Friday, July 24, 2026
Homeराजकीयअजितदादांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस अन् उपमुख्यमंत्री शिंदेंनी केले अभिवादन

अजितदादांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस अन् उपमुख्यमंत्री शिंदेंनी केले अभिवादन

मुंबई । Mumbai

प्रशासनावरील मजबूत पकड, वक्तशीरपणा आणि अहोरात्र काम करण्याची अनोखी शैली यांमुळे जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची आज, २२ जुलै रोजी जयंती आहे. चालु वर्षात २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर निर्माण झालेली पोकळी आज त्यांच्या जयंतीदिनी अधिक तीव्रतेने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांच्या स्मृतींना भावूक आदरांजली वाहिली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर संदेश पोस्ट करत अजितदादांच्या कार्याचा गौरव केला. “अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे आदरपूर्वक स्मरण. समाजसेवा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासातील त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय होते. समाजातील सर्वच स्तरांत त्यांना मोठा आदर होता. राज्यातील एनडीए सरकार त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देणारा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. “दूरदर्शी, सर्वसमावेशक व लोकाभिमुख नेतृत्व, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन…” असे कॅप्शन देत मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत भावूक शब्दांत दादांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, “आजचा दिवस म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि त्याच वेळी महायुतीचे शिल्पकार अजितदादांच्या उदास करणाऱ्या स्मृती घेऊन आलेला दिवस आहे. एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू अशी आमची अवस्था आहे. दादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही.”

पुढील वाटचालीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, “दादांच्या कार्यपथावरून वाटचाल करताना, सुखी-संपन्न महाराष्ट्र घडवण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना बळ मिळो, हीच प्रार्थना. कार्यकर्त्यांना कसे सांभाळावे, वेळेचे नियोजन कसे करावे आणि अर्थमंत्री म्हणून लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण कराव्यात, याचा आदर्श दादांनी वस्तुपाठच घालून दिला होता. त्यांनी पाहिलेली प्रगतीची स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

एकंदरीत, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या या ‘दबंग’ नेत्याची उणीव आज संपूर्ण राज्याला भासत असून, राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.

ताज्या बातम्या

Crime News : एलसीबीचे जुगार, बिंगो व अवैध दारू अड्ड्यांवर छापे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई करत एमआयडीसी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार, बिंगो आणि अवैध दारू व्यवसायावर एकाच...