मुंबई । Mumbai
भारतीय क्रिकेटचा उगवता स्टार फलंदाज अभिषेक शर्मा सध्या आपल्या जबरदस्त फॉर्ममुळे चर्चेत आहे. आशिया कपमध्ये त्याने पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजांची धुलाई करत जगभरात नाव कमावले. मात्र, आता पाकिस्तानच्या एका युवा आणि तुलनेने अनोळखी वेगवान गोलंदाजाने अभिषेक शर्माला खुल्लमखुल्ला आव्हान दिले आहे. या गोलंदाजाचा दावा आहे की, तो अभिषेकला केवळ तीन ते सहा चेंडूत बाद करू शकतो.
पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज इहसानुल्लाह सध्या त्याच्या या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. एका व्हिडिओमध्ये त्याने म्हटले, “जर मला भारतविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली, तर मी अभिषेक शर्माला जास्तीत जास्त ३ ते ६ चेंडूत बाद करीन.” आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझा १४० किमी प्रतितास वेगाचा चेंडू त्याला १६० किमी वेगाचा वाटेल. त्याला माझ्या इनस्विंगरचा (Inswinger) अंदाजही येणार नाही.” तो पुढे म्हणाला, “मी डाव्या हाताच्या (Left-hander) फलंदाजांना बाउंसर आणि इनस्विंगरने गोंधळवतो. माझ्या बाउंसरचा तोड नाही.”
अभिषेक शर्मा सध्या जगातील सर्वोत्तम टी-२० फलंदाजांपैकी एक मानला जातो. नुकत्याच झालेल्या आशिया कप २०२५ मध्ये त्याने पाकिस्तानच्या शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ आणि अबरार अहमद या स्टार गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला होता. या शानदार खेळीनंतरच अभिषेकचे नाव जागतिक स्तरावर गाजले. त्यामुळे इहसानुल्लाहचा हा ‘३-६ चेंडूत OUT’ चा दावा ऐकून भारतीय क्रिकेट चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्याच्या आत्मविश्वासाला टोला लगावला आहे, तर काहींनी हे धाडस कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. चाहते त्याला “पहिले टीममध्ये तर जागा मिळव!” असा सल्ला देत आहेत.
इहसानुल्लाहने पाकिस्तानसाठी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना मार्च २०२३ मध्ये खेळला होता. ऑक्टोबर २००२ मध्ये स्वात येथे जन्मलेल्या या खेळाडूने वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ४ टी-२० सामन्यांत ६ बळी घेतले आहेत, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला अद्याप यश मिळालेले नाही.
तो एप्रिल २०२३ नंतर दुखापतीमुळे राष्ट्रीय संघातून बाहेर आहे आणि सध्या तो घरगुती क्रिकेटमध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत असतानाही त्याने थेट अभिषेक शर्माला आव्हान दिल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही खेळाडू आमनेसामने आल्यास काय होईल, याबद्दल आता उत्सुकता वाढली आहे.




