नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या नवनियुक्त अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केल्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स पेजवरून पोस्ट करत सांगितले. येत्या १९ सप्टेंबरला नेपाळ त्यांचा संविधान दिन साजरा करत आहे. २०१५ मध्ये लागू झालेल्या नवीन संविधानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस नेपाळच्या लोकशाही संघर्षाचे प्रतीक आहे. यावेळी त्यांनी नेपाळच्या संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच नेपाळमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी भारत पूर्णपणे तुमच्यासोबत असेल, असे आश्वासनही मोदींनी दिले.
नेपाळमधील भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी नुकतीच सिंह दरबार येथे सुशीला कार्की यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली होती. श्रीवास्तव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने कार्की यांना अभिनंदन संदेश दिला. अशातच आज पंतप्रधान मोदी यांनी स्वत: कार्की यांच्याशी चर्चा करुन त्यांना संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
‘एक्स’वर पोस्ट करत दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती दिली. नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी शांतपणे चर्चा झाली. नुकतेच नेपाळमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांमध्ये ज्यांनी जीव गमावला, त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त केली. तसेच शांतता आणि स्थैर्य परत आणण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्याला भारताचा पाठिंबा आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यासोबतच मी त्यांना आणि नेपाळच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनासाठी शुभेच्छा दिल्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, दोनच दिवसआधी नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने X वर पोस्ट केले की भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी पंतप्रधान मोदींचा त्यांच्या नेपाळी समकक्षांना अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन संदेश दिला. आपल्या अभिनंदन संदेशात, पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील सहकार्य आणि मैत्रीचे घनिष्ठ संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्याची भारताची वचनबद्धता व्यक्त केली.
भारताने नेपाळच्या शांततेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापूर्वीच परराष्ट्र मंत्रालयानेही नेपाळला सहकार्य करण्याचे संकेत दिले होते. पंतप्रधान मोदींनीही १३ सप्टेंबरला सुशीला कार्की यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. नेपाळ आपला संविधान दिवस १९ सप्टेंबर रोजी साजरा करतो, जो २०१५ मध्ये लागू झालेल्या नव्या संविधानाची आठवण देतो. हा दिवस नेपाळच्या लोकशाही संघर्षाचे प्रतीक आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




