Sunday, May 5, 2024
Homeनगरपीएफ व्याजदर कपातीला साखर कामगारांचा विरोध

पीएफ व्याजदर कपातीला साखर कामगारांचा विरोध

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) ठेवींवरील व्याजदरात 0.40 टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्रीय कामगार मंत्रालय व अर्थ खात्याने घेतला असून या निर्णयास महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांचा विरोध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली.

- Advertisement -

श्री. पवार पुढे म्हणाले, कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेने नुकतेच पीएफवर मिळणारे व्याज निश्चित केले आहे. मात्र, यावेळी हे व्याज गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी असल्याने पगारदारांना मोठा झटका बसला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. गेल्या 10 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ईपीएफओच्या सुमारे सहा कोटी लोकांना धक्का बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळत होते.

एकीकडे महागाई सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, सरकारने पीएफवरील व्याज कमी केले आहे. देशातील सर्वच उद्योगातील कामगारांना मिळणारे सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) भविष्य निर्वाह निधीत जमा रकमेवरील व्याजावर आधारीत आहे.सध्या मिळणारे निवृत्तीवेतन अतिशय तुटपुंजे आहे. त्यात वाढ करावी अशी मागणी कामगार संघटनांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे.परंतु केंद्र सरकार या मागणीकडे डोळेझाक करीत आहे.

निवृत्ती वेतनात (पेन्शन) वाढ करण्या ऐवजी उलट पक्षी पीएफ ठेवींवरील व्याजात कपात करून कामगारांचे जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे.भविष्य निर्वाह निधी ठेवीचे व्याज दरात कपात करणे ही बाब कामगारांवर अन्याय करणारी असल्याने व्याज कपातीला विरोध असून कामगारांच्या भावना केंद्रीय कामगार मंत्रालय व अर्थ खात्यास कळविण्यात येणार असल्याचेही नितीन पवार यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या