बीड । Beed
बीडच्या शिरूर तालुक्यात घाटशील पारगाव येथे गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती.
या अध्यात्मिक मंचावर बोलताना पंकजा मुंडे यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. “मुंडे साहेबांचं नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही, पण ते नाव कधीही लहान होऊ देणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. “जीवनात कोणालाही दुखवू नये, एवढीच प्रार्थना मी वामनभाऊं कडे बाबांकडे करते,” असेही त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी गडाच्या विकासातील आपल्या योगदानाचा उल्लेख करत सांगितलं की, “मी सत्तेत नसतानाही पाच वर्षे गडासाठी काम करत राहिले. पालकमंत्री असताना भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. २००६ मध्ये साहेब गडावर येऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी मला पाठवले. तेव्हापासून मी इथे येत राहिले आहे.” नारळी सप्ताहाच्या परंपरेचा गौरव करत त्यांनी सांगितलं की, भाऊंनी वैभव आणि संपत्ती सोडून ईश्वरमार्ग स्वीकारला. ज्याच्या कर्मात वैभव असतं, तोच जीवनात पुढे जातो.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत सांगताना भावना व्यक्त केल्या. “मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केल्यामुळे आमचं खास नातं तयार झालं. गडाचा विकास म्हणजे केवळ जागेचा विकास नाही, तर इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा विकास झाला पाहिजे,” असं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले, “संत वामनभाऊंनी समाजाला दिशा दिली आहे. इथे जात, धर्म, पंथ काही विचारले जात नाही. मुस्लिम बांधवही या परंपरेत सहभागी होतात. ही समाज जोडणारी परंपरा आहे.”