Monday, May 5, 2025
Home Blog Page 46

Rahuri : तहसिलदारांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न

0

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरातील मुरूम उत्खनन बंद करा. तसेच शस्त्र परवाने रद्द करा या मागणीसाठी उंबरे येथील एका इसमाने राहुरी तहसिलदार यांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केल्याने तहसील परिसरात गोंधळ उडाला होता. संबंधित इसमाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

याबाबत नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रार अर्जात म्हटले की, उंबरे येथील भाऊसाहेब दशरथ काळे यांनी काही दिवसांपूर्वी उंबरे परिसरातील मुरूम उत्खनन बंद करावे, तसेच शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी दि.21 एप्रिल रोजी उपोषणाचा तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र काल दुपारच्या सुमारास राहुरी तहसिलदार यांच्या दालनात येऊन आरडाओरड करून स्वत:जवळील पेट्रोल असलेल्या बाटलीतून अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब काळे यांना पोलिसांच्या हवाली केले. मात्र या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

काल राहुरी तहसील कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल ओतून घेणार्‍य इसमाला गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी उंबरे येथील एका शस्त्र परवानाधारकाने शास्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती अशी चर्चा आहे. या शस्त्र परवानाधारकाची राहुरीसह जिल्ह्यातील काही पोलिसांचे ऊठबस असल्यामुळे या इसमावर कुठलीही कारवाई पोलीस करत नाही. या शस्त्र धारकाकडे अनेक पोलीस अधिकारी जेवणाच्या पार्टीसाठी येतात व तेच फोटो व्हायरल करून दहशत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून हा परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा उंबरेचे सुद्धा बीड झाल्याशिवाय राहणार नाही अशी सध्या या परिसरात चर्चा सुरू आहे

Ahilyanagar : नवीन धोरणानुसार 13 वाळूपट्ट्यांचा लिलाव

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अनेक दिवसांपासून लिलावाची प्रतीक्षा असलेल्या वाळूपट्ट्यांच्या लिलावाला मुहूर्त मिळाला आहे. राज्य सरकारच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 13 वाळूपट्ट्यांना पर्यावरण विभागाचा ग्रीन सिग्नल मिळाला आहे. 9 एप्रिलला राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. यानुसार, 2022 पूर्वी प्रचलित असलेल्या वाळू धोरणानुसार, घाटांचा लिलाव होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने नवीन वाळू धोरण ठरवले. मात्र, जून महिन्यांत पावसाळा सुरू होणार असून या काळात वाळू बंदी राहणार असल्याने नवीन धोरणावर कधी अंमलबजावणी होणार हा प्रश्न आहे. गतवर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे जिल्ह्यातील वाळू उपशाला ब्रेक लागला होता. पर्यावरण विभागाची मान्यता मिळू शकली नाही.

यामुळे लिलाव प्रक्रिया बरेच दिवस रखडली. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीच्या अनेक घटना उघड झाल्या होत्या. अधिकार्‍यांवर माफियांकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्याचे दिसून आले होते. 2023 साली तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवीन वाळू धोरण आणले होते. या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात वाळू डेपो तयार करण्यात आले होते. या डेपोतून वाळूची विक्री केली जात होती. जिल्ह्यात सध्या 18 वाळू डेपो कार्यरत असून 24 ते 25 हजार ब्रास वाळू साठा आहे. या डेपोतून जुन्या धोरणानुसार वाळूची विक्री केली जात आहे. दरम्यान, त्या काळातील दोन डेपो रद्द करण्यात आले असून सरकारच्या धोरणामुळे चोरट्या मार्गाने वाळू तस्करी जोर असल्याची चर्चा आहे.

नवीन वाळूसाठी दिवाळीचा मुर्हूत ?
जिल्ह्यात मुळा, प्रवरा, गोदावरी, घोड आणि भीमा हे महत्त्वाचे नदी पात्र आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जत, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील 13 वाळू पट्ट्यांचा नवीन धोरणानुसार, लिलाव करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत 13 वाळू पट्ट्यांची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नवीन धोरणानुसार, लिलाव होणार आहेत. परंतु उर्वरित वाळू पट्ट्यांची निविदा प्रक्रिया राबण्यासाठी शासनाकडे केवळ एक महिन्यांचा कालावधी बाकी आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान वाळू उपसा केला जात नाही. यामुळे सरकारच्या सुधारित धोरणामुळे दिवाळीच्या दरम्यान शासकीय वाळू मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

घरकुलांसाठी मोफत वाळू
नव्या धोरणानुसार आता लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणार्‍या प्रत्येक वाळू गटामधील 10 टक्के वाळू विविध घरकूल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रासपर्यंत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हातपाटी-डुबी या पारंपरिक पद्धतीने केल्या जाणार्‍या वाळू उत्खननासाठी वाळू गट राखीव ठेवण्यात येणार आहेत.

Sangamner : तलाठ्याच्या नावाने लाच घेणार्‍या पत्रकाराला पकडले

0

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील मांडवे येथे ट्रकमधून खडी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी एका पत्रकाराने तलाठ्याचे नाव सांगून तक्रारदाराकडे दरमहा चाळीस हजार हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर चर्चा झाल्यावर पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना यूट्युब पत्रकाराला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी (दि.16) रंगेहाथ पकडले. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांत पत्रकार व कामगार तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मांडवे येथील तक्रारदार यांचा खडी वाहतुकीचा व्यवसाय आहे. सदर वाहतूक ट्रकमधून सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी पत्रकार रमजान नजीर शेख (वय 28, रा. मांडवे, ता. संगमनेर) याने दरमहा चाळीस हजार रुपये द्यावे लागतील असे कामगार तलाठी अक्षय बाबाजी ढोकळे यांनी सांगितले आहे. त्यानंतर तक्रारदाराने दोघांची भेट घेऊन खडी वाहतुकीबाबत चर्चा केली. त्यावर तक्रारदाराने तलाठी ढोकळे यांना सांगितले की, मी तुम्हांला पन्नास हजार रुपये देतो परंतु मला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. या चर्चेनुसार ही रक्कम मी घेतो, पण दोन महिनेच ट्रक चालविता येईल असे सांगून तलाठ्याने लाच स्वीकारण्यास संमती दिली.

त्यानंतर पत्रकार शेख यास गावातील मारुती मंदिरासमोर तक्रारदार यांच्याकडून पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाई नंतर शेख याने ढोकळे यांना फोनवरुन पैसे दिले असल्याचे सांगितले, तेव्हा उद्या बघू असे म्हणून तलाठ्याने लाचेच्या रकमेस संमती दर्शवून प्रोत्साहन दिले. या पथकात पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, पोहेकॉ. सुनील पवार, पोना. योगेश साळवे व परशुराम जाधव यांचा समावेश होता. याप्रकरणी घारगाव पोलिसांत पत्रकार रमजान शेख व कामगार तलाठी अक्षय ढोकळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Ahilynagar : न्यायालयाच्या आदेशाने ‘त्या’ कॉलेजची जागा रिकामी

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भाडेकराराबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा विरोधात निकाल गेल्याने न्यायालयाच्या आदेशाने बोल्हेगाव उपनगरातील मनमाड रस्त्यालगत असलेल्या काकासाहेब म्हस्के मेडिकल व नर्सिंग कॉलेजची जागा बेलीफ व एमआयडीसी पोलिसांच्या बंदोबस्तात संकुलातील सर्व महाविद्यालये, हॉस्टेल, हॉस्पिटल, कार्यालय, कॅन्टीग खाली करून जागेचा ताबा घेण्यात आला. दरम्यान, संकुलात सुमारे 900 विद्यार्थी शिकत असून, ऐन परीक्षेच्या तोंडावर कॉलेज बंद झाल्याने त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. जागामालक अनिल जाधव यांनी ही जागा ताब्यात घेतली आहे.

काकासाहेब म्हस्के कॉलेजने ही जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. या भाडे कराराबाबत सन 2005 पासून न्यायालयात वाद सुरू होता. 2018 मध्येच न्यायालयाने कॉलेजची जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महाविद्यालयाकडून हे आदेश पाळले गेले नव्हते. यंदाही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते आणि शिक्षण सुरू होते. मार्च 2025 मध्ये न्यायालयाने पुन्हा आदेश देत म्हस्के कॉलेजने जागा रिकामी करून ती अनिल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर 17 एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात सदर जागा ताब्यात घेण्यात आली. यावेळी अचानकपणे कॉलेज व वसतिगृह रिकामे करण्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- व्यवस्थापक
कॉलेज प्रशासनाने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, गुरूवारी काही लोकांनी कॉलेजमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आणि भविष्यातही घेणार आहोत. जो काही गोंधळ झाला, त्याचे व्यवस्थापन आमच्याकडून केले जात आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.

AMC : ‘एआय’ तंत्रज्ञान ठेवणार सफाई कामगारांवर वॉच

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात साफसफाई करणार्‍या सफाई कामगारांच्या कामचुकारपणाला आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी लगाम घालण्याची तयारी सुरू केली आहे. सफाई कामगारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन एआय आधारित मोबाईल अ‍ॅपवर फेस रिडिंगव्दारे हजेरी द्यावी लागणार आहे. प्रत्येक कर्मचार्‍याचे कार्यक्षेत्र व वेळ यात निश्चित करण्यात आल्याने कोणता कर्मचारी कुठे काम करतोय, कामकाजाच्या वेळेत कार्यक्षेत्रात काम करतोय की नाही, यावर आता थेट नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे साफसफाईच्या कामात सुधारणा होईल, असा विश्वास आयुक्त डांगे यांनी व्यक्त केला.

डांगे यांनी फेस रिडिंगव्दारे हजेरीसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅपची माहिती घेऊन त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली. या अ‍ॅपमध्ये सर्व कामगारांची माहिती, त्यांच्या कामकाजाचे क्षेत्र व कामाची वेळ, हजेरीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक कामगाराला आता वेळेत कामावर येऊन त्यांना ठरवून दिलेल्या क्षेत्रातील काम पूर्ण करावे लागणार आहे. त्याने काम केले की नाही, हेही यातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ठराविक वेळेत येऊन हजेरी लावत कामात कुचराई करणार्‍या कामगारांना चाप बसणार आहे.

कामगारांच्या हजेरी व गैरहजेरीची माहिती यातून मिळणार आहे. त्याआधारे पगार दिला जाणार आहे. कर्मचारी कामाच्या वेळेत कार्यक्षेत्र सोडून बाहेर गेल्यास तत्काळ त्याच्या वरिष्ठांना याची माहिती मिळणार असल्याचे डांगे यांनी सांगितले. सर्व उपाययोजनांमुळे साफसफाईच्या कामात सुधारणा होईल, नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होऊन अस्वच्छतेच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल, असा आशावादही डांगे यांनी व्यक्त केला.

बनावटगिरी टळणार
शहरात काही सफाई कामगार स्वतः कामावर न येता त्यांच्या जागेवर इतर व्यक्ती पाठवतात. मात्र, आता फेस रीडिंग हजेरीमुळे हे प्रकार बंद होणार आहेत. त्यामुळे बदली अथवा बनावट कर्मचारी कामावर दाखवून चुकीची हजेरी लावण्याचे प्रकार टळणार आहेत.

झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने महिलेचा मृत्यू

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील सबजेल चौक परिसरात राहणार्‍या एका महिलेचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने झाला असल्याचे समोर आले आहे. भावना सतीश उपलांची (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरची घटना बुधवारी (16 एप्रिल) घडली.

भावना उपलांची यांनी झोपेच्या गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याचे त्यांच्या नातेवाईकांच्या लक्ष्यात येताच त्यांनी उपचारासाठी भावना यांना अहिल्यानगर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा रात्री मृत्यू झाला. यासंदर्भात संबंधित खासगी रुग्णालयातून मिळालेल्या डेथ मेमोच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार आनंद दाणी अधिक तपास करीत आहेत.

Crime News : नातेवाईकांकडूनच अनधिकृत प्रवेश करून वस्तुंची चोरी; शिक्षिकेच्या घरी घरफोडी

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एका शिक्षिकेच्या घरी त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या नातेवाईकांनी घरफोडी करून संसारोपयोगी साहित्यासह 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सदरची घटना 14 एप्रिल रोजी सायंकाळी घडली असून 16 एप्रिल रोजी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंदाकिनी सदाशिव लाटे (वय 52, हल्ली रा. वडाळी, ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वडाळी येथे नोकरीस असून त्या आठवड्याच्या सुट्ट्यांमध्ये अहिल्यानगर शहरातील गुलमोहर रौनक अपार्टमेंट, प्लॉट नं. 10 येथे वास्तव्यास येतात.

सदर फ्लॅट त्यांच्या नावावर असून त्यांनी तो 2008 साली खरेदी केला आहे. 15 एप्रिल रोजी त्यांचा मुलगा प्रतिक औटी फ्लॅटवर गेला असता, फ्लॅटचे कुलूप तोडलेले असून घरातील सामान चोरीस गेले आहे, असे त्याच्या लक्ष्यात आले व त्याने फिर्यादीला माहिती दिली. त्यांनी तातडीने फ्लॅटवर धाव घेतली असता त्यांना घरातील वस्तू दिसून आल्या नाही. स्थानिकांकडून माहिती घेतली असता 14 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंदाकिनी यांचे नातेवाईक सोपान रामनाथ कासार (रा. ऐश्वर्या बंगला, तिडके कॉलनी, बाजीरावनगर, नाशिक) हे टेम्पोसह काही तरुणांसोबत आले होते.

त्यांनीच फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील वस्तू उचलून नेल्याचे वॉचमनने सांगितले. घरातील वस्तूमध्ये सोफा, वॉल फॅन, गिझर, इन्व्हर्टर, घरगुती भांडी व इतर वस्तूंचा समावेश आहे. यासंदर्भात मंदाकिनी लाटे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोपान रामनाथ कासार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shrigonda : संत शेख महंमद महाराज मंदिरासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार

0

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

वारकरी संप्रदाय जातीयता मानत नाही. श्रीगोंद्यात संत शेख महंमद यांचा परंपरेने उत्सव साजरा केला जातो. संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारा आड येणार्‍या आमीन शेख नावाचा मीठाचा खडा बाजूला काढून टाकावा लागेल. संत शेख महंमद यांचे मंदिर हे वारकर्‍यासाठी इतिहास आणि अस्मितेचा प्रश्न आहे. मंदिराचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचे प्रतिपादन हभप बंडातात्या कराडकर यांनी श्रीगोंदा येथे केले.
श्रीगोंदा शहरातील संत शेख महमंद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गावकर्‍यांनी, वारकर्‍यांनी श्रीगोंदा शहर कडकडीत बंद पाळून तहसील कार्यलयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले आहे. यावेळी हभप बंडातात्या कराडकर म्हणाले, संत परंपरेतून संत शेख महंमद यांना बाजूला जाऊ देणार नाही.

संत शेख महंमद यांचे आध्यात्मिक साहित्य ज्यांना मान्य नाही. तो त्यांचा वंशज कसा असेल. मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलतो. सरकारने गावकर्‍यांना बेमुदत धरणे धरण्याचा वेळ आणू नये. लवकरात लवकर मंदिराचा जीर्णोद्धार सुरू व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. संत तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे यांनी आमीन शेख यांना संत कळले नाहीत. त्यांना त्याचे वाड्मय माहिती नाही. शेख महंमद यांच्या समाधीला कान लावा. तुम्हाला आत्म साक्षात्कार होईल. मंदिराचे आता काम थांबणार नाही. हा विषय संपूर्ण वारकर्‍यांचा आहे. संत शेख महंमद यांनी भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी केली, असे सांगितले. खा. निलेश लंके यांनी समजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने दर्गाह ट्रस्ट तातडीने रद्द करावे, समाजाची भावना महत्वाची असल्याचे सांगितले. माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी मंदिराच्या विषयात समोरची माणसे त्या पात्रतेची नाहीत. केवळ चर्चा करून प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्री यांची वेळ घेतली आहे. मुख्यमंत्री हा प्रश्न सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला.

आमदार विक्रम पाचपुते यांनी मंदिरासाठी संयम महत्वाचा आहे. आंदोलन हे ठिय्या आंदोलन आहे. शासन दरबारात प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर तो कायदा बदलण्याचे काम जनभावना करत असते. संयमाने पुढे जायचे आहे. ज्या सूचना येतील त्या मान्य आहे. आंदोलनाची दखल शासनाने घेतली आहे. घनश्याम शेलार यांनी आमीन शेख यांनी देवस्थान मठाचे नाव बदलले रेकॉर्डवर सुफी संत हजरत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट असे नाव बदलले आहे ते गावाला मान्य नाही, असे स्पष्ट केले. यावेळी राजेंद्र नागवडे यांनी शेख याने हेकेखोरपणा सोडावा.गावाला निर्णय घेण्याचे वेळ आली आहे. तो नाटक करतो, पण कृती करत नाही, असे सांगितले. यावेळी बाबासाहेब भोस, नाना कोथंबीरे, टिळक भोस, अरविंद कापसे, रंगनाथ बिबे, बाळासाहेब नाहटा, बाळासाहेब महाडिक, रामचंद्र महाराज दरेकर, प्रणोती जगताप, मनोहर पोटे आदींची भाषणे झाली.

NMC : मनपाकडून लवकरच पाच नवीन ई-चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होणार

0

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक मनपाच्या वतीने येत्या काही दिवसांत शहरात पाच ठिकाणी नवीन ई-चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या या ई-स्टेशनचे प्रति युनिट दर खासगी चार्जिंग स्टेशनपेक्षा दहा ते तेरा रुपयांनी कमी राहणार आहे.

नाशिक शहरात तीन खासगी चार्जिंग स्टेशन आहेत. त्याचे दर 21 ते 29 रुपये प्रति युनिट असल्याचे मनपाने म्हटले आहे. त्या तुलनेत महापालिकेच्या ई-चार्जिंग स्टेशनवरील दर कमी आहे. मनपा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन एक ते दीड आठवडयात कार्यन्वित होणार आहेत.

वाहन चार्जिंगसाठी साडेसोळा रुपये प्रति युनिट दर ठरवल्याने ई-वाहन वापरणार्‍यांची गर्दी होणार आहे. सध्या राजीव गांधी भवन येथे टेस्टींग म्हणून वाहनांना चार्ज केले जात असून तेथे वाहनधारकांची गर्दी होत आहे.

एक ते दीड वर्षापासून चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचे प्रयत्न मनपाच्या यांत्रिकी विभागाकडून सुरु होते. नाशिक शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनकॅप) योजनेअंतर्गत दहा कोटींच्या निधीतून शहरात वीस चार्जिंग स्टेशन उभारत आहे. पहिल्या टप्यात शहरातील वीस ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही सोय असेल.

ट्रक-टँकर अपघातात दोघांचा मृत्यू

0

वावी । वार्ताहर vavi

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका संपायचे नाव घेत नसून मलढोण शिवारात चैनल नंबर 545 वर बुधवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास झालेल्या मालवाहू ट्रकला पेट्रोल वाहतूक करणार्‍या टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांंचे चालक जागीच ठार झाले.

समृद्धी महामार्गावर मलढोण शिवारात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताची माहिती समृद्धी महामार्गावरील वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी मिलिंद सरवदे यांना मिळताच त्यांनी शिर्डी, सिन्नर, गोंदे येथील वाहतूक नियंत्रण कक्ष व वावी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. .

छत्रपती संभाजी नगर येथून बियरच्या बाटल्यांनी भरलेला मालट्रकचे टायर पंचर झाल्याने चालकाने मळढोण शिवारात रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 20/– 2932 उभा केला व पंक्चर काढण्याचे काम चालू असतानाच भरधाव वेगात नागपूरहून मुंबईकडे जाणार्‍या जिओ कंपनीच्या रिकाम्या पेट्रोल टँकर क्र. एम. एच. 29/ — 2519 ने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये दोनही ट्रक व टँकर चालक ठार झाले.

ट्रक चालकाचे नाव समजू शकले नाहीतर मयत टँकर चालकाचे नाव विजेंद्र मनी तिवारी आहे. शिर्डी येथील वाहतूक शाखेच्या रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दोनही वाहनांच्या नंबरवरुन दोनही चालकांच्या नातेवाईकांसह मालकांशी वावी पोलीस संपर्क करत आहे.

नासिक उत्पादन शुल्क विभागाला बिअर भरुन आलेल्या ट्रकबाबत वावी पोलीसांनी माहिती दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय कोठावळे, हवालदार लगड करीत आहेत.