यायालयांमध्ये ३,५८६ न्यायालये आहेत. तर महाराष्ट्रात ४२ जिल्हा न्यायालये त्यात ५०० इतर न्यायालये आहेत. राज्यात २,२२८ न्यायाधीश कार्यरत आहेत. देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांपैकी १ कोटी २४ लाख ३२ हजारांहून अधिक खटले म्हणजेच एकूण खटल्यांपैकी २७ टक्के खटले हे एक वर्षाच्या आतील तर १ कोटी ३० लाख खटले एक ते तीन वर्षे जुने आहेत.

बारा टक्के महिला आयपीएस

देशात महिला पोलिसांची संख्या वाढत असताना अधिकारी स्तरावर महिलांचे प्रतिनिधित्व कमीच आहे. राष्ट्रीय पातळीवर आठ टक्के महिला पोलीस अधिकारी आहेत. त्यापैकी ५२ टक्के महिला उपनिरीक्षक पदावर असून, २५ टक्के महिला सहाय्यक उपनिरीक्षक तर कॉन्स्टेबल पदावर १३ टक्के महिला आहेत. १२ टक्के महिला आयपीएस अधिकारी आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.

अहवालातील ठळक मुद्दे

उच्च न्यायालयातील न्यायाधिशांमध्ये ३३ टक्के आणि जिल्हा न्यायव्यवस्थेत २१ टक्के पदे रिक्त
अलाहाबाद आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयांमध्ये, प्रतिन्यायाधीश १५ हजार खटले आहेत
राष्ट्रीय स्तरावर, जिल्हा न्यायालयांमध्ये, प्रति न्यायाधीश सरासरी कामाचा ताण २,२०० खटले आहेत.
२०१६-१७ ते २०२५ दरम्यान उच्च न्यायालयातील न्यायाधिशांची एकूण मंजूर संख्या १,१३६ वरून १,१२२ पर्यंत घसरली.
लोकसंख्येनुसार भारतात सरासरी १८.७ लाख लोकसंख्येमागे एक उच्च न्यायालयाचा न्यायाधीश
६९ हजार लोकसंख्येमागे एक कनिष्ठ न्यायालयाचा न्यायाधीश

Gunaratna Sadavarte : राज ठाकरेंना अटक करा, त्यांचे वर्तन तालिबानी; सदावर्तेंचा हल्लाबोल, पोलिसांत तक्रार

0

मुंबई । Mumbai

राज्यातील शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्यात आल्याच्या निर्णयावरून सध्या राज्याचे वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) याला तीव्र विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काल ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट करत या निर्णयाला विरोध दर्शवला.

राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक होत राज्य शासनाच्या निर्णयाचे प्रतीकात्मक दहन केले. अनेक ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन “आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही” असे लिहिलेले फलक झळकावले. यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले. “शाळांना टार्गेट करणं हे विदारक आहे. विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त भाषा शिकण्याची संधी मिळतेय, हे स्वागतार्ह आहे. पण यावरून राज ठाकरे जे वागले, ते तालिबानी पद्धतीसारखं आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. तसंच, “राज ठाकरेंना कायद्याची जाण आहे की नाही, यावरच शंका आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नीट न वाचता त्यांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी हा विरोध उभा केला आहे,” असंही ते म्हणाले.

सदावर्ते यांनी मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावर देखील टीका केली. “शासन निर्णयाचे दहन करणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. न्यायालयाने फलक लावण्यावर बंधन घातले असताना देखील नियम तोडण्यात आले,” असं ते म्हणाले. “‘आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही’ असे फलक लावणे हे समाजात फूट पाडणारे कृत्य आहे. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा,” अशी ठाम मागणी सदावर्ते यांनी केली.

संपूर्ण प्रकरणावर मनसेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहता पक्ष लवकरच यावर आपली भूमिका अधिक स्पष्ट करेल, अशी शक्यता आहे. या वादामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे हिंदी भाषेच्या सक्तीला समर्थन देणारे गट आहेत, तर दुसरीकडे त्याला विरोध करणाऱ्या संघटना आणि राजकीय पक्ष जोरदार आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भाषिक अस्मितेचा मुद्दा पुढे आला आहे. यापुढे यावरून काय घडामोडी होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nashik News : भाजपा युवा मोर्चाकडून काँग्रेस भवनासमोर निषेध आंदोलन

0
Nashik News : भाजपा युवा मोर्चाकडून काँग्रेस भवनासमोर निषेध आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या व राज्यसभा सदस्य सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे नाव सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने एका मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपत्रात दाखल केल्याचे कळताच भाजपा युवा मोर्चा (BJP Yuva Morcha) नाशिकच्या वतीने आज काँग्रेस भवन समोर गांधी यांचा निषेध करत तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आरोपपत्रात सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्याही नावाचा समावेश आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ साली एक याचिका (Petition) दाखल केली आणि या याचिकेत काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणुकीचा (Fraud) आरोप केला. सत्र न्यायालयाने आयकर विभागाला नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि गांधी कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची परवानगी दिली.

