पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात शेती वीजपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. दिवसा वीज पुरवठ्याच्या आठ तासांत तासभरही वीज येत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पिंपरी निर्मळ फिडरवर टाकलेल्या शेजारच्या गावांचा अतिरीक्त भार वाढल्यामुळे वीज वितरणाच्या अडचणी येत आहेत.
परतीच्या पावसाचा आधार मिळाल्याने पिंपरी निर्मळ गावातील काही भागात रब्बीची पिके येण्याची शक्यता आहे. थोडेफार पाणी उपलब्ध झाल्याने उन्हाळ्यातील पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन लवकरात लवकर थोडीफार रब्बीची पिके उभी करावीत यासाठी परिसरातील शेतकर्यांची लगबग सुरू आहे. मात्र वीज वितरणच्या आडमुठे धोरणाचा शेतकर्यांना फटका बसत आहे. बाभळेश्वर 200 केव्ही येथून पिंपरी निर्मळ फिडरद्वारे गावाला वितरणकडून शेती वीजपुरवठा होतो.
या फिडरवर इतर गावांचा शेती कनेक्शनचा बोजा वितरणने टाकला आहे. यामध्ये बाभळेश्वर येथील कोकाटे मळा, राजुरी येथील मुसमाडे वस्ती, लोणी खुर्द येथील मापरवाडी व गाडगे मळा यांचा समावेश आहे. त्यामुळे या फिडरची लांबी 35 किमीपेक्षा जास्त झाली आहे. या वाढलेल्या अतिरिक्त लोडमुळे गावाला केला जाणार्या शेती वीज पुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. दिवसभरातील आठ तासांच्या वीज पुरवठ्यात तासभरही वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. वीज वितरणने हा वाढविलेला अवांतर लोड कमी करावा व गावातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
बिबट्यांची दहशत व रात्रीचे पाणी
दिवसा वीज मिळत नसल्याने शेतकर्यांना आपला जीव धोक्यात घालून रात्री पाणी भरण्याची वेळ आली आहे. त्यातच गावातील सर्वच भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.