भारतीय लोकशाहीच्या पटलावर नुकत्याच उमटलेल्या निवडणूक निकालांच्या लकीरी केवळ सत्तांतराच्या कथा सांगणार्या नाहीत, तर त्या देशाच्या राजकीय ध्रुवीकरणाची नवी आणि स्पष्ट दिशा अधोरेखित करणार्या आहेत. पाच राज्यांच्या या रणसंग्रामाने प्रस्थापितांना धक्के दिले आहेत, नव्या उदयाला साद घातली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या साडेचार दशकांपासून भारतीय राजकारणाच्या एका कोपर्यात डौलणारा लाल बावटा आता सत्तेच्या नकाशावरून पूर्णपणे पुसला गेला आहे. हा बदल केवळ भौगोलिक नसून भारतीय मतदारांच्या वैचारिक परिवर्तनाचा एक मोठा संकेत आहे.
पश्चिम बंगालमधील भाजपचा विजय हा भारतीय राजकारणातील २१ व्या शतकातील सर्वात मोठा राजकीय भूकंप म्हणावा लागेल. तृणमूल काँग्रेसची दीड दशकांची अभेद्य सद्दी आणि ममता बॅनर्जींसारख्या झुंजार, आक्रमक नेतृत्वाला धूळ चारत भाजपने मिळवलेले द्विशतकी यश हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. भाजपने येथे केवळ निवडणूक लढवली नाही, तर ममता कार्डला संघटनात्मक कार्डने चोख उत्तर दिले. ममतांची वैयक्तिक प्रतिमा आणि त्यांची लोकप्रियता कितीही मोठी असली, तरी अखेर लोकशाहीत विजयासाठी बूथ लेव्हलची शिस्तबद्ध संघटना आणि पन्ना प्रमुखांचे जाळे महत्त्वाचे असते, हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले.
या विजयाचे पडसाद केवळ कोलकात्यातच नव्हे, तर दिल्लीतील संसदेतही तीव्रतेने उमटणार आहेत. बंगालच्या विजयामुळे राज्यसभेत भाजपचे पारडे जड होणार असून, प्रलंबित असलेली आणि राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली विधेयके मंजूर करण्याचा मार्ग आता निष्कंटक झाला आहे. ८० जागांच्या उत्तर प्रदेश आणि ४८ जागांच्या महाराष्ट्रानंतर ४२ लोकसभा जागांचे बंगाल आता भाजपच्या राजकीय प्रभावाखाली आल्याने राष्ट्रीय राजकारणाचे केंद्र आता खर्या अर्थाने पूर्वेकडे सरकले आहे.सुमारे ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच केंद्र आणि बंगालमध्ये एकाच विचारधारेचे सरकार सत्तेत आले आहे.
केंद्र आणि राज्यामधील प्रदीर्घ काळ चाललेला संघर्षाचा अध्याय आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. पश्चिम बंगालची अर्थव्यवस्था आणि औद्योगिक विकासाची चाके गेल्या काही दशकांत मंदावली होती. केंद्राच्या अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी बंगालमध्ये राजकीय मतभेदांमुळे रखडली होती. आता डबल इंजिन सरकारमुळे धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीतील अडथळे दूर होतील. केंद्राकडून मिळणारा निधी आणि राज्याचे सहकार्य यांचा समन्वय झाल्यास बंगालच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळू शकते, हाच विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.
दक्षिण भारताने पुन्हा एकदा आपले राजकीय वेगळेपण आणि स्वाभिमान सिद्ध केला आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन द्रविडी किल्ल्यांना जनमताने जोरदार तडाखे दिले आहेत. अभिनेता विजय याने अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाने मिळवलेले यश हे राजकीय विश्लेषकांना थक्क करणारे आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास, एम.जी. रामचंद्रन यांच्यानंतर पहिल्याच निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकणारा विजय हा तामिळनाडूच्या इतिहासातील दुसरा अभिनेता ठरला आहे.
दक्षिणेत भाजपला अद्यापही स्वतःची स्वतंत्र जागा बनवण्यात यश आले नसले, तरी प्रस्थापित प्रादेशिक घराणेशाहीला मतदारांनी नाकारणे हे नव्या आणि तरुण पर्यायांच्या उदयाचे स्पष्ट लक्षण आहे.केरळमधील निकाल हे या निवडणुकीतील सर्वात मोठे टर्निंग पॉईंट आहेत. १९७७ पासून देशातील कोणत्या ना कोणत्या राज्यात सत्तेवर राहणार्या डाव्या पक्षांचा प्रवास आता शून्यावर येऊन थांबला आहे. २०११ मध्ये बंगालमधील ३४ वर्षांची सत्ता गमावल्यानंतर आणि २०१८ मध्ये त्रिपुरातील बालेकिल्ला कोसळल्यानंतर केरळ हा डाव्यांचा शेवटचा श्वास होता, तोही आता थांबला आहे. ४९ वर्षांत प्रथमच भारत डावे मुक्त झाला आहे. डाव्या विचारधारेला आता आपल्या जुन्यापुराण्या धोरणांचा आणि जनमानसाशी तुटलेल्या संपर्काचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
केरळमधील डाव्यांचे सत्तांतर काँग्रेससाठी मोठा ऑक्सिजन ठरला असला, तरी राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या वाढत्या प्रभावापुढे काँग्रेसलाही आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागणार आहे.आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये सत्ता कायम राखत भाजपने आपल्या हिंदी पट्ट्यातील वर्चस्वाला आता ईशान्य आणि किनारपट्टीच्या भागातही यशस्वीपणे विस्तारले आहे. हे निकाल म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही; हे निकाल म्हणजे बदलत्या भारताची नवी राजकीय भूक आहे. जिथे जनतेला संघर्षापेक्षा समन्वय हवा आहे, आश्वासनांपेक्षा अंमलबजावणी हवी आहे आणि प्रस्थापित घराण्यांपेक्षा पारदर्शक पर्याय हवा आहे. बंगालमधील ऐतिहासिक विजयाने भाजपची प्रतिमा अधिक अजेय बनवली आहे, तर डाव्यांच्या अस्ताने एका जुन्या वैचारिक युगाचा कायदेशीर अंत झाला आहे. आता प्रतीक्षा आहे ती या नव्या डबल इंजिन सरकारांच्या वेगाची आणि भारताच्या या बदललेल्या राजकीय नकाशावर होणार्या विकासाच्या परिणामांची!





