पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्तरित्या पोलिस कारवाईत माळी बाभुळगाव फाट्याजवळून स्कॉर्पिओ गाडीतून विक्रीसाठी नेण्यात येत असलेला 11 किलो 820 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सतिष डोळस, राकेश वाळुंज, आकाश जंगम व सतिष बिडलांग या चौघांना अटक करण्यात आली असून सुरज छाजेड (रा. बालमटाकळी, शेवगाव) हा आरोपी फरार झाला आहे.
जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 13 लाख 70 हजार 500 रुपये इतकी आहे. 24 सप्टेंबर रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, मावळ तालुक्यातील तरुण शेवगावमार्गे गांजा घेऊन जाणार आहेत. ही माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना देण्यात आली. त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना पुढील कारवाईसाठी आदेश दिले.
पथकाने माळी बाभुळगाव फाट्यावर काळी स्कॉर्पिओ (एमएच 12 जी. झेड 1854) अडवली. यावेळी गाडीत दोन प्लास्टिकच्या पिशव्यात एकूण 11 किलो 820 ग्रॅम गांजा सापडला. त्याची 2 लाख 75 हजार 500 रुपयांचा आहे. मोबाईल फोन 45 हजार,महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी 10 लाख असा 13 लाख 70 हजार जप्त मुद्देमाल जप्त केला आहे.




