Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 51

Ahilyanagar : 23 एप्रिलला शिक्षक बँकेला मिळणार नवीन चेअरमन

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सुमारे 10 महिन्यांपूर्वी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाच्या संचालक मंडळात फूट पडून दोन गट पडले होते. यातील एका गटाने विद्यमान चेअरमन बाळासाहेब सरोदे यांच्यासोबत जात विरोधी मंडळाचे शिक्षक नेते रावसाहेब रोहकले व संजय कळमकर यांच्याशी छुपी युती करत गुरूमाऊली मंडळाच्या बापूसाहेब तांबे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, चेअरमन सरोदे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर नूतन चेअरमनच्या निवडीसाठी 23 एप्रिलला संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.

या निवडीमुळे भर उन्हाळ्यात प्राथमिक शिक्षक संघटनांमधील वातावरण तापणार आहे. 10 महिन्यांपूर्वी संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीच्यावेळी तांबे यांनी दिलेले आदेश डावलत चेअरमनपदी सरोदे यांना मतदान करण्यात आले. या घटनेनंतर गुरूमाऊली मंडळात फूट पडली होती. मात्र फुटलेले संचालक आपण गुरूमाऊली मंडळात असून पदाधिकारी निवडीत एकमत न झाल्याने मतदान होऊन त्यात सरोदे यांची निवड करण्यात आल्याचा दावा केला केला होता. दरम्यान सुमारे 10 महिन्यांच्या कालखंडानंंतर सरोदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून यामुळे रिक्त झालेल्या पदावर निवडीसाठी 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी होणार आहेत. यात सर्वप्रथम चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे, माघारीची प्रक्रिया आणि आवश्यकतेनूसार मतदान होवून त्यानंतर मतमोजणी होऊन विजयी उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर या पध्दतीने व्हा. चेअरमन पदासाठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यावेळी पुन्हा सत्ताधारी तांबे गटाचे सर्व संचालक एकत्र येणार की सरोदे यांच्यासोबत गेलेल्या गटाला तांबे गट बाजूला ठेवणार. सरोदे हे विरोधी मंडळा सोबत आपला उत्तराधिकारी निश्चित करणार की शिक्षक बँकेच्या राजकारणात आणखी काही वेगळे होणार येत्या काही दिवसात समोर येणार आहे.

बँकेचा व्यवस्थापन खर्च एक कोटींनी वाढला
गेल्या काही महिन्यांत शिक्षक बँकेच्या पदाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या पगारात 16 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिक्षक बँकेच्या तिजोरीवर दर महिन्याला 8 ते 9 लाखांचा भार वाढला. हा हिशोब वर्षभरात कोटींच्या पुढे गेला असून यातील कर्मचार्‍यांना किती पैसे मिळाले आणि कोणी कोणी यावर हात साफ केला, याचा हिशोब द्यावा, अशी मागणी गुरूमाऊलीच्या तांबे गटाच्या संचालकांनी केली आहे.

तांबे गटाच्या भूमिकेकडे लक्ष
शिक्षक बँकेच्या संचालक मंडळात फुटलेला गटा हा विरोधी मंडळाचे नेते रावसाहेब रोहकले आणि संजय कळमकर यांच्यासोबत असल्याचे दिसून आले आहे. बँकेतील सत्तेसाठी यापूर्वी अनेक प्रमुख गटाचे विभाजन झाल्याचे दिसून आलेले आहे. माजी चेअरमन रोहकले यांच्या विरोधात जी निती तांबे यांनी वापरली, तीच निती पुन्हा विरोधकांनी तांबे यांच्या बाबत वापरत त्यांना शह दिला होता. यामुळे आता तांबे गट फुटलेल्या 10 ते 12 संचालकांना जवळ करणार की 2027 च्या निवडणुकीची तयारी करणार याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Sangamner : टँकरची मागणी होताच तात्काळ टँकर उपलब्ध करून द्या

0

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

पूर्वीच्या काळी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना होते. परंतु पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकारी यांना दिले आहेत .त्यामुळे ज्या गावातून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी होईल त्या गावासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश आ. अमोल खताळ यांनी टंचाई आढावा बैठकीत अधिकार्‍यांना दिले.

यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवना मध्ये आ. अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी रामदास कोकरे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

आ. खताळ म्हणाले, सध्या तालुक्यामध्ये पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टँकर कसा उपलब्ध करून देता येईल, याची ग्रामसेवक व तलाठी यांनी काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे टँकर कुठल्या गावात कितीवेळा जातात? किती खेपा होतात? याबाबतचा अहवाल तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना द्या. त्यांच्याकडून माझ्या कडे येईल. अधिकार्‍यांनी गावातील कुठल्याही राजकीय गटातटात अडकून न पडता पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या. जर कोणी पिण्याच्या पाण्यामध्ये राजकारण करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

जिथे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, त्या ठिकाणचा सर्वे करून त्या गावासाठी किंवा वाडीसाठी तत्काळ टँकर उपलब्ध करून देता येईल याची दक्षता घ्यावी. ज्या गावात कमी लोकसंख्या आहे, त्या गावात लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून मदत करण्याची भावना ठेवा. तुम्हाला आमचे कार्यकर्ते जर त्रास देत असेल तर त्यांची तक्रार माझ्याकडे करा. परंतु तुम्ही जर कामात हलगर्जीपणा केला तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, अशी तंबी आ. खताळ यांनी अधिकार्‍यांना दिली.

संगमनेर तालुक्यात पूर्ण दाबाने विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे महावितरणच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सरुनाथ उंबरकर, भाजप उपाध्यक्ष संदीप घुगे, भाजपचे रउफ शेख, महेश मांडेकर, गुलाब भोसले, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, रोहिदास गुंजाळ, अमोल दिघे, शरद गोर्डे, शंकर वाळे, गणेश सोनवणे, दिनेश फटांगरे, अण्णासाहेब ननावरे, नामदेव घुले यांनी यावेळी आ. खताळ यांच्या समोर महावितरण विभागाच्या अनेक तक्रारी केल्या. त्यानंतर लवकरात आपण महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची महावितरणच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल, असे आ. अमोल खताळ यांनी सांगितले.

गेली 40 वर्षापासून या तालुक्यातील जनतेला संघर्ष करावा लागला आहे. आता तालुक्यात परिवर्तन झाले आहे. त्यामुळे आपला संघर्ष कमी होईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकार्‍याने जनतेशी उद्धटपणे न वागता सौजन्याने वागा. जर काम होत नसेल तर वरिष्ठांना सांगून बदली करून घ्या. विशेषत: महावितरणच्या संदर्भातील तक्रारी घेऊन आलेल्या जनतेच्या तक्रारी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता हे शेतकर्‍यांशी व्यवस्थित बोलत नाही. त्यांनी जर आपल्या कामात सुधारणा केली नाही तर त्यांची थेट गडचिरोलीला बदली केली जाईल.
– आ. अमोल खताळ

निळवंडे कालव्यांना 20 एप्रिलपासून आवर्तन – ना. राधाकृष्ण विखे

0

लोणी |वार्ताहर| Loni

निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना रविवार दि. 20 एप्रिल 2025 पासून उन्हाळी हंगामातील आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकर्‍याला पाणी मिळण्याच्याद़ृष्टीने आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे धरणाच्या प्रकल्प अधिकार्‍यांकडून धरणातील पाणी साठ्याची सद्यस्थिती जाणून घेतली. या हंगामातील दुसरे आवर्तन सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची मागणी लाभक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. त्यानुसार धरणातील 2 टिएमसी पाण्याचे नियोजन या आवर्तनासाठी करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांनी सांगितले.

या आवर्तनाचा मोठा दिलासा लाभक्षेत्रातील शेतकरी तसेच ग्रामस्थांना मिळणार आहे. कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात येणारे चौथे आवर्तन असून यापूर्वी आवर्तनाचे पाणी शेवटच्या गावापर्यत मिळेल/ असे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते. यंदाच्या आवर्तनातही तसेच नियोजन करून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता अधिकार्‍यांनी घेण्याच्या सूचना ना. विखे पाटील यांनी दिल्या आहेत. या आवर्तनातून लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या दूर होणार असून पाणी पुरवठा योजनांसाठी शेती पिकांसाठी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाची मोठी मदत होईल.

अतिक्रमण काढल्याच्या रागातून महिला ग्रामसेवकासह कर्मचारी व पदाधिकार्‍यांना मारहाण

0

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेचा घेतलेला निर्णय विकोपाला जाऊन एका गटाने महिला ग्रामसेवकाला भरआठवडे बाजारात रक्तबंबाळ करत मारहाण केली. तसेच ग्रामपंचायतचे इतर कर्मचार्‍यांसह पदाधिकार्‍यांनाही मारहाण झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील ग्रामसेविका शकिला पठाण या मंगळवार दि. 15 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ग्रामपंचायतची शासकीय वसुली करत होत्या. त्यावेळी तेथे असलेले आरोपी म्हणाले, ‘तु आमचे गाळे पाडले काय? असे म्हणून त्यांनी ग्रामसेविका शकीला पठाण यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या दुकानावरही हल्ला करण्यात आल्याचे समजते.

