अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्यात राज्य आणि केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात येणार्या महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेत गेल्या तीन वर्षात 84 हजार 374 रुग्णांवर 400 कोटी रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या योजनेत नगरसाठी बड्या जिल्ह्यातील अवघ्या 41 हॉस्पिटलची निवड करण्यात आलेली असून ही संख्या अपूरी असल्याची नागरिकांची ओरड आहे.
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य संस्थेसह खागसी ठिकाणी मोफत उपचार मिळावेत, यासाठी योजनेत निवड करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयात राज्य सरकारच्यावतीने ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्यावतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवण्यात येत आहे. यातील राज्य सरकारची फुले जनआरोग्य योजनाही 2013 पासून तर आयुष्यमान भारत योजनाही 2018 पासून जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यात 28 जुलै 2023 पासून राज्य सरकारने राज्यातील सर्व कुटूंबासाठी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार 1 जुलै 2024 पासून ही आरोग्य योजना विस्तारित व्याप्तीसह आयुष्यमानसह एकात्मिकपणे राबवण्यात येत आहे. या योजनेत प्रत्येक नागरिकाला पाच लाखांपर्यंत विमा कवच प्रदान करण्यात आलेले असून यात सर्व प्रकारांच्या आजारांवर मोफत उपचार करण्यात येत असल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात येत आहे.
मात्र, या दोन योजनेत नगरच्या विस्ताराने मोठ्या असणार्या जिल्ह्यातील केवळ 41 रुग्णालयाचा समावेश आहे. यासह जिल्हा रुग्णालय अशा प्रकारे सरकारच्यावतीने जिल्ह्यात केवळ 42 रुग्णालयात मोफत उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आयुष्यान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत 13 लाख 82 हजार 672 लाभार्थी, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेत 17 लाख 82 हजार 453, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (पांढरे रेशनकार्ड) 12 लाख 2 हजार 339 लाभार्थी असे एकत्रित लाभार्थी 43 लाख 67 हजार 464 मोफत उपचारांसाठी पात्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोग्य योजनेत 2021-22 मध्ये 28 हजार 869 रुग्णांवर 124 कोटी 7 लाख 65 हजार 868 रुपयांचा, 2022-23 मध्ये 25 हजार 544 रुग्णांवर 125 कोटी 5 लाख 26 हजार 888 रुपयांचा तर 2023-24 मध्ये 29 हजार 961 रुग्णांवर 148 कोटी 44 लाख 97 हजार 795 रुपयांचा अशा प्रकारे 84 हजार 374 रुग्णांवर सुमारे 400 कोटी रुपयांचा मोफत उपचार करण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे फलक
नगर शहरासह जिल्ह्यात आयुष्यमान भारत आणि फुले जनआरोग्य योजनेत पात्र असणार्या खासगी रुग्णालयात मोफत उपचार करण्यासाठी ठरवून दिलेल्या खाटा (कॉट) आधीच भरलेल्या आहेत. यामुळे याठिकाणी मोफत उपचार होणार नाहीत, असे फलक लावण्यात आले असल्याचे पाहण्यात आलेले आहेत. यामुळे सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत रुग्णालयाची संख्या वाढणे गरजेचे बनले आहे.
राज्य सरकारकडून मोफत उपचारांचा मोठा गाजावाजा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळतांना अनेक अडचणी येत आहेत अथवा लाभच मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. गेल्या तीन वर्षाचा विचार केल्यास सरकारी आकडेवारीवरून 50 लाख लोकसंख्या असणार्या नगर जिल्ह्यात एकदाही वर्षभरात 50 हजार रुग्णांना मोफत लाभ मिळालेला नसल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.