Friday, November 15, 2024
Homeराजकीयघसा ताणून ‘औटी यांना विजयी करा’ सांगणारे राष्ट्रवादीत कसे ?

घसा ताणून ‘औटी यांना विजयी करा’ सांगणारे राष्ट्रवादीत कसे ?

पारनेर|ता. प्रतिनिधी|Parner

‘त्या’ पाच नगरसेवकांनी स्वतःचा स्वार्थ पुढे ठेवून आजी-माजी आमदारांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर पक्षाच्या वरिष्ठांना देखील त्यांनी अंधारात ठेवले आहे. या पाच नगरसेवकांच्या पक्षांतर नाट्यामुळे राज्य पातळीवर पारनेर शहराचे नाव खराब झाले आहे. माजी आमदार औटी यांना विजयी करा, असे घसा ताणून सांगणारे राष्ट्रवादीत कसे? आमदाराकीत पराभव झाल्यानंतर या नगरसेवकांना औटी वाईट कसे झाले? असा सवाल पत्रकार परिषदेत माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व अर्जुन भालेकर यांनी केला आहे.

- Advertisement -

शिवसेनेतून राष्ट्रवादीत व त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या टोळीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आ. निलेश लंके यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष चेडे व भालेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी विकासाचा विचार का केला नाही? सत्तांतर झाल्यानंतरच विकास का डोक्यात घुसला? विधानसभा निवडणुकीत नेतृत्व पराभूत झाल्यानंतर यांना विकास कळाला का? नगरपंचायतीच्या मासिक सभांमध्ये पाच पैकी किती नगरसेवकांनी पाणी योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले? किती प्रस्ताव सादर केले? कोणास निवेदन दिले? ‘त्या‘ नगरसेवकांनी स्वतःच सभांचे इतिवृत्त जनतेसमोर मांडावे, असे आवाहन चेडे व भालेकर यांनी केले.

अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी देण्यात आलेला उमेदवार योग्य नव्हता. त्यामुळेच आम्ही शिवसेनेपासून फारकत घेतली व सत्तांतर झाले. दोघेही भाऊ प्रामाणिक नाहीत, योग्य नाहीत हे त्यांनी सध्या घेतलेल्या भूमिकेवरून सिद्ध झाले आहे. आज या नगरसेवकांना विकास दिसू लागला आहे, तर आतापर्यंत त्यांच्या प्रभागात त्यांनी किती विकास केला हे देखील जनतेपुढे आले पाहिजे.

सत्तांतरानंतर विविध प्रकारचे रस्ते, भाजी मार्केट, मटण मार्केट, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, दीड कोटी रुपये खर्चाचे पथदिवे, 760 घरकुले आदी कामे आम्ही मार्गी लावली. त्यात या नगरसेवकांचे योगदान काय? नगरपंचायतीचा निधी, उद्घाटने मात्र भलत्यांनीच केली. ज्यांनी उद्घाटने केली त्यांच्यावर आमचा अजिबात आक्षेप नाही परंतु हे नगरसेवक नेतेमंडळींची दिशाभूल करीत आहेत. त्या माध्यमातून आपले घर कसे भरले जाईल याचीच चिंता कर्तृत्व नसणार्‍या या लोकांना नेहमीच असते. स्वतःच्या प्रभागात नगरसेवक देशमुखांनी किती विकास केला?

पाणी योजनेसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या वल्गना करणार्‍या नगरसेवक संदीप देशमुख यांनी स्वतःच्या प्रभागात किती विकास केला? असा सवाल चेडे व भालेकर यांनी केला. जे नगरपंचायतीच्या बैठकांना कधी वेळेवर उपस्थित राहिले नाहीत, एखाद्या विकास कामाचा पाठपुरावा करण्याचे धाडस ज्यांनी दाखविले नाही, पाणी योजना सोडा, स्वतःच्या प्रभागातील विकासकामांसाठी त्यांनी काय योगदान दिले हे एकदा जनतेसमोर येऊच द्या.

स्वत:च्या हिमतीवर निवडणून येण्याची कुवत नसल्यामुळे प्रत्येक वेळी कोलांटउड्या मारून स्वतः कर्तृत्ववान असल्याचे ते करीत असलेले ढोंग जनतेने ओळखले आहे. या निवडणुकीत त्यांना कपाळमोक्ष होईल, अशी टीकाही त्यांनी केली.

विधानसभा निवडणुकीत विजय औटी पराभूत झाले आणि कर्तृत्वशून्य नागरसेवकाना ते लगेच वाईट कसे वाटू लागले? विधानसभा निवडणुकीत कुटुंबासह प्रचार करणारे, औटी हेच मतदारसंघाचे भाग्यविधाते आहेत, असे घसा ताणून सांगणारे औटी पराभूत होताच राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले.

याचाच अर्थ स्वतः च्या हिमतीवर निवडून येण्याची त्यांच्यात कुवत नाही. केवळ स्वतः च्या स्वार्थासाठी ते तत्कालीन नेत्यांची खुषमस्करी करतात हे त्यांच्या कृतीतून सिद्ध झाले आहे. आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचा सक्षम पर्याय देण्यासाठी शहरातील जनतेशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या