नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे परवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. केजरीवाल १८४४ मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे जायंट किलर म्हणून परवेश वर्मा यांच्याकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीत ‘आप’ला २३ जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला ४७ जागा मिळताना दिसत आहेत. अर्थात भाजप दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे. केजरीवाल यांचा पराभव करणारे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी नाव आघाडीवर असणारे परवेश वर्मा कोण आहेत? जाणून घेऊया..
कोण आहे परवेश वर्मा
परवेश वर्मा यांचा ७ नोव्हेंबर १९७७ ला त्यांचा जन्म झाला. वर्मा यांनी एमबीए केले आहे. परवेश वर्मा यांना २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, परंतु पक्षाने त्यांना तिकीट नाकारले होते, पक्षाच्या नेत्यांकडून त्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन मिळाले होते. त्याऐवजी जनकपुरीचे आमदार जगदीश मुखी यांनी पश्चिम दिल्लीत निवडणूक लढवली. द्वारका येथे २२ मार्च २००९ रोजी आयोजित महापंचायतमध्ये परवेश यांना तिकीट नाकारण्याच्या भाजपच्या निर्णयाचा निषेध केला होता. परवेश वर्मा यांची पत्नी स्वाती सिंग या माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशातील भाजप नेते विक्रम वर्मा यांची मुलगी आहे. त्यांना २ मुली आणि एक मुलगा अशी ३ अपत्ये आहेत.
२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष योगेंद्र शास्त्री यांचा त्यांनी पराभव केला होता. मे २०१४ मध्ये ते १६ व्या लोकसभेवर निवडून आले होते. १ सप्टेंबर २०१४ पासून ते नगरविकास स्थायी समितीचे सदस्य आहेत. १ सप्टेंबर २०१४ पासून ते संसद सदस्यांच्या वेतन आणि भत्त्यांवरील संयुक्त समिती आणि शहरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २०१९ मध्ये दिल्लीच्या इतिहासत सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे खासदार म्हणून परवेश यांनी विजय मिळवला होता. त्यांना ५ लाख ७८ हजार ४८६ इतके मोठे मताधिक्य मिळाले होते.
परवेश वर्मा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. याशिवाय, परवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दिल्ली आणि हरियाणातील जाट मतदारांना आकर्षित करणे भाजपाला सोपे जाईल. प्रवेश वर्मा यांचे वडील साहिब सिंग वर्मा हे देखील दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत. परवेश वर्मा म्हणाले की, दिल्लीतील जाट नेते, बंधू आणि भगिनी भाजपसोबत आहेत. दिल्लीचा विकास फक्त भाजपच करू शकते. जाट आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी राज्य सरकारला सभागृहातून कायदा करून केंद्राकडे पाठवावा लागेल, जे त्यांनी कधीही केले नाही. अरविंद केजरीवाल सतत खोटे बोलत आहेत, असा आरोप परवेश वर्मा यांनी केला आहे.
गृहमंत्री अमित शाह यांची घेतली भेट
प्रवेश वर्मा यांनी शनिवारी निवडणूक जिंकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. येथे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात चर्चा झाली, असे मानले जात आहे. तत्पूर्वी, निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रवेश वर्मा असणार का? असा सवालही विचारला होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा