अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गृहनिर्माण सहकारी संस्थेत एक लाख 25 हजारांत (सव्वा लाखात) 500 चौरस फुटाचा (अर्धा गुंठा) प्लॉट देण्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर शहरातील सुमारे 150 लोकांकडून सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम गोळा केली. हा सर्व प्रकार जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अंमलदाराने त्याच्या एका ‘पंटर’ च्या (खासगी व्यक्ती) मदतीने केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये फसवणूक झालेल्या एका विडी कामगार महिलेने यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला आहे. पोलीस दादाने अनेकांना गंडा घातला असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
हा सर्व प्रकार सन 2014 मध्ये घडला असून प्लॉट मिळेल या आशेवर असलेल्या लोकांना सदरची गृहनिर्माण संस्था अस्तित्वात नसून आपल्याला प्लॉट मिळणार नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील एका शाखेत एक पोलिस अंमलदार ड्यूटीला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसोबत वावरणार्या या पोलिस अंमलदाराने त्याच्या एका पंटरच्या मदतीने एक गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन केल्याचे सर्वसामान्य लोकांसह पोलिस दलातील अंमलदारांना सांगितले. त्या सहकारी संस्थेचा सभासद करून घेण्याचे व 500 चौ.फुटाचा प्लॉट एक लाख 25 हजार रूपयामध्ये नावावर करून देण्याचे आमिष दाखविले. एक लाख 25 हजार रूपयांमध्ये प्लॉट भेटत असल्याने अनेकांनी पोलिस दादा आणि त्याच्या पंटरकडे धाव घेतली.
एक लाख 25 हजार रूपये रक्कम भरून सभासद झाले. त्या दोघांनी अनेक सभासद सहकारी संस्थेत जोडून घेताना मोठ्या प्रमाणात ‘मलिदा’ गोळा केला. लोकांना विश्वास देण्यासाठी त्यांनी नालेगाव येथील एका सर्व्हे नंबरवर हा भुखंड संस्थेने घेतला असून त्याठिकाणी तुम्हाला प्लॉट दिला जाणार असल्याचे सांगितले. पैसे भरून सभासद झालेल्यांना 100 रूपयांच्या मुद्रांक शुल्कावर खरेदी पावती/ करारनामा करून दिला. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑगस्ट 2014 मध्ये घेवून त्यातील विषय क्रमांक 22 व ठराव क्रमांक 22 अन्वये संस्थेमध्ये प्लॉट व त्याचा नंबर संबंधीत सभासदांना सांगण्यात आले. प्लॉट वापरण्यासंदर्भात अटी व शर्ती लिहून व नोंदवून घेतल्या गेल्या.
अहिल्यानगर शहरातील कामगार, पोलिस दलातील अंमलदार, पत्रकारीता क्षेत्रातील काही लोक अशा सुमारे 150 लोकांकडून सुमारे दोन कोटी रूपये पोलिस दादा व त्याच्या पंटरने गोळा केले. दरम्यान, सदर अर्जदार महिला व इतरांनी गृहनिर्माण सहकारी संस्था नोंदणीकृत आहे का? याची चौकशी केली असता सदरची संस्था तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे नियोजित सोसायटी म्हणून देखील नोंदणीकृत नसल्याचे त्यांना समजले. हा सर्व प्रकार लक्ष्यात आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. यासंदर्भात अर्जदार महिलेने सदरची संस्था व भुखंडाबाबत पोलिस दादा व त्याच्या पंटरकडे विचारणा करून प्लॉट ताब्यात कधी देणार असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. प्लॉटचा ताबा कधी देणार अशी विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. यानंतर अर्जदार महिला व इतरांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
स्वस्तात प्लॉट मिळत असल्याने व प्लॉट देणारी गृहनिर्माण संस्था आपल्याच पोलिसाची असल्याने अनेक पोलिसांनी त्या संस्थेचे सभासद होऊन प्लॉट घेण्यासाठी पैसे दिले. पोलिसाचा पंटर हा एका समाजात सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत असताना त्याने त्या समाजातील अनेक गोरगरीब लोकांकडून पैसे जमा केले व त्यांना प्लॉट देण्याचे आमिष दाखविले. मात्र 10 वर्षापेक्षा अधिक काळ लोटून देखील प्लॉट मिळाला नसल्याने संस्थेच्या सभासदांनी आता न्याय मिळण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
‘खाकी’च्या जिवावर धमकी
पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाने त्याच्या खासगी पंटर मार्फत सर्वसामान्य लोकांना गंडा घातला. हा सर्व प्रकार होत असताना यात काही पोलीस देखील फसले गेले. सदर महिला अर्जदार या पोलिसाच्या पंटरकडे प्लॉट संदर्भात विचारणा करण्यासाठी गेल्या असता त्या पंटरने आपला सहकारी पोलीस खात्यात नोकरीला असून तुला कुठे तक्रार करायची कर, सर्व पोलीस यंत्रणा माझ्या खिशात आहे, तुझ्या तक्रारीचा काही उपयोग होणार नाही, अशी धमकी दिली गेली.