Friday, May 3, 2024
Homeनगरतहसील कार्यालयाजवळील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास

तहसील कार्यालयाजवळील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास

पारनेर (तालुका प्रतिनिधी) –

पारनेर शहरातील तहसील कार्यालयाजवळील बेकायदेशिर अतिक्रमणांवर तहसीलदार ज्योती देवरे यांनी मंगळवारी (दि. 29) रात्री 9 वाजल्यापासून

- Advertisement -

धडक कारवाई करीत जवळपास 25 ते 30 अतिक्रमणे जमिनदोस्त केली. यावेळी काही व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही सर्व अतिक्रमणे तहसील कार्यालयाच्या हद्दीतील जागेत होती.

मंगळवारी ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील नागरिक आल्याने खूप गर्दी झाली होती. दुपारनंतर तहसील कार्यालय परिसरात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्याच्या कडेलाच अतिक्रमणे झालेली असल्यामुळे रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जात होती. या अभूतपूर्व गर्दीमुळे वाहतूक ठप्प झाली होती. यापुर्वीही तहसीलदार देवरे यांनी तहसील परिसरातील अतिक्रमणधारक व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस दिली होती.

संध्याकाळी सर्व अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन केल्यानंतर रात्री नऊ वाजल्यापासून मोहीम सुरू केली. यामध्ये झेरॉक्स दुकान, पानटपरी, हॉटेल, फळ विक्रेते, कॉम्प्युटर व्यावसायिकांची अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये काही व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र तहसील कचेरीवर अतिक्रमण सपाटीकरण सुरू झाल्याने पारनेर बसस्थानक परिसरातील सर्वच अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी नुकसान होण्यापेक्षा स्वतःच रात्री दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली. तसेच काहींनी आपल्या टपर्‍या व अतिक्रमण स्वतःहून काढण्यास सुरूवात केली होती. रात्री 12 वाजता तहसीलदार ज्योती देवरे पोलीस फौजफाट्यासह बस स्टॅण्ड चौकात आल्यानंतर तेथील व्यावसायिकांना त्यांनी बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अतिक्रमणे काढून घेण्यास वेळ दिल्याने येथील होणारे नुकसान टळले.

एकंदरीत तहसीलदार ज्योती देवरे यांच्या या कारवाईने पारनेर शहरात खळबळ उडाली. मंगळवारी रात्री पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सुपा बाजार पेठेतील अतिक्रमणामुळे नागरिकांचे हाल

सुपा (वार्ताहर)- पारनेर आगाराची बस बुधवारी दुपारी भर बाजारात बंद पडल्याने बाजारकरू व जाणार्‍या येणार्‍यांचे हाल झाले. बुधवारी (दि. 30) दुपारी बस सुपा बाजारतळावरील मुख्य चौकात गर्दीच्या ठिकाणी बंद पडली. नेमका सुप्याचा आठवडे बाजार होता. त्यामुळे सुपा-पारनेर रोडवर अगोदरच मोठी गर्दी असते त्यात बस बंद पडल्याने वाहतूक खोळंबली. गाडीतील प्रवाशीही अडकले. दुपदरी रोड आहे; परंतु अतिक्रमणाने रस्ता एक पदरीच राहिला आहे. रोडच्या दोन्ही बाजुने दुकाने असतात. त्यामुळे रस्ता गर्दी व विक्रेते यांच्यात हरवून जातो. गाड्यांचे चालक-वाहक रस्त्यावर थांबून वाहनाचे नियोजन करत होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होतो. जर सार्वजनिक बाधकाम विभागाने रस्त्यावर अतिक्रमणे होऊ दिली नाही तर रस्ते अंरुद होणारच नाहीत. तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यानी तहसील कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. तशीच मोहीम तालुकाभर विशेषतः सुपा शहरात राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या