मुंबई । Mumbai
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि प्रसिद्ध गायक पलाश मुच्छल यांच्यातील विवाह रद्द झाल्याच्या चर्चेनंतर आता या प्रकरणात एक मोठे कायदेशीर वळण आले आहे. पलाश मुच्छलने आपली फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या सांगली येथील निर्माते विद्यान माने यांच्याविरोधात कायदेशीर पाऊल उचलले आहे. पलाशने माने यांना १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली असून, यामुळे मनोरंजन आणि क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी सांगलीचे निर्माते विद्यान माने यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार केली होती. पलाश मुच्छलने आपली ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा त्यांनी या तक्रारीत केला होता. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणताही एफआयआर (गुन्हा) दाखल झालेला नाही. या आरोपांमुळे आपली सामाजिक प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहून पलाशने आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
पलाशने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती शेअर केली आहे. त्याने म्हटले आहे की, माने यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि असत्य आहेत. आपली प्रतिमा आणि चारित्र्य खराब करण्याच्या हेतूनेच हे आरोप जाणीवपूर्वक करण्यात आले आहेत. पलाशचे वकील श्रेयांश मिठारे यांच्यामार्फत ही १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे. “माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असून केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने हे केले गेले आहे. मी कायद्यावर विश्वास ठेवतो आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी वकिलांशी सल्लामसलत केली आहे,” असे पलाशने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.
पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. भारतीय महिला संघाने २ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर या जोडीचे लग्न होणार होते. लग्नाचे विधी, हळद आणि मेहंदी समारंभही पार पडले होते. मात्र, लग्नाच्या दिवशीच अचानक विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली.
सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीचे कारण देण्यात आले होते, परंतु नंतर या दोघांनीही सोशल मीडियावरून लग्न रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे त्यांचे चाहते मोठ्या धक्क्यात होते. लग्न रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता पलाशवर झालेल्या फसवणुकीच्या आरोपांनी या प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे.
पलाशने पाठवलेल्या या १० कोटींच्या नोटीसनंतर निर्माते विद्यान माने आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगली पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असला तरी, अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई झालेली नाही. दुसरीकडे, पलाश मुच्छलने थेट मानहानीचा खटला दाखल केल्याने हे प्रकरण आता न्यायालयात गाजण्याची चिन्हे आहेत. एका प्रसिद्ध गायकावर झालेले आर्थिक फसवणुकीचे आरोप आणि त्या बदल्यात त्याने मागितलेली १० कोटींची नुकसानभरपाई, यामुळे हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.




