अहिल्यानगर । प्रतिनिधी
दरपाच वर्षांनंतर होणारी पशुगणना चालूवर्षी होत असून आचारसंहितेनंतर पशुगणनेचे कामकाज पशुसंवर्धन विभागाकडून सुरू होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात 2019 च्या पशुगणनेनुसार 46 लाख पशुधनाची नोंदणी आहे. त्यात आता किती वाढ होते, हे गणना झाल्यानंतरच समोर येणार आहे.
दरम्यान, 24 ऑक्टोबरला उद्घाटन झालेली पशूगणना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे थांबवण्यात आली आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पशूगणना होणार आहे.
दरम्यान, आधी अॅपमध्ये राहिलेल्या त्रुटीमुळे पशूगणला जाहीर झाल्यानंतर सुरू होवू शकली नाही. त्यानंतर देशापातळीवरून पूशसंवर्धन विभागाने उद्घाटन केल्यांनतर आता आचारसंहितेमुळे पशूगणना थांबवण्यात आली आहे. देशात 1919-20 पासून पशुगणनेस सुरुवात झाली. तेव्हापासून दर 5 वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे.
2019 मध्ये 20 वी पशुगणना झाली होती. यानुसार राज्यामध्ये एकूण 3 कोटी 30 लाख 80 हजार इतके पशुधन होते. देशात 21 व्या पशुगणनेला सप्टेंबरमध्येच प्रारंभ झाला असून 31 डिसेंबर 2024 पर्यंत ही गणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. देशभर एकाच वेळी पशुगणना सुरू होते. मात्र महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता सुरू असल्याने कर्मचारी त्यात व्यस्त आहेत.
परिणामी आचारसंहितेनंतर पशुगणनेची कार्यवाही होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात 346 प्रगणक व 93 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पशुगणना प्रथमच ऑनलाइन अर्थात पद्वारे करण्यात येणार आहे. पशुगणनेमुळे पशुधनाची संख्या निर्धारित होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येईल. तसेच योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
यात नागरी व ग्रामीण भागात आढळणार्या एकूण 16 पशुधन जाती व कुक्कुटादी पक्षी यांची प्रजातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. याचा फायदा शेतकर्यांना होणार आहे. जिल्हा पशुगणना अधिकार्यांना पशुगणनेसाठी विकसित मोबाइल अॅप, वेब आधारित आणि डॅशबोर्ड निरीक्षण याविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या पशुधनाची होणार गणना
पशुधनामध्ये गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, वराह, गाढवे, घोडे, खेचरे व उंट यांची गणना केली जाणार आहे. तर कुक्कुट व कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये कोंबड्या, बदके, शहामृग, इमू, हंस तसेच तसेच पाळीव कुत्रे, हत्ती व ससे आणि भटक्या गायी व कुत्रे यांची देखील स्वतंत्र गणना करण्यात येणार आहे.
अशी होणार पशुगणना
ग्रामीण भागात 3 हजार व शहरी भागात 4 हजार कुटुंबांमागे एक प्रगणक नेमला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात 290 व शहरी भागात 56 प्रगणक, तर 93 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रगणक मोबाइल पवर घरोघरी जाऊन पशुगणना करणार आहेत.