अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भागीदारीमध्ये सुरू केलेल्या कंपनीचे सर्व अधिकार स्वत: कडे घेऊन चुलत भावानेच सराफ व्यावसायिकाची 59 लाख 32 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सचिन भास्कर दिक्षित (वय 44 रा. आयोध्यानगर, लिंक रस्ता, केडगाव) असे फसवणूक झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सोमवारी (22 जुलै) सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून बाप – लेकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक दत्तात्रय दिक्षित व दत्तात्रय गोविंद दिक्षित (पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या बाप – लेकाची नावे आहेत. मे 2022 मध्ये सचिन यांचा चुलतभाऊ विवेक त्यांच्याकडे आला व त्यांना म्हणाला, ‘आपण यापूर्वी ज्या प्रकारे अॅप बनविण्याचा व्यवसाय केला होता त्याप्रमाणे आपण आणखी एक व्यवसाय करू’ असे म्हणाल्याने त्यासाठी किती पैसे लागणार अशी विचारणा सचिन यांनी त्याच्याकडे केली.
त्याने एक कोटी 50 लाख रुपये लागणार आहेत, असे सांगितले. दरम्यान, सदर व्यावसायातून चांगले उत्पन्न भेटेल असे विवेकने सांगितल्याने आपपसामध्ये झालेल्या विचाराने सचिन यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला व कंपनी टाकण्यासाठी वेळोवेळी 49 लाख रुपये त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून डीवाईन युक्नीकॉन टेक्नॉलॉजी प्रो.ली. या कंपनीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केडगाव शाखेतील खात्यात पाठविले. त्यानंतर सदर कंपनीच्या ऑफिस व फर्नीचरसाठी चार लाख 65 हजार व पाच लाख 67 हजार 500 रुपये दिले. कंपनी सुरू झाल्यानंतर 100 टक्के शेअर्स मधील सचिन यांना 49 टक्के, विवेक यांना 21 टक्के व त्याचे वडिल दत्तात्रय यांना 30 टक्के शेअर्स घेतले व कंपनीत माय केअर अॅप नावाने व्यवसाय चालू केला.
दरम्यान, मार्च 2024 मध्ये सचिन यांनी विवेक व दत्तात्रय यांच्याकडे वेळोवेळी पैशांचा हिशोब मागितला असता त्यांनी हिशोब दिला नाही उलट उडवाउडवीची उत्तरे दिली. सचिन यांनी सदर कंपनीची शहानिशा केली असता कंपनी चालू करताना विवेक याने कंपनीचे सर्व अधिकार स्वत: कडे घेऊन त्याने सदर कंपनीचा सिक्युर कोड हा स्वत:चे नावे घेतल्याचे व सचिन यांना कंपनीमध्ये नावाला 49 टक्के भागीदार केल्याचे लक्षात आले. तसेच सचिन यांचा फ्लॅट ऑफिससाठी वापरला असून त्याचे भाडे पण दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार गिरीषकुमार केदार अधिक तपास करत आहेत.