Monday, April 6, 2026
HomeराजकीयPM Modi : बंगालमध्ये आता टीएमसीच्या गुंडगिरीचा अंत निश्चित; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

PM Modi : बंगालमध्ये आता टीएमसीच्या गुंडगिरीचा अंत निश्चित; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

कोलकाता । Kolkata

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड ग्राऊंडवरून तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “बंगालच्या जनतेने आता टीएमसीची गुंडगिरी आणि भ्रष्टाचार संपवण्याचा ठाम निर्धार केला आहे, म्हणूनच सत्ताधारी पक्षाचे लोक घाबरून जनतेला धमकावत आहेत,” अशा शब्दांत मोदींनी टीएमसीच्या कार्यपद्धतीवर टीका केली. या भव्य रॅलीत बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात बंगालमधील बेरोजगारी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. ते म्हणाले की, ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात बंगालमधील रोजगाराच्या संधी पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अपयशामुळे राज्यातील तरुणांना नोकरीसाठी इतर राज्यांमध्ये स्थलांतर करावे लागत आहे. राज्यात नवीन गुंतवणूक येण्यास उद्योजक घाबरत असून, यामुळे औद्योगिक प्रगती खुंटली आहे. बंगालच्या बंधू-भगिनींना आश्वस्त करताना मोदी म्हणाले की, राज्यात भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार आल्यास विकासासाठी संपूर्ण ताकद लावली जाईल आणि युवकांना त्यांच्याच शहरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना बंगालमध्ये लागू होऊ दिल्या नाहीत, असा गंभीर आरोपही पंतप्रधानांनी केला. “दीदींनी केंद्राच्या योजनांसाठी बंगालचे दरवाजे बंद केले आहेत, ज्यामुळे गरिबांचे मोठे नुकसान झाले आहे. टीएमसी सरकारने केवळ संविधानाचाच नव्हे, तर आदिवासी समाजाचाही अपमान केला आहे. आता या अन्यायाचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली असून ममता सरकारच्या एक्झिटचा काउंटडाऊन सुरू झाला आहे,” असे मोदी यांनी नमूद केले. टीएमसी सत्तेतून बाहेर पडताच बंगालच्या जनतेला ‘पंतप्रधान आवास योजना’ आणि इतर महत्त्वपूर्ण योजनांचा थेट लाभ मिळण्यास सुरुवात होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवताना पंतप्रधान म्हणाले की, टीएमसी सरकारने माफियांना राजाश्रय दिला आहे. बंगालमध्ये तपास यंत्रणांना त्यांचे काम करण्यापासून रोखले जाते आणि भ्रष्ट नेत्यांना संरक्षण दिले जाते. मात्र, भाजपच्या सरकारमध्ये जनतेच्या हक्कावर दरोडा टाकणाऱ्या एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलली जातील आणि पारदर्शक कारभार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रिगेड ग्राऊंडवर उसळलेल्या जनसागराचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, ही अफाट गर्दीच बंगालमध्ये परिवर्तन होणार असल्याचे संकेत देत आहे. टीएमसीने आजवर लोकांना केवळ भ्रमित करण्याचे काम केले, पण आता जनतेला त्यांचे सत्य उमजले आहे. “भाजपच पश्चिम बंगालचे नवनिर्माण करेल, गरिबांना हक्काची घरे देईल आणि राज्याला पुन्हा एकदा प्रगतीच्या पथावर नेईल,” असे आवाहन करत त्यांनी बंगालच्या विकासासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले.

ताज्या बातम्या

default-featured-image

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भरला पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज; म्हणाल्या,...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज (सोमवारी) बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Baramati Vidhan Sabha By Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल केला....