नवी दिल्ली –
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव
पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नावे या यादीमध्ये आहेत.
स्टार प्रचारकांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव आहे. त्यांच्या व्यतिरिक्त भाजपाची सत्ता असलेल्या अन्य कुठल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश केलेला नाही. पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज बिहारमध्ये पहिली सभा घेतली. मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं असा नारा नड्डा यांनी गया येथील सभेत दिला.
दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.