त्यानंतर हे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाकडे सोपवण्यात आले. यानंतर दि. ११ एप्रिल रोजी ईडीने ६६१ कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चा नाशिक शहराध्यक्ष सागर शेलार यांनी दिली. त्यामुळे सरकार (Government) आणि न्यायव्यवस्थेने कारवाई करून अटक (Arrested) करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, यावेळी युवा मोर्चा नाशिक शहर सरचिटणीस प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, हर्षद जाधव, संदीप शिरोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य यश बलकवडे, शहर उपाध्यक्ष पवन उगले, प्रवीण पाटील, गौरव घोलप, शहरातील मंडळ अध्यक्ष गौरव बोड़के, अक्षय गांगुर्डे, अविनाश पिंपरकर, उमेश मोहिते यांच्यासह आदी उपस्थित होते.

Anjali Damania : तटकरेंसाठी खास ४ हेलिपॅड का?; अंजली दमानिया यांचा संतप्त सवाल

0

मुंबई । Mumbai

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले. मात्र या ऐतिहासिक कार्यक्रमापेक्षा शाह यांचा खास सुतारवाडी दौरा आणि त्यासाठी करण्यात आलेली खर्चिक व्यवस्था यावरच अधिक चर्चा रंगली आहे.

गृहमंत्री अमित शाह हे रायगड कार्यक्रमानंतर थेट खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील घरी स्नेहभोजनासाठी गेले. ही भेट खासगी स्वरूपाची असूनही त्यासाठी शासनाच्या तिजोरीवर १ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. सुतारवाडीत हेलिकॉप्टर उतरण्यासाठी खास ४ हेलिपॅड तयार करण्यात आली होती. या संदर्भातील टेंडर ९ एप्रिल रोजी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचे उघड झाले आहे.

यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जनतेच्या कष्टाने कमवलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खासहेलिपॅड? अमित शाह यांची भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शाहांना जेवायला घालायचंय तर खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? असा सवाल करीत तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा, अशा शब्दात दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करीत सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.

Aaditya Thackeray : “आम्ही मराठीची बाजू घेतो, तुम्ही हिंदीची घ्या”; आदित्य ठाकरेंनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी  

0
Aaditya Thackeray : "आम्ही मराठीची बाजू घेतो, तुम्ही हिंदीची घ्या"; आदित्य ठाकरेंनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी  

मुंबई | Mumbai

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या (Hindi Language) या धोरणाला कडाडून विरोध केला करत आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलतांना भूमिका मांडत महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की. “आमचे स्पष्ट मत आहे की, महाराष्ट्रात सर्वांना मराठी आलेच पाहिजे. मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्त्वाची आहे ती इंग्रजी. कारण ही जागतिक भाषा आहे. तिसरी भाषा मग हिंदी असेल किंवा इतर कोणती हे शिकणे महत्त्वाचे आहे. कारण ज्यांना जास्तीत जास्त भाषा येतात त्यांची प्रगतीही जास्त होते. आपल्याकडे सर्वांत कठीण परीक्षा कोणती असते तर ती यूपीएससीची. तुम्ही कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याकडे पाहा. त्यांना मातृभाषा येते इंग्रजी येते, हिंदी येते आणि ते ज्या ठिकाणी सेवेत असतात तेथील स्थानिक भाषाही (Language ) येते”, असे त्यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले की, “या निर्णयाकडे राजकारणाच्या (Political) दृष्टीने पाहायचे असेल तर योगायोग बघा.परवा ज्या भेटीगाठी झाल्या, एकमेकांना आधार देण्यासाठी असतील. एकमेकांना आयडिया देण्यासाठी असतील. यातून एकच दिसते, कदाचित असा डाव असू शकतो, बिहारची निवडणूक येत आहे, भाजपाला तिथे गरज आहे. नंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागेल, आम्ही मराठीचा विषय घेतो, तुम्ही हिंदीचा विषय घ्या, दोघांचा फायदा लोक मरतील यात आपले काय. आपले तर नीट चालेल असा विचार असू शकतो”, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “ज्यांनी हे परिपत्रक काढले आहे, त्या मंत्री महोदयांना देखील एकतरी भाषा व्यवस्थित येते का? असे म्हणत त्यांनी मंत्री दादा भुसेंना टोला लगावला. तसेच मी कोणाची टिंगल करत नाही, पण तुम्ही गणवेश (Uniform) देऊ शकत नाहीत आणि तिसरी भाषा सक्तीची करणार आहात. अनेक ठिकाणी एकच शिक्षक असतात, त्या शिक्षकांवर किती भार पडणार हे लक्षात ठेवा. देशात आपण धर्मावर भांडत आहोत, जातीवर आणि आता शिक्षणात (Education) भाषा कोणती यावर भांडत आहोत, हे सगळं केंद्र सरकारमुळे झाले आहे. जोपर्यंत ही पद्धत आपण बदलत नाही तोपर्यंत कठीण आहे. माझा भाषेला विरोध नाही. मात्र, ती कशी एक-एक करून शिकवता येईल याचा विचार करायला हवा”, असेही ठाकरे यांनी म्हटले.

IPL 2025 : PBKS vs RCB – आज पंजाब किंग्ज-बंगळुरू भिडणार; कोण जिंकणार?

0
IPL 2025 : PBKS vs RCB - आज पंजाब किंग्ज-बंगळुरू भिडणार; कोण जिंकणार?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (शुक्रवारी) बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरूध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab Kings vs Royal Challengers Bangalore) संघांमध्ये सामना खेळविण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली खेळताना बंगळूरु संघाने ६ सामन्यात ४ विजय आणि २ पराभवांसह ८ गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना ६ पैकी ४ सामन्यात विजय संपादन केला आहे. त्यामुळे आपली विजयी लय कायम राखण्यासाठी आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाचवा विजय संपादन करण्याची संधी बंगळूरु आणि पंजाब किंग्ज संघाकडे असणार आहे.

दरम्यान, आयपीएल स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३३ सामने खेळविण्यात आले असून, पंजाब किंग्जने १७ तसेच बंगळूरु संघाने १६ सामन्यात विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे बंगळूरु संघाने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) पंजाब किंग्ज विरूध्द १२ सामने खेळले असून, बंगळूरु संघाने ७ तर पंजाब किंग्जने ५ सामन्यात विजय संपादन केला आहे.

Manikrao Kokate : मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांचे पंख छाटले; बदल्यांचे अधिकार स्वतःकडे घेतले

0
Manikrao Kokate : मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांचे पंख छाटले; बदल्यांचे अधिकार स्वतःकडे घेतले

मुंबई | उद्धव ढगे पाटील | Mumbai

कृषी खात्यातील (Department of Agriculture) अधिकाऱ्यांच्या मध्यावधी बदल्या तसेच कृषी संचालकांच्या नियतकालिक बदल्यांचे अधिकार स्वतःकडे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना चाप लावला आहे. याशिवाय सामान्य राज्यसेवा गट अ आणि ब, महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि ब (कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी), सामान्य राज्यसेवा गट अ आणि ब आदी संवर्गातील नियतकालिक बदल्यांचे अधिकार कृषी आयुक्तांना देण्यात आले आहेत.

कृषी विभागाने (Department of Agriculture) गुरुवारी बाबाबतचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांच्या बदल्यांचे अधिकार मर्यादित केले आहेत. वादग्रस्त विधाने करून नव्यानव्या वादाला निमंत्रण देणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिली होती. आता देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने कृषी विभागाने खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण स्पष्ट केले आहे. काही संवर्गातील अधिका-यांच्या मध्यावधी बदल्यांसाठी कृषीमंत्री सक्षम प्राधिकारी असले तरीही गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांची (CM) मान्यता घेणे आवश्यक राहील, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

शासन निर्णयानुसार कृषी सहसंचालक आणि अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नियतकालिक बदल्यांचे अधिकार कृषीमंत्र्यांना देण्यात आले आहेत. मात्र, या दोन्ही पदांच्या मध्यावधी बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असणार आहेत. सामान्य राज्य सेवा गट अ आणि ब, महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि ब (कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी), सामान्य राज्य सेवा गट अ आणि ब आदी संवर्गातील मध्यावधी बदल्यांच अधिकार कृषी मंत्र्यांना असतील, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तर गट क कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांचे अधिकार विभागीय कृषी सहसंचालक आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि विभागाअंतर्गत कृषी सहसंचालकांना असणार आहेत.

पीक उत्पादन खर्च कमी करण्यासाठी समिती

राज्यातील शेतकऱ्यांचा पीक उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी करण्यासाठी पिकाच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत मजुरीवर होणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के खर्च मनरेगामधून अदा करण्यासंदर्भात अभ्यास करून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. सदर समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन मजुरीच्या खर्चाचा मनरेगामध्ये समावेश करण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलताना दिली.