नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीत सोमवारी झालेल्या स्फोटावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया आली आहे. दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी 6:52 च्या सुमारास शक्तीशाली कार स्फोट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात आहे. ते भूतान दौऱ्यावर आहेत. तिथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडली. ‘या षडयंत्राचा सखोल तपास होणार. या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही’, अशा तीव्र शब्दांत हल्लेखोरांना थेट इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २ दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. यावेळी उपस्थितीतांना संबोधित करताना दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणाबाबत भाष्य केले. ‘दिल्ली लाल किल्ल्यावर घडलेला बॉम्बस्फोट भीषण होता. हे प्रकरण समोर येताच तपासाला सुरूवात झाली. आपले तपास यंत्रणा या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी करेल’, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ते संपूर्ण रात्रभर तपास यंत्रणांशी संपर्कात होते आणि आवश्यक ते सर्व निर्देश दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या कटकारस्थानाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सर्व एजन्सी तपास करत आहेत, आणि दोषींना अजिबात सोडले जाणार नाही. ज्या कुटुंबांनी या घटनेत आपले प्रियजन गमावले आहेत, त्या प्रत्येक कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.” त्यांनी शोकाकुल परिवारांना धीर दिला आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. यासोबतच, पंतप्रधानांनी सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्वरित आणि निष्पक्ष तपास करून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, हा हल्ला नक्की का घडवून आणाला? बॉम्बस्फोट घडवून आणण्यामागचं कारण काय? याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान,या बॉम्बस्फोट हल्ल्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मृतांचा आकडा हा १२ वर गेला आहे. तर, अनेक जण जखमी असल्याची माहिती आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नियोजित दौरा कायम ठेवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा भूतानचा चौथा दौरा असून, या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि भूतान यांच्यातील मैत्री व भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. दरम्यान, एकीकडे दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली असतानाच पीएम मोदी भूतान दौऱ्यावर गेल्याने विरोधकांनी त्यांच्या जोरदार हल्लाबोल केलाय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