यामध्ये ग्रामस्थांच्या चर्चेनुसार महिला ग्रामसेविका शकिला पठाण यासंह ग्रामपंचायत लिपीक तुषार विधाटे, कैलास केदार, विलास बुळे यांनाही मारहाण झाली. तसेच भाऊसाहेब यादव व प्रकाश यादव यांनाही एका गटाने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याचे समजते. महिला ग्रामसेविका पठाण या गंभीर जखमी असून त्यांच्यासह 5 जणांना अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामसेवक संघटनेसह पंचायत समिती अधिकारी, कर्मचार्‍यांनी मोर्चा काढत पोलिस व महसूल प्रशासनासमोर ठिय्या मांडत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज ढेरे व तालुका अध्यक्ष दादासाहेब भिंगारदे यांनी काल दि. 16 एप्रिलपासून जिल्हाभर ग्रामपंचायतीचे कामकाज बंद आंदोलन सुरू होणार असल्याचे सांगितले. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही. तोपर्यंत ग्रामसेवक कामकाज बंद ठेवणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी जाहीर केले आहे.

याप्रकरणी ग्रामसेविका शकीला पठाण यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात आरोपी सखाहरी बबन काकडे, अमोल सखाहरी काकडे, राहुल सखाहरी काकडे, अनिल सखाहरी काकडे, दत्तात्रय बबन काकडे, निर्मला सखाहरी काकडे, ज्योती दत्तात्रय काकडे, सौरभ सुनील मुसळे, सिताराम गंगाधर दुधाट, प्रशांत सिताराम दुधाट, अविनाश गागरे या अकरा जणांवर गु.र.नं. 415/2025 भारतीय न्याय संहिता कलम 132, 118 (1), 115 (2), 351 (2), 352, 324 (5), 189 (4), 191 (2), 333 प्रमाणे मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो. नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ग्रामसेविका शकिला पठाण यांच्यासह कर्मचारी व पदाधिकार्‍यांना मारहाण झालेल्या निषेधार्थ काल म्हैसगाव बंद ची हाक ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी दिली होती. त्यास गावातील व्यावसायिकांनी प्रतिसाद देऊन गाव दिवसभर स्वयंस्फुर्तीने बंद ठेवले.

Ahilyanagar : जलजीवनमध्ये रोहित पवार, नीलेश लंकेंशी ठेकेदारांचे लागेबांधे

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

‘जलजीवन मिशन’ मधील पाणी योजनांच्या कामांचे, सर्वेक्षणापासून ते ठेकेदार नियुक्तीपर्यंतची कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली आहेत. त्यांनी बसवलेल्या लोकांकडून कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे. कर्जत-जामखेडमधील ठेकेदाराचे आ.रोहित पवार व पारनेरमधील ठेकेदाराचे खा. नीलेश लंके यांच्याशी लागेबांधे आहेत, असा थेट आरोप भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे.

डॉ.विखे अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथील कार्यक्रमास उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार व लंके यांच्यावर आरोप केला. नगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधील पाणी योजनांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खा. लंके यांनी संसदेत केली होती. तसे निवेदन संबंधित मंत्र्यांना दिले होते. केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही कामांची चौकशीही केली. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे बोलत होते. डॉ. विखे म्हणाले, आरोप करणारे जर सायंकाळी ठेकेदाराला बोलून घेत असतील तर त्यातील वास्तविकता तपासली पाहिजे.

जलजीवन मिशनमधील सर्व कामांचे सर्वेक्षण, त्याच्या निविदा, ठेकेदार नियुक्ती अशी सर्व कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत. कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर सरकार बदलले. मात्र, त्यावेळी सरकारने बसवलेल्या लोकांकडूनच कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे, अशी टीकाही डॉ. सुजय विखे यांनी केली.

ठाकरे सेनेतून बाहेर पडण्यासाठी भांडण
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये वाद-विवाद सुरू आहेत. खैरे यांनी दानवे यांच्या विरोधात मातोश्रीवर तक्रार केली आहे. यासंदर्भात सुजय विखे म्हणाले, दोघांना ठाकरे यांच्या सेनेतून बाहेर पडून कुठेतरी जायचे असेल, म्हणून ते भांडण करत आहेत. ठाकरेंच्या सेनेतील नाराजी आता फॅशन झाली आहे. तक्रार करून उपयोग काय ? कारण मातोश्रीवर ऐकायला तरी कोण आहे ? आता मातोश्री, संजय राऊत यांच्या कार्यपध्दतीत एवढ्या वर्षानंतर बदल झालेला नाही. त्यामुळे मातोश्रीवर तक्रार करूनही काय होणार? त्यामुळे ज्यांना चांगल्या नेतृत्वाकडे जायचे असेल ते लोक प्रसारमाध्यमातून भांडण दाखवत आहेत आणि बाहेर पडणार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Crime News : गांजा विक्रीसाठी आलेले संगमनेरचे दोघे जेरबंद

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

संगमनेर येथून अहिल्यानगर शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पकडले. संदीप उर्फ संजय राजू मालुंजकर (वय 25) व सचिन प्रताप कतारी (वय 26, दोघे रा. संजय गांधी नगर, संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून एक लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा आठ किलो 535 ग्रॅमचा गांजा व पाच लाखांची कार असा सहा लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मंगळवारी (15 एप्रिल) रात्री 11 वाजता पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात ही कारवाई करण्यात आली. सोनानगर चौकातील विराम हॉटेल समोरील मोकळ्या जागेत एक राखाडी रंगाची होंडा कंपनीची चारचाकी (एमएच 01 एई 7213) वाहन उभे असून त्यात दोन इसम गांजा विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती निरीक्षक कोकरे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक अमोल भारती यांना माहिती दिली. त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या.

पोलीस, पंच, नायब तहसीलदार यांचे पथक सदर ठिकाणी पोहोचले असता, संशयित वाहन आढळून आली. त्या वाहनात संदीप उर्फ संजय राजू मालुंजकर व सचिन प्रताप कतारी हे इसम आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता डिक्कीमध्ये एक पांढर्‍या रंगाची गोणी आढळून आली, ज्यात आठ किलो 535 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा आढळला. याप्रकरणी संशयितांविरूध्द एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कलम 8 (क), 20 (ब), 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहेत.

अधीक्षक ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक भारती यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कोकरे, नायब तहसीलदार गणेश भानवसे, उपनिरीक्षक पाटील, अंमलदार योगेश चव्हाण, सुधीर खाडे, भानुदास खेडकर, सुनील चव्हाण, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, वसीम पठाण, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, सतीश भवर, सागर साबळे, सुजय हिवाळे, महेश पाखरे, बाबासाहेब भापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Crime News : शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनींचा कॉलेजमधील एका शिक्षकाने लैंगिक छळ केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पीडित विद्यार्थिनीने याप्रकरणी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून शिक्षक अमित खर्डे याच्याविरूध्द विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, कॉलेजमधील वर्कशॉप मॅनेजमेंटचे शिक्षक अमित खर्डे याने 10 एप्रिल रोजी सकाळी तिला व तिच्या इतर तीन वर्गमित्र-मैत्रिणींना वर्कशॉपमध्ये बोलावून घेतले. तिथे त्यांनी आयडीकार्ड वाटप केल्यानंतर पुन्हा फिर्यादीला फोन करून एकटीला वर्कशॉपमध्ये बोलावून घेतले आणि तिचा हात पकडून, तू नको टेन्शन घेऊ, मी तुला काही होऊ देणार नाही, असे म्हणत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी सायंकाळीही त्यांनी तिला कॉलेजच्या गोडावूनमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.

तिच्यानंतर तिची मैत्रीण हिनेही असाच अनुभव तिच्यासोबत घडल्याचे सांगितले. खर्डे याने तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची माहिती मैत्रिणीने दिली. या प्रकरणाची माहिती त्यांच्या घरी सांगितल्यानंतर विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी खर्डे याला ताब्यात घेत अटक केली आहे.

Karjat : नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात पुन्हा अविश्वास ठराव

0

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

राज्य सरकारने नवीन कायदा केल्यामुळे कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे बुधवारी (दि.16) 13 नगरसेवकांनी पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार आता पालिका सदस्यांनाच देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या (दि.15) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. यामध्ये एखाद्या नगराध्यक्षाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर दहा दिवसात सर्वसाधारण सभा बोलून मतदान घेण्याचे बंधनही जिल्हाधिकार्‍यांवर घालण्यात आले आहे.

राज्यातील सर्वच नगरपंचायती नगरपरिषदा यासाठी सन 2020 साली राज्य सरकारने अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी नवीन कायदा अमलात आणला होता. या कायद्यामध्ये संबंधित विभागाच्या मंत्र्यांना व सरकारला अधिकार प्राप्त होते. दरम्यान, कर्जत नगरपंचायतमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पक्षांची सत्ता होती. 17 पैकी तब्बल 15 सदस्य या दोन पक्षांचे होते आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे बारा सदस्य होते. यामुळे नगरपंचायतमध्ये रोहित पवार यांची तशी एकहाती सत्ता होती. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या भारतीय जनता पक्षाचे नगरपंचायतमध्ये अवघे दोन सदस्य आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेवकांमध्ये फूट पडली. पक्षाचे आठ काँग्रेस पक्षाचे तीन व भाजपचे दोन सदस्य असे एकूण 13 जणांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. मात्र, प्रस्ताव दाखल केल्यानंतर यामध्ये किमान तीन महिन्यांचा कालावधी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जाणार आहे हे लक्षात आल्यानंतर राज्यामध्ये महायुतीची असणारी सत्ता आणि वर्चस्व याचा पुरेपूर वापर करत कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये थेट कायद्यामध्येच बदल करण्यात आला.

एवढेच नव्हे तर मंगळवारीच राज्यपालांची देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर स्वाक्षरी देखील घेण्यात आली. अशा पद्धतीने अतिशय वेगाने या सर्व घडामोडी घडल्या आहेत. आणि यासाठी मोठी राजकीय शक्ती सरकारमध्ये असल्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. नवीन कायद्याने नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार सदस्यांना देण्यात आला आहे. नवीन कायद्यामुळे नगराध्यक्ष उषा राऊत यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी कमी कालावधीमध्ये आता प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, यामागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सक्रीय सहभाग असल्याची चर्चा आहे.

नवीन कायदा केल्यामुळे बुधवारी जिल्हाधिकार्‍यांकडे नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावेळी रोहिणी सचिन घुले, छाया सुनील शेलार, संतोष सोपान मेहेत्रे, ज्योती लालासाहेब शेळके, सतीश उद्धवराव पाटील, लंकाबाई देविदास खरात, भास्कर बाबासाहेब भैलूमे, भाऊसाहेब सुधाकर तोरडमल, ताराबाई सुरेश कुलथे, मोनाली ओंकार तोटे, मोहिनी दत्तात्रय पिसाळ, अश्विनी सोमनाथ गायकवाड व सुवर्णा रवींद्र सुपेकर या तेरा नगरसेवकांनी पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. आता या नवीन अविश्वास प्रस्तावावर पुढील निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी कोणत्या तारखेला बैठक बोलावणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुनी प्रक्रिया रद्द
यामुळे यापूर्वी जो अविश्वास प्रस्ताव हुशार राऊत यांच्यावर दाखल केला होता ती सर्व प्रक्रिया आता आपोआपच रद्द झाली आहे. त्यामुळे मागील अविश्वास प्रस्तावावर येत्या 22 तारखेला होणारी सुनावणीही रद्द झाली आहे. आता नवीन अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकारी कोणती तारीख देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

0

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

यावर्षीच्या मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून उद्योजक आणि पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार तर संगीत, नाटक, साहित्यासह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 एप्रिलला सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनिस यांना साहित्य क्षेत्राचा तर ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाला नाट्य श्रेत्रातील पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम या सामाजिक संस्थेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. अभिनेते सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रद्धा कपूर ,वायोलिनिस्ट एन.राजम गायिका रीवा राठोड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.दीनानाथ मंगेशकर जयंती म्हणजेच 24 एप्रिल रोजी पार्ल्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरानजीक असलेल्या ताहाराबाद रोडवरील सुकड नाल्याजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विरगाव येथील दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर पाठीमागील युवक जखमी झाला.

दुचाकी (क्र. एम. एच. 41 बी. ए. 2426) वरून यशवंत ऊर्फ नाना भरत ठाकूर (27) हा विरगावकडून सटाण्याच्या दिशेने येत असताना रात्री अज्ञात वाहनाने धडक दिली. यशवंत नाना ठाकूर यास डोक्यास व चेहर्‍यावर जोराचा मार लागल्यामुळे त्याला तत्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

वैद्यकीय तपासणी करत असताना डॉक्टरांनी ठाकूर यास मृत घोषित केले तर जोडीदार भरत सुमा निकम गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यास सटाणा ग्रामीण रुग्णालयातून मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती सटाणा येथील गौरव प्रकाश चव्हाण यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती कळताच विरगावावर शोककळा पसरली आहे.