Friday, May 3, 2024
Homeनगरलोकन्यायालयाला प्रतिसाद: वर्षभरात एक लाख प्रकरणांचा निकाल

लोकन्यायालयाला प्रतिसाद: वर्षभरात एक लाख प्रकरणांचा निकाल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा न्यायालय व तालुकास्तरावरील न्यायालयात वेळोवेळी आयोजित केलेल्या लोकन्यायालयामध्ये एका वर्षात 99 हजार 704 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहे. यामुळे तीन अब्ज 29 कोटी 72 लाख 24 हजार 484 रुपये वसूल झाला आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी दिली.

- Advertisement -

करोना संसर्गामुळे सुमारे दोन वर्ष न्यायालयाच्या कामकाजावर अनिष्ट परिणाम झाला होता. या कालावधीमध्ये लोकन्यायालय ही आयोजित केले जात नव्हते. लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवल्यानंतर न्यायाधीशांच्या पॅनल समोर दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून तडजोडीने प्रकरण मिटवले जाते. लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवल्यानंतर त्यावर अपील करण्याची तरतूद नसल्याने कायमस्वरूपी खटला निकाली निघत आहे. त्यामुळे लोकन्यायालयांमध्ये प्रकरणे तडजोडीसाठी दाखल करण्यासाठी पक्षकार आणि वकिलांचा दिवसेंदिवस कल वाढत आहे.

1 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या लोकन्यायालयात 49 हजार 27 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 11 हजार 353 प्रकरणांमध्ये तडजोड झाली. त्याद्वारे 72 कोटी 37 लाख 26 हजार 761 रुपयांचा महसूल मंजूर झाला आहे. 25 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयामध्ये 84 हजार 221 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 14 हजार 481 प्रकरणांत तडजोड होऊन 72 कोटी 63 लाख 11 हजार 994 रुपयांचा महसूल जमा झाला. 11 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या लोकन्यायालयात 94 हजार 890 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 17 हजार 513 प्रकरणात तडजोड झाली.

50 कोटी 14 लाख 25 हजार 311 रुपयांचा महसूल वसूल झाला. 12 मार्च 2022 रोजी झालेल्या लोकन्यायालयामध्ये एक लाख 58 हजार 57 प्रकरणे दाखल करण्यात आली होती, त्यापैकी 36 हजार24 प्रकरणांमध्ये तडजोड झाली आहे. त्यामध्ये 79 कोटी 16 लाख 66 हजार 418 रुपयांचा महसूल वसूल झाला आहे. 7 मे 2022 रोजी झालेल्या लोकन्यायालयात एक लाख 36 हजार 309 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 2 हजार 333 प्रकरणांमध्ये तडजोड झाली. त्यामध्ये 55 कोटी 40 लाख 94 हजार रूपयांचा वसूल झाला आहे.

सलग तिसर्‍यांदा दुसर्‍या क्रमांकावर

जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात वर्षभर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लोकन्यायालयामध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवून त्यांच्या अनेक प्रकरणांमध्ये तडजोड होऊन खटले निकाली निघाले आहेत. खटले निकाली निघण्यात सलग तीन लोकन्यायालयांत अहमदनगर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